ETV Bharat / state

बारामतीत 'कलरफुल' कलिंगडांची चलती; सहा एकर क्षेत्रात १२० टन उत्पादन

author img

By

Published : Apr 29, 2021, 7:23 AM IST

Baramati colorful watermelons news
बारामती रंगीत कलिंगड उत्पादन बातमी

शेतकऱ्यांना नेहमीच आस्मानी नाहीतर सुलतानी संकटांचा सामना करावा लागतो. यामध्ये त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानही होते. मात्र, तरी देखील काही शेतकरी हार मानत नाहीत. आपल्या शेतीमध्ये विविध प्रयोग करून ते उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतात. बारामती तालुक्यातील मळद गावातील प्रल्हाद वरे या शेतकऱ्याने देखील अशीच किमया केली आहे.

बारामती (पुणे) - मागील वर्षभरापासून कोरोनामुळे विविध व्यवसायांसह शेती व्यवसाय देखील अडचणीत आला आहे. मात्र, असे असले तरी बारामती तालुक्यातील मळद येथील एका प्रगतीशील शेतकऱ्याने विविध प्रकारच्या कलिंगड व खरबूज या फळपिकांचे भरघोस उत्पन्न घेतले आहे. या फळांची बांधावरच विक्री करून पंधरा दिवसात तब्बल साडे आठ लाख रुपये मिळवले आहेत. प्रल्हाद वरे असे या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट...

प्रल्हाद वरे यांनी रंगीत कलिंगड व खरबुजांचे उत्पादन घेतले

फळांची थेट बांधावरून विक्री -

सध्याची परिस्थिती पाहता शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. गेल्या वर्षभरापासून अनेक शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. अवकाळी पाऊस व कोरोनामुळे शेतकऱ्यांना आपला माल बाजारपेठांमध्ये विकता आला नाही. मात्र, बारामतीतील प्रल्हाद वरे या शेतकऱ्याने नामी शक्कल लढवत ६ एकर क्षेत्रात विविध प्रकारचे १२० टन कलिंगड पिकवले. व्हॉट्सअ‌ॅप, फेसबुक व फोनद्वारे संपर्क साधून त्यांनी ६० टन कलिंगड थेट बांधावरून विकण्याची किमया साधली आहे.

पिकवली ६ रंगांची फळे -

आतून पिवळे व बाहेरून काळे असलेले अनमोल, वरून पिवळे आतून लाल असलेले विशाला, वरून हिरवे आणि आतून लाल असलेले सरस्वती, वरून हिरवा पट्टा आणि आतून लाल असलेले गिरीष या वाणाची कलिंगडे वरे यांनी शेतात पिकवली. तसेच बाहेरून पिवळे आणि आतून पांढरे असलेले कोहिनूर व कुंदन या वाणांच्या खरबूजांचे देखील त्यांनी उत्पादन घेतले. हे वाण विदेशात निर्यात होणार होते. परंतु, कोरोना प्रादुर्भावामुळे सध्या ही फळे बांधांवरच विकावी लागत आहेत.

सहा एकर क्षेत्रात १२० टन उत्पादन -

सहा एकर क्षेत्रात घेतलेल्या कलिंगड व खरबूज पिकासाठी प्रति एकर १ लाख १० हजार रुपये खर्च प्रल्हाद वरे यांना आला. यामध्ये बियाणे, मल्चिंग पेपर, ड्रीप व सेंद्रिय पद्धतीच्या औषधांचा समावेश आहे. ६ एकर क्षेत्रात त्यांनी १२० टन उत्पादन मिळाले. हे पीक घेताना प्रल्हाद वरे यांनी रासायनिक खतांचा वापर न करता केवळ सेंद्रिय पद्धतीने शेती फुलवली. यामध्ये दशपर्णी, आर्क, जीवामृत, जैविक खते व औषधे यांचा समावेश आहे.

फळ विक्रीसाठी सोशल मीडियाचा वापर -

व्हॉट्सअ‌ॅप, फेसबुक आणि फोनकॉलच्या माध्यमातून वरे यांनी आपल्या मालाची माहिती ग्राहकांपर्यंत पोचवली. त्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे. बारामती तालुक्यासह इंदापूर, दौंड, भिगवण, फलटण आदी भागातून ग्राहक कलिंगड व खरबूज खरेदीसाठी थेट बांधावर येतात. खरेदी-विक्री दरम्यान मास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर अशा शासन नियमांचे पालन देखील केले जाते.

हेही वाचा - हृदयद्रावक..! दोन दिवस आईच्या मृतदेहाजवळ बसून होता दीड वर्षीय चिमुरडा; दुर्गंधी आल्यानंतर घटना उघडकीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.