ETV Bharat / state

कलादिग्दर्शक राजेश साप्ते आत्महत्या प्रकरण : मुख्य आरोपी राकेश मौर्याला अटक

author img

By

Published : Jul 15, 2021, 9:36 PM IST

Updated : Jul 15, 2021, 9:47 PM IST

कलादिग्दर्शक राजेश साप्ते आत्महत्या प्रकरणी मुख्य आरोपी राकेश मौर्या याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी चंदन ठाकरे या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

राकेश मौर्या
राकेश मौर्या

पिंपरी-चिंचवड (पुणे) - कलादिग्दर्शक राजेश साप्ते आत्महत्या प्रकरणी मुख्य आरोपी राकेश मौर्या याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. कलादिग्दर्शक राकेश साप्ते यांनी तीन जुलैला पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगाव परिसरात राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पिंपरी परिसरातील एका हॉटेलमध्ये आरोपी राकेश मौर्या आला असता त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणी आत्तापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली.

कलादिग्दर्शक राजेश मारुती साप्ते यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 3 जुलैला उघडकीस आली. राजेश यांनी आत्महत्येपूर्वी व्हिडिओ बनवला होता ज्यात, राकेश मौर्या खूप त्रास देत असल्याचे त्यांनी म्हटले होते. ते वाकड परिसरात असणाऱ्या त्यांच्या फ्लॅटवर आले होते. तिथे त्यांनी व्हिडिओ बनवून आत्महत्या करत असल्याचे स्पष्ट होते. व्हिडिओमधून त्यांनी राकेश मौर्यावर अनेक आरोप केले. दरम्यान, राजेश साप्ते यांना कुटुंबीय अनेक फोन करत होते. त्याला प्रतिसाद न दिल्याने ही खळबळजनक घटना उघडकीस आली होती.

पाच जणांविरोधात झाला होता गुन्हा दाखल

त्यांच्या व्हिडिओनंतर सिने जगतात खळबळ उडाली होती. व्हिडिओवरून राकेश मौर्या, नरेश विश्वकर्मा उर्फ मिस्त्री, गंगेश्वर श्रीवास्तव उर्फ संजुभाई, चंदन रामकृष्ण ठाकरे, अशोक दुबे या पाच जणांविरोधात पोलिसांत गुन्हा करण्यात आला होता. त्यानंतर चंदन ठाकरे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या.

काय आहे प्रकरण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील आरोपींनी नियोजनबद्ध कट रचून राजेश साप्ते यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच, लेबर लोकांना कामावर येऊ देणार नाही, व्यवसायीक नुकसान करण्याच्या धमक्या देऊन वारंवार जबरदस्तीने 10 लाख रुपये आणि प्रत्येक प्रोजेक्टमध्ये 1 लाखांची मागणी केली होती. तसेच त्यापोटी त्यांनी अडीच लाख रुपये जबरदस्तीने देण्यास भाग पाडले. असे सोनाली यांनी तक्रारीत म्हटले आहे. तसेच राजेश यांचे बिझनेस पार्टनर चंदन ठाकरे याने वेळोवेळी विश्वासघात व फसवणूक करुन आर्थिक नुकसान केले असल्याचा उल्लेख तक्रारीमध्ये आहे. आरोपींच्या जाचाला कंटाळल्याने राजेश मारुती साप्ते यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असून आरोपींनी राजेश यांना मानसिक व आर्थिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास भाग पाडले, असे तक्रारीत म्हटले आहे

हेही वाचा - चिकन, मासे, जिलेबी, पेढा काय पाहिजे ते सांगा! तुरुंगातील कैद्यांना आता सर्व काही मिळणार

Last Updated : Jul 15, 2021, 9:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.