ETV Bharat / state

पिंपरीत मित्राचे अपहरण करून केला खून; मृतदेह फेकला नदीत

author img

By

Published : Dec 14, 2020, 6:18 AM IST

संकट काळात सर्वात अगोदर मित्र मदतीला येतात, असे म्हटले जाते. बहुतांशी वेळा हे सत्यातही उतरते. मात्र, पिंपरीमध्ये मित्रांनी मिळूनच आपल्या एका मित्राचे अपहरण करून खून केल्याची घटना घडली.

Murder
खून

पुणे : पिंपरी-चिंचवडच्या चिखली परिसरातून दहा जणांच्या टोळीने मित्राचे अपहरण करून खून केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. ही घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली असून शुक्रवारी मृत मुलाचे अपहरण करण्यात आले होते. आर्थिक व्यवहारातून हा खून झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नदीत सापडला मृतदेह -

सचिन लक्षण चौधरी (वय- 22 रा. चिखली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी सचिनचे अपहरण झाले होते. रविवारी शिरगाव पोलीस चौकीच्या हद्दीतील नदीमध्ये त्याचा मृतदेह आढळला. याप्रकरणी सनी उर्फ नकुल कुचेकर (वय-25 रा. चिंचवड) आणि गौरव रमेश डांगले (वय-22 रा. चिंचवडगाव) यांना अटक करण्यात आली आहे.

पैशाच्या कारणामुळे झाला खून -

मुख्य आरोपी योगेश दिनेश सावंत आणि मृत सचिन चौधरी हे दोघेही मित्र होते. त्यांची लहानपणापासून मैत्री होती. दरम्यान, सावंत याचे आर्थिक व्यवहार सचिन हा पहायचा. मात्र, यात सचिनने फेरफार केल्याचा संशय सावंतला होता. त्यामुळेच शुक्रवारी इतर मित्राच्या साथीने राहत्या घरातून सावंतने सचिनचे अपहरण केले. त्याच रात्री इतर मित्रांच्या साथीने त्याचा डोक्यात दगड घालून खून केला व त्याचा मृतदेह नदीमध्ये फेकून दिला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

आरोपी व मृत व्यक्ती सराईत गुन्हेगार -

अपहरणा प्रकरणी योगेश दिनेश सावंत, आकाश उर्फ गुंड्या प्रकाश भालेराव, रुपेश प्रकाश आखाडे यांच्यासह एकूण आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती चिखली पोलिसांनी दिली. या सर्वांवर गंभीर गुन्हे दाखल असून ते सराईत गुन्हेगार आहेत. मृत सचिन चौधरी याच्या नावावर देखील निगडी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, मारामारी असे गुन्हे दाखल आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.