ETV Bharat / state

परभणीत लुटमारीच्या तीन घटना उघडकीस; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

author img

By

Published : Jun 23, 2021, 4:12 AM IST

परभणी शहरात लुटमारीच्या 3 वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या आहेत. ज्यामधील पहिल्या घटनेत पेट्रोल पंपाच्या मॅनेजरवर तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून त्याच्या जवळचे दीड लाख रुपये चोरट्यांनी लंपास केले. दुसर्‍या घटनेत सोन्याचे दागिने बनविण्याचे काम करणाऱ्या कारागिराने मालकाचे 1 लाख 40 हजार रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केला. तर तिसऱ्या घटनेत रामकृष्ण नगरात दोन ठगां ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन ओरबाडून पळ काढला.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

परभणी - शहरात लुटमारीच्या 3 वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या आहेत. ज्यामधील पहिल्या घटनेत पेट्रोल पंपाच्या मॅनेजरवर तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून त्याच्या जवळचे दीड लाख रुपये चोरट्यांनी लंपास केले. दुसर्‍या घटनेत सोन्याचे दागिने बनविण्याचे काम करणाऱ्या कारागिराने मालकाचे 1 लाख 40 हजार रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केला. तर तिसऱ्या घटनेत रामकृष्ण नगरात दोन ठगां ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन ओरबाडून पळ काढला. या तीनही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाले असून, पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, मंगळवारी (दि. 22 जून) एकाच दिवशी उघडकीस आलेल्या या घटनांमुळे नागरिकांत भीती निर्माण झाली आहे.

पेट्रोल पंपाच्या मॅनेजरला लुटले

परभणी शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भिकुलाल पेट्रोल पंपावर ही घटना घडली. यामध्ये सोमवारी (दि. 21 जून) रात्री 11 वाजता नेहमीप्रमाणे व्यवस्थापक शेख सत्तार शेख नबी हे पेट्रोलची विक्री करून जमा झालेले दीड लाख रुपये एका बॅगमध्ये भरून मालकाच्या घरी घेऊन जात होते. पेट्रोल पंपाच्या समोरील नालीवर ते उभे असताना मोटारसायकलवर आलेल्या दोन जणांनी त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करत त्यांच्या हातातील पैशांची बॅग हिसकावून पळ काढला. या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, सहायक पोलीस निरीक्षक बालाजी तिपप्पलवाड तपास करत आहेत.

महिलेच्या गळ्यातील चैन हिसकावून भामटे पसार

शहरातील रामकृष्ण नगर भागात राहणाऱ्या दमयंती सुनील दुबे या 62 वर्षीय महिलेने मंगळवारी (दि. 22 जून) नवामोंढा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी प्रमाणे, सोमवारी (दि. 21 जून) सकाळी साडेसहा वाजता घरासमोर गायीला नैवेद्य देत होत्या. त्याचवेळी मोटरसायकलवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या घरासमोरून दोन चकरा मारल्या. दुसऱ्या चकरेत त्यातील एकाने यांच्या गळ्यातील चैन हिसकावून घेतली आणि गाडीवर बसून पोबारा केला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारचे लोक धावून आले. मात्र, तोपर्यंत चोरटे त्या ठिकाणाहून पसार झाले. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर करत आहेत.

कारागीर 1 लाख 40 हजाराचे दागिने घेऊन पोबारा

परभणी शहरातील सोनार लाईन (भोई गल्ली) भागात जिंतूर तालुक्यातील शेख मुख्तार शेख हुसेन हे सोन्याच्या दागिन्यांची कारागिरी करतात. त्यांच्यासोबत शेख जकीर अली शेख अन्सार (रा.मोगरापुरा, हुगळी पश्चिम बंगाल) हा कारागीर काम करत होता. दरम्यान, शेख मुख्तार यांच्याकडे एका ग्राहकाने 30 ग्रॅम सोने उजळून देण्यासाठी दिले होते. हे सोने उजळून झाल्यानंतर त्यांनी ते दुकानातील टेबलच्या ट्रॅपमध्ये ठेवले होते. या दागिन्यांची किंमत 1 लाख 41 हजार असून, ते चोरी झाल्याचे लक्षात आल्याने शेख मुख्तार यांनी मंगळवारी (दि. 22 जून) नानलपेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. त्यांनी तक्रारीत त्यांचा सहकारी शेख जाकीर यानेच हे सोने घेऊन पोबारा केल्याचा आरोप केला आहे. त्यानुसार पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास सहायक उपनिरीक्षक मारुती चव्हाण करत आहेत.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

दरम्यान, कोरोनामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून सर्व व्यवहार ठप्प झाले होते. यामुळे अनेकांचा रोजगार बंद झाला होता. ज्यामुळे अशा घटना घडण्याची भीती व्यक्त होत होती. त्यानुसार आता बाजारपेठ खुली होताच, अशा प्रकारच्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत. सध्या बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी असून, लहान मोठ्या चोऱ्या नित्याच्याच झाल्या आहेत. त्यातच या तीन घटना मंगळवारी उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा - मराठा आरक्षणासाठी संभाजीसेना उतरणार रस्त्यावर; 2 जुलैला मराठवाड्यात रेल्वेरोको आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.