ETV Bharat / state

'वीज महावितरण'च्या भोंगळ कारभाराची चौकशी करा, खासदार संजय जाधवांची मागणी

author img

By

Published : Aug 24, 2020, 10:25 PM IST

वारंवार वीज गायब होणे, वीज भारनियमनाच्या नावाखाली दिवसरात्र वीज पुरवठा खंडित होणे, वीज ग्राहकांना वेळेवर साहित्य न मिळणे, सणासुदीच्या काळात देखील वीज पुरवठा बंद राहणे, असे प्रकार सतत होत असल्याने वीज ग्राहक जाम वैतागले आहेत. नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे.

parbhani
संग्रहित छायाचित्र

परभणी - वीज महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराने अक्षरश: कळस गाठला आहे. याचा फटका परभणी जिल्ह्यातील वीजग्राहकांना बसत आहे. विशेष म्हणजे ऐन सणासुदीच्या काळात वीज पुरवठा खंडीत होत असल्याने रहिवासी वैतागले आहे. त्यामुळे वीज महावितरण कंपनीच्या गैरकारभाराची वरिष्ठ पातळीवर सखोल चौकशी करून संबंधीतांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी खासदार संजय जाधव यांनी वीज महावितरणच्या वरिष्ठांकडे केली आहे.

परभणीच्या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाने मनमानी कारभार चालविला आहे, असा आरोप देखील खासदार संजय जाधव यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. यामुळे वीज ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वीज महावितरणचे अधिक्षक अभियंता यांचे नियंत्रण राहिले नाही. परिणामी वारंवार वीज गायब होणे, वीज भारनियमनाच्या नावाखाली दिवसरात्र वीज पुरवठा खंडित होणे, वीज ग्राहकांना वेळेवर साहित्य न मिळणे, सणासुदीच्या काळात देखील वीज पुरवठा बंद राहणे, असे प्रकार सतत होत असल्याने वीज ग्राहक जाम वैतागले आहेत. नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. जनतेच्या आपल्याकडे तक्रारी आल्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून संबंधीत अधिकार्‍यांकडे विचारणा केल्यास चुकीची किंवा उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. सामान्य माणसाला तर छोट्या-मोठ्या कामासाठी अनेक खेटे मारावे लागतात.


विशेष म्हणजे वीज ग्राहकांच्या गैरसोयीबद्दल महावितरणच्या अधिकार्‍यांना काहीच देणेघेणे राहिले नसून, अधिकारी सुस्त आणि वीज ग्राहक त्रस्त अशी सध्या अवस्था झाली आहे. जनतेच्या संतापाचा उद्रेक होण्यापूर्वीच या अधिकार्‍यांनी सावध होऊन वीज ग्राहकांच्या अडचणी तातडीने सोडवायला हव्यात. मात्र अधिकारी जनतेच्या अडीअडचणीकडे हेतूत: दुर्लक्ष करीत आहेत. ही बाब गंभीर आणि संतापजनक असल्याचेही खासदार जाधव यांनी म्हटले आहे.

तसेच वीज महावितरणचे अधिकारी दुरुस्तीच्या नावाखाली देयके उचलण्यात मश्गुल आहेत, असा गंभीर आरोप करत त्यांनी तेव्हा सामान्य जनतेला अंधारात लोटून स्वत:ची पोळी भाजून घेणार्‍या या अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. शिवाय ग्रामीण भागात १६ ते १८ वीज भारनियमन केले जात असल्याने ग्रामीण भागातील जनतेला अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे गणेशोत्सव, गौरीपूजन आदी सणासुदीच्या काळातच वीज कशी काय गायब होते ? असा सवाल देखील खासदार संजय जाधव यांनी उपस्थित केला. तर येत्या आठ दिवसात वीज महावितरणने वीज ग्राहकांच्या अडचणी न सोडविल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सुद्धा शेवटी खासदार जाधव यांनी दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.