ETV Bharat / state

परभणी : आणखी आठ हप्तेखोर पोलीस कर्मचारी निलंबीत

author img

By

Published : Feb 2, 2021, 9:48 PM IST

वाळू व गुटखा माफियायांकडून हप्ता घेणे या आरोपाखाली तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात केले होते. त्यानंतर मंगळवारी (दि. 2 फेब्रु.) परभणीच्या पोलीस अधीक्षकांनी जिल्हा पोलीस दलातील अशाच आठ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

परभणी - दोनच दिवसांपूर्वी अवैध व्यवसायिकांकडून वसुली करणे तसेच वाळू व गुटखा माफियायांकडून हप्ता घेणे या आरोपाखाली तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात केले होते. त्यानंतर मंगळवारी (दि. 2 फेब्रु.) परभणीच्या पोलीस अधीक्षकांनी जिल्हा पोलीस दलातील अशाच आठ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

गैरवर्तन, बेजबाबदार अन् लाचखोरीमुळे केली कारवाई

याबाबत आज (मंगळवारी) पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी निलंबनाचे आदेश बजावले आहेत. ज्यामध्ये परभणी शहरातील 7 तर गंगाखेड या ठिकाणच्या एका कर्मचार्‍याला निलंबित करण्यात आले. त्यांच्यावर बेशिस्त, बेजबाबदार तसेच लाचखोरीचे आरोप आहेत. तसेच अवैध व्यवसायिकांशी संबंध साधून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेणे, अवैध वाळू वाहतूकदारांकडून पैसे वसूल करणे, हे देखील आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. हे आरोप सिद्ध झाल्याने परभणी पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली आहे, असे पोलीस अधीक्षक मीना यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

हे आहेत निलंबन झालेले पोलीस कर्मचारी

दरम्यान, निलंबित झालेल्या पोलिसांमध्ये परभणी शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले वैजनाथ माणिकराव आदौडे, मोसीन मोहम्मद मोसीन, गजानन रामभाऊ जंत्रे, नवा मोंढा पोलीस ठाण्यातील सूर्यकांत अंकुशराव सातपुते, विठ्ठल पंडितराव पठारे, नानलपेठ पोलीस ठाण्याचे सचिन राखुंडे, संतोष पांडूरंग कांबळे यांचा समावेश आहे. याशिवाय गंगाखेड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या कृष्णा बबनराव शिंदे यांना देखील निलंबित करण्यात आले आहे.

रविवारीच झाले होते 3 पोलीस निलंबित

रविवारी (31 जानेवारी) परभणी पोलीस दलातील 3 कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले होते. ज्यामध्ये पूर्णा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी विनोद रत्ने यांना अवैध वाळूचा उपसा करणाऱ्यांसह ट्रॅव्हल्सधारकांकडून महिनेवारी पैसे वसूल करत असल्याबद्दल निलंबित करण्यात आले. तर मानवत पोलीस ठाण्यातील कर्मचारी रसूल दाऊद शेख यांनी अवैध दारू विक्रेत्यासह गुटखा विक्री करणाऱ्याकडून पैसे वसूल केल्याबद्दल त्यांचे निलंबन करण्यात आले. या शिवाय सेलू ठाण्यातील कर्मचारी संजय साळवे यांनी एका परितक्त्या महिलेशी जवळीक निर्माण करत शारीरिक संबंध ठेवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. साळवे यांनी निराधार पीडित महिलांना संरक्षण देण्याऐवजी त्यांच्या एकटेपणाचा गैरफायदा घेतला. ज्यामुळे साळवे यांना निलंबित केल्याचे त्यांच्या आदेशात पोलीस अधीक्षक मीना यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - महिलेने डॉक्टर पतीला परिचारिकेसोबत रंगेहात पकडले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.