ETV Bharat / state

'येलदरी'चे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडणार; पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

author img

By

Published : Jul 31, 2020, 11:34 AM IST

परभणी जिल्ह्यातील येलदरी धरण देखील 77.26 टक्के भरले आहे. आता कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडण्यात येणार असून यामुळे पूर्ण नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

येलदरी धरण
परभणी जिल्ह्यातील येलदरी धरण देखील 77.26 टक्के भरले आहे

परभणी - बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने खडकपूर्णा धरण भरत आले आहे. परिणामी खडकपूर्णातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे परभणी जिल्ह्यातील येलदरी धरणदेखील 77.26 टक्के भरले आहे. आता कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडण्यात येणार असून यामुळे पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी धरणाचा पाणीसाठा वाढत आहे. पाणलोट क्षेत्रातही पाऊस पडत असल्याने येलदरी धरणाचे दरवाजे कधीही उघडण्याची शक्यता आहे. त्यासाठी नदीकाठच्या गावांना हा सावधानतेचा इशारा येलदरी पूर नियंत्रण अधिकाऱ्यांनी दिला आहे.

जिंतूर येथील येलदरी धरणाचा पाणीसाठा 77.26 टक्के झाला असून, धरणाच्या उर्ध्व बाजूस असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात चालू झाला आहे. तसेच पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाचा विसर्गही येलदरी धरणार सुरू असल्याने धरण सुरक्षितता व पूर नियंत्रणासाठी धरणाचे दरवाजे कधीही उघडण्यात येऊ शकतात. त्यामुळे पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीत होणार आहे.

पूर्णा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग होणार असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे. तसेच जनावरे, वाहने व शेती अवजारे आदी साधनसामुग्री सुरक्षित स्थळी हलवण्याबाबत म्हटले आहे. तसेच येलदरी धरणातून नदी पत्रात झेपावणाऱ्या या पाण्याचा फटका जिंतूर तालुक्यासह परभणी आणि पूर्णा तालुक्यातील शेकडो गावांना बसू शकतो. यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.