ETV Bharat / state

वसई पूर्वेस शिवभोजन केंद्र सुरू करा, शिवसेना उप-तालुकाप्रमखांची मागणी

author img

By

Published : Apr 18, 2021, 7:47 PM IST

वसई पूर्व परिसरात एक शिवभोजन केंद्र सुरू करावे, अशी मागणी शिवसेना उप-तालुकाप्रमुख तथा माजी पंचायत समितीचे सदस्य काकासाहेब मोटे यांनी केली आहे.

Vasai
Vasai

पालघर/ वसई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनामुळे कडक नियम घोषित केले आहेत. महाराष्ट्रातील गोर गरीब जनता उपाशी पोटी राहू नये याचा विचार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सर्वांना शिवभोजन केंद्रामार्फत मार्फत मोफत जेवण सुरू करण्यात आले आहे. हे शिवभोजन केंद्र वसई पश्चिम पारनाका, पंचायत समिती कार्यालय वसई पश्चिम तसेच पाटील निवास वसई या ठिकाणी आहे. त्यामुळे वसई पूर्व भागात अजून एक शिवभोजन केंद्र सुरू करण्याची मागणी शिवसेना उप-तालुकाप्रमुख तथा माजी पंचायत समितीचे सदस्य काकासाहेब मोटे यांनी केली आहे.

वसई पूर्व भागात मोठी औद्योगिक वसाहत आहे. या औद्योगिक वसाहतीत हजारो गोर गरीब कामगार काम करतात. भोईदापाडा, सातिवली, चिंचपाडा, फादरवाडी, वालीव, गोखीवरे तसेच वाघराळपाडा या भागात मोठी लोकसंख्या आहे. वसई पूर्व येथे शिवभोजन केंद्र नसल्याने लोकांना याचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे वसई पूर्व परिसरात एक शिवभोजन केंद्र सुरू करावे, अशी मागणी वसईच्या तहसीलदार उज्वला भगत यांच्याकडे काकासाहेब मोटे यांनी केली आहे. वसई पूर्व परिसरात हे शिवभोजन केंद्र सुरू केल्यास इथल्या हजारो गोर गरिब जनतेला याचा लाभ घेता येईल, असे मत मोटे यांनी व्यक्त केले आहे.

वसई पूर्व परिसरात रोजंदारीच्या शोधात राज्यासह परराज्यातील अनेक कामगार आले आहेत. मात्र काही जणांकडे पैसे नसल्याने त्यांना तर अक्षरश: उपाशी राहण्याची वेळ येऊ शकते. या लोकांना हॉटेलमधील जेवण परवडत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शिवभोजन थाळी पार्सल स्वरुपात देण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना काळात मजूर, कामगार, शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेस ही थाळी मोठा आधार ठरत आहे. मात्र वसई पूर्वेस शिवभोजन केंद्र नसल्याने ही योजना शासनाने सुरु करुनही त्याचा लाभ जनतेस घेता येत नाही. कोरोना महामारीच्या काळात वसई पूर्वेकडे शिवभोजन थाळी केंद्र सुरु करुन गोर गरिबांची भुक भागवता येईल. त्यामुळे लवकरात लवकर या भागात शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी विनंती काकासाहेब मोटे यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.