पालघर - विरार पश्चिम येथील विराट नगरमध्ये शुक्रवारी (दि. 27 डिसें) संध्याकाळी मनिषा मनोहर डोंबळ (वय 63) या वृद्ध महिलेची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी विरार पोलिसांनी भाईंदरमधून दोन आरोपींना ताब्यात घेतले असून मुख्य सुत्रधाराचा शोध पोलीस घेत आहेत.
विरार पश्चिम येथील विराट नगर परिसरतील ग्रीषम पॅलेस सोसायटीमधील तळमजल्यावर राहणाऱ्या मनिषा डोंबळ या महिलेची चोरीच्या उद्देशाने हत्या झाली होती. जवळपास साडेसात लाख रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी यावेळी लांबवली होती. याबाबत मृत महिलेचे पती मनोहर डोंबळ यांनी विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी याबाबत सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसताना तसेच कोणताही पुरावा समोर नसताना प्राप्त माहितीच्या आधारे भाईंदर येथून दोन आरोपींना अवघ्या 48 तासात अटक केली आहे.
हेही वाचा - मुंबई-अहमदाबाद महामार्गावर लाखोंचा गुटखा जप्त
यश इंदवटकर व विनयकुमार कानेटी अशी या दोन आरोपींची नावे आहेत. तर या कटाचा मुख्य सुत्रधार विनोद पाडवी याचा शोध पोलीस घेत आहे. मुख्य आरोपी विनोद हा हत्या करण्यात आलेल्या मनिषा डोंबळ यांचा दूरचा नातेवाईक आहे. 24 डिसेंबर रोजी आरोपी विनोद व यश हे दोघे मनिषा डोंबळ यांच्या घरी गेले होते. त्यानंतर ते आणखी एकाला सोबत घेत 27 डिसें. रोजी संध्याकाळी पुन्हा घरी गेले होते. त्यानंतर तिघांनी मनिषा डोंबळ यांची हत्या केल्याची माहिती विरार उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका बागडे यांनी दिली.
हेही वाचा - पालघरमध्ये बनावट दारूची विक्री, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून टोळीचा पर्दाफाश