ETV Bharat / state

पालघरमधील गडचिंचले तिहेरी हत्याकांड प्रकरणाला एक वर्ष पूर्ण

author img

By

Published : Apr 16, 2021, 8:20 PM IST

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील गडचिंचले तिहेरी हत्याकांड या घटनेला आज एक वर्ष झाले आहे. गडचिंचले गावात 16 एप्रिल, 2020 रोजी कल्पवृक्ष गिरी महाराज, सुशील गिरी महाराज हे दोन साधू व त्यांचे वाहनचालक निलेश तेलगडे या तिघांवर दरोडेखोर असल्याचा संशय घेत जमावाने हल्ला करत निर्घृणपणे हत्या केली. या हत्येचे पडसाद देशभरात उमटले, विरोधकांनी महाराष्ट्र सरकारवर टीकेची झोड उठवली. या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचाही प्रयत्न झाला होता. ही घटना घडून वर्ष उलटले तरीही राजकीय पटलावर हे प्रकरण धगधगतच आहे.

कासा पोलीस स्टेशन
कासा पोलीस स्टेशन

पालघर - महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील गडचिंचले तिहेरी हत्याकांड या घटनेला आज एक वर्ष झाले आहे. गडचिंचले गावात 16 एप्रिल, 2020 रोजी कल्पवृक्ष गिरी महाराज, सुशील गिरी महाराज हे दोन साधू व त्यांचे वाहनचालक निलेश तेलगडे या तिघांवर दरोडेखोर असल्याचा संशय घेत जमावाने हल्ला करत निर्घृणपणे हत्या केली. या हत्येचे पडसाद देशभरात उमटले, विरोधकांनी महाराष्ट्र सरकारवर टीकेची झोड उठवली. या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचाही प्रयत्न झाला होता. ही घटना घडून वर्ष उलटले तरीही राजकीय पटलावर हे प्रकरण धगधगतच आहे.

कशी घडली घटना?
गडचिंचले हे गाव दादरा-नगर-हवेली या केंद्र शासित प्रदेशाच्या सीमेवर वसलेले आहे. 2011च्या जनगणनेनुसार गडचिंचले गावात 1298 रहिवासी असून त्यापैकी 93 टक्के लोक अनुसूचित जमाती किंवा आदिवासींचे आहेत. गडचिंचले गाव पालघर जिल्हा पोलिसांच्या कासा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. मात्र घटनेच्या काही दिवस आधी या सर्व आदिवासी बहुल भागात गावात चोर दरोडेखोर विशेषत: मुलांचे मूत्रपिंड चोरुन काळाबाजारात विकण्यासाठी नेत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. 16 एप्रिलच्या मध्यरात्री ही घटना घडली तेव्हा साधू हे त्यांचे गुरु महंत रामगिरी यांच्या अंत्यदर्शनासाठी कारने गुजरातच्या सुरतला जात होते. पण, गुजरातची सीमा बंद असल्यामुळे त्यांना पोलिसांनी पुढे जाऊ दिले नाही. त्यामुळे त्यांनी आपली गाडी मागे वळवली, ही कार या आडमर्गावर दिसल्याने आधीच संशयाने पछाडलेल्या ग्रामस्थांनी या कारला घेरले तिघांवर हल्ला केला. शेकडोंच्या संख्येने जमलेल्या ग्रामस्थांच्या झुंडीने या तिघांचा आकांत ऐकला नाही आणि या निर्घृण हल्ल्यात तिघांचाही मृत्यू झाला.

शिवसेना व सरकारवर भाजपकडून टीका....
भाजपाशी तीन दशक जुने संबंध तोडून आणि काँग्रेस-राष्ट्रवादीशी संबंधित वैचारिकदृष्ट्या भिन्न-राजकीय पक्षांशी हातमिळवणी केल्यापासून चार महिन्यांहून अधिक काळानंतर हे हत्याकांड घडल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेच्या हिंदूत्वावर विरोधी पक्षांकडून प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. आणि सोशल मीडियाच्या व्यासपीठावर हे प्रकरण भडकले.

सीआयडीमार्फत करण्यात आला तपास....
हे संपूर्ण प्रकरण हाताळत असताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. त्यानंतर गडचिंचले तिहेरी हत्याकांडाचा राज्य सरकारने तपास सीआयडीकडे सोपवला. या प्रकरणात कासा पोलीस ठाण्यातील 2 पोलीस अधिकारी व 3 कर्मचाऱ्यांचे निलंबन तसेच 35 कर्मचाऱ्यांची जिल्ह्यात अन्य ठिकाणी बदली करण्यात आली. राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 7 मे रोजी गडचिंचले येथे घटनास्थळाचा दौरा केल्यानंतर पालघरचे तात्कालीन पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. गडचिंचले हत्याकांड प्रकरणात कासा पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. सीआयडीने याप्रकरणी 808 संशयितांची चौकशी केली. व 108 जणांच्या साक्षी नोंदविल्या. सीआयडीने या गडचिंचले तिहेरी हत्याप्रकरणी 251 आरोपींना अटक केली. यामध्ये 13 अल्पवयीन मुलांचा समावेश होता. या आरोपींपैकी अनेकांना जामीन मिळाला असून सध्या 70 हून अधिक आरोपी ताब्यात आहेत.

न्यायालयात सुरु आहे खटला....
गडचिंचले हत्याकांड प्रकरणात कासा पोलीस ठाण्यात दाखल तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांत तीन स्वतंत्र दोषारोपपत्र सीआयडीने न्यायालयात दाखल केली. लोक अफवेला बळी पडल्यामुळे हा प्रकार घडला होता. साधूंची हत्या हा कुठल्याही कटाचा भाग नसून या घटनेचा कुठल्याही धर्माशी संबंध नाही, असेही दोषारोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. गडचिंचले तिहेरी हत्याप्रकरणाचा खटला सध्या ठाणे येथील न्यायालयात सुरू आहे. ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे हे विशेष सरकारी वकील आहेत. तर अमृत अधिकारी आणि अतुल पाटील हे आरोपींचे प्रतिनिधित्व करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.