ETV Bharat / state

Vasai Virar Municipal Corporation : वसई-विरार महानगरपालिकेतील अनेक अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशी रखडल्या..

author img

By

Published : Nov 13, 2022, 6:27 PM IST

विरार- वसई-विरार महापालिकेतील ( Vasai Virar Municipal Corporation mumbai ) निलंबित अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशी करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्त अनिलकुमार पवार यांनी संबंधित चौकशी अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र तब्बल सहा महिने उलटूनही या चौकशी मार्गी लागलेल्या नाहीत. अधिकारी-कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करून त्याबाबतचा अहवाल तीस दिवसांच्या आत सादर करावा, असे आदेश विद्यमान आयुक्त अनिलकुमार पवार यांनी दिलेले आहेत.

Etv Bharat
Etv Bharat

पालघर : वसई-विरार महानगरपालिकेतील ( Vasai Virar Municipal Corporation mumbai ) निलंबित अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशी करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्त अनिलकुमार पवार यांनी संबंधित चौकशी अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र तब्बल सहा महिने उलटूनही या चौकशी मार्गी लागलेल्या नाहीत. चौकशी अधिकाऱ्यांकडून खुद्द आयुक्तांचेच आदेश फाट्यावर मारले जात असल्याने चौकशी करण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांना न्याय मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिणामी पालिकेतील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बढती, पदोन्नती, निर्वाहभत्ता व त्यांचे अन्य हक्क मिळण्यात अडचणी येत असल्याची खंत अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे.

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती रखडल्या - महापालिकेचे तत्कालिन आयुक्त गंगाथरन डी. यांच्या कार्यकाळात वसई-विरार महापालिकेतील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना पूर्वग्रहदूषित आणि सूडभावनेतून निलंबित करण्यात आलेले होते. परिणामी यातील बहुतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती-बढती रोखल्या गेल्या होत्या. अनेक अधिकाऱ्यांना त्याच पदावरून निवृत्त व्हावे लागले होते. त्यांना पदोन्नती मिळालेली नव्हती. त्यांचे निर्वाहभत्ते व अन्य मिळकती अडवले गेलेले आहेत. अनेक अधिकाऱ्यांची लाचलुचपत प्रतिबंधक खात्यामार्फतही चौकशी सुरू होती.

अहवाल सादर करण्याचे आदेश - अधिकारी-कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करून त्याबाबतचा अहवाल तीस दिवसांच्या आत सादर करावा, असे आदेश विद्यमान आयुक्त अनिलकुमार पवार यांनी दिलेले आहेत. सहा महिने लोटून गेल्यानंतरही अपवाद वगळता एकाही अधिकारी व कर्मचाऱ्याची चौकशी मार्गी लागलेली नाही. यातील बहुतांश अधिकारी-कर्मचारी निवृत्त झाले आहेत. तर काही अधिकारी-कर्मचारी निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. तर अनेक अधिकाऱ्यांची पदोन्नती दृष्टिक्षेपात असतानाही केवळ चौकशी अधिकाऱ्यांच्या सूडभावनेमुळे या अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहावे लागत असल्याची भावना या अधिकारी-कर्मचाऱ्यांत निर्माण झालेली आहे.

महापालिकेच्या कामकाजावर परिणाम - 9 सप्टेंबर 2014 मध्ये कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत महानगरपालिकेचा सुधारित आकृतीबंध मंजूर झालेला आहे. या आकृतीबंधानुसार, 2852 पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यानंतरही स्थायी स्वरूपातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत आस्थापना विभागाने कोणतीही दखल घेतलेली नाही किंवा त्या दृष्टीने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. यातील अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या चौकशी लागलेल्या आहेत. मात्र चौकशी अधिकारी असलेल्या उपायुक्त-अतिरिक्त आयुक्तांकडून जाणीवपूर्वक या चौकशी प्रलंबित ठेवण्यात येत असल्याने या अधिकाऱ्यांविरोधात पालिकेतील अन्य कनिष्ठ अधिकारी-कर्मचाऱ्यांत संतापाची भावना आहे. या सगळ्याचा परिणाम पालिका कामकाजावर होत आहे.


12 वर्ष उलटल्यानंतरी पदोन्नती नाही - 2009 मध्ये चार नगरपरिषदा व 53 ग्रामपंचायती मिळून महापालिकेची स्थापना झाली होती. तत्कालिन ग्रामपंचायत व नगरपरिषदा महानगरपालिकेत समाविष्ट करतानाच तेथील कर्मचाऱ्यांची सेवाही महापालिकेत वर्ग करण्यात आली. त्यानुसार तत्कालिन नगरपरिषदांतील 807 व तत्कालिन ग्रामपंचायतींमधील 408 कर्मचाऱ्यांचे अशा एकूण 1215 कर्मचाऱ्यांचा महानगरपालिकेत समावेश झाला. मात्र आज 12 वर्षांचा कालावधी उलटूनही ग्रामपंचायती-नगरपरिषदांतून पालिकेत कार्यरत झालेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आलेली नाही.

तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा - वसई-विरार महापालिकेत नव्याने नियुक्त उपायुक्त-अतिरिक्त आयुक्त बाहेरून आलेले आहेत. त्यांना शहराप्रति म्हणावी तशी बांधिलकी दिसत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून असे कृत्य घडत असावे. याचे परिणाम शहराच्या कामाकाजावर होत आहेत. नागरिकांना सोयीसुविधा मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यांचे हे उपद्व्याप टक्केवारी व पैसे उकळण्याकरिता असतात. हे आता लपून राहिलेले नाही. आयुक्तांचेच आदेश या अधिकाऱ्यांकडून धुडकावले जात आहेत. त्यामुळे या चौकशी प्रलंबित ठेवून अधिकारी-कर्मचाऱ्यांना वेठीस धरल्याने उपायुक्त-अतिरिक्त आयुक्तांची चौकशी करून त्यांना निलंबित केले जावे, अशी आमची मागणी आहे. अन्यथा, पालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाणार असल्याचे भाजपच्या अल्पसंख्याक विभागचे जिल्हा उपाध्यक्ष तसनीफ नूर शेख यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.