ETV Bharat / state

ETV BHARAT Special : तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवण्याची शेतकऱ्यावर वेळ..

author img

By

Published : Nov 2, 2020, 3:44 PM IST

Updated : Nov 2, 2020, 4:21 PM IST

उस्मानबाद जिल्ह्यातील कामठा गावा शंभर टक्के शेतीवर अवलंबून. गावात प्रामुख्याने द्राक्ष व कांद्याचे उत्पादन घेतले जाते. गावात शोधूनही नोकरदार सापडणार नाही. मात्र लॉकडाऊन व यावर्षीची अतिवृष्टी यामुळे द्राक्षवेलींचे मोठे नुकसान झाले. यामुळे एका शेतकऱ्याने तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या द्राक्षबागेवर कुऱ्हाड चालवली.

Grape farming in crisis at Osmanabad
द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवण्याची शेतकऱ्यावर वेळ

उस्मानाबाद - नैसर्गिक संकट येवो किंवा मानवनिर्मित सर्वात पहिली कुऱ्हाड शेतकऱ्यांवर आणि शेतकऱ्यांच्या पिकांवरती कोसळते हे सर्वविदीत आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून सुरू असलेला लॉकडाऊन आणि गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेला आहे. त्याचे परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. ईटीव्ही भारतने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घेतलेला हा खास रिपोर्ट..

द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवण्याची शेतकऱ्यावर वेळ

जिल्ह्यातील कामठा गावातील सुलतान शेख या तरुण शेतकऱ्याने आपल्या द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवली आहे. तुळजापूर तालुक्यातील कामठा येथील शेतकरी सुलतान महमद शेख यांची कामठा शिवारात दोन एकर जमीन असून, एक एकरावर तीन वर्षांपूर्वी सुपर सोनाका या वाणाची द्राक्ष बागेची लागवड केली होती. यासाठी लाखो रुपये खर्च केले. शेतात शेड उभा करणे, द्राक्ष झाडाची लागवड, फवारणी तसेच इतर कामांसाठी हा खर्च करण्यात आला. प्रथम वर्षी यातून जेमतेम उत्पन्न मिळाले. त्यातून सावरत त्यांनी बाग जोपासली. मात्र, मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने देशभरातील शहरे लॉकडाऊन झाली होती. बाजारपेठाही बंद करण्यात आल्या तसेच वाहतूक व्यवस्थाही ठप्प झाली होती. यामुळे व्यापारी बागांपर्यंत पोहचू शकत नसल्याने बागायतदारांना कवडीमोल दराने द्राक्षे विकावी लागली. त्यातच यंदाच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सततचा पाऊस व ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसासह धुके, दुपारी उष्ण व रात्री थंड हवामान या सर्वांचा परिणाम होऊन फळ गळती लागली असून, फळ जागेवरच झिरपून गेले. अशा एकापाठोपाठ एक अडचणी येत असल्याने हतबल झालेल्या शेख यांनी अक्षरशः उभ्या द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवाली लागली.

साहेब पोरानं संताप करून बाग तोडली -

सुलतान शेख यांचे वडील मोहम्मद शेख सांगतात की, आमची एक एकर द्राक्षबाग होती पहिल्या वर्षी द्राक्षांना कमी फळ लागली होती. त्यामुळे पहिल्या वर्षीचे द्राक्षे हे 'पाहुणे रावळे' आणि शेजार्‍यांना वाटण्यात संपून गेले. दुसऱ्या वर्षी पीक घ्यायची वेळ आली होती, मात्र लॉकडाऊन घोषित झाला आणि कवडीमोल भावात द्राक्षे विकावी लागली. आत्तापर्यंत झालेला खर्च आणि द्राक्ष विक्रीतून मिळालेला पैसा यांचा ताळमेळ बसला नाही. आता यावर्षी परतीच्या पावसाने सगळं वाटोळं केलं. त्याचबरोबर द्राक्षबागेला कीड-रोगांचा प्रादुर्भाव आहे त्यामुळे पोरांना 'सनीताप' (संताप) करून घेतला आणि मला काही सांगायच्या आतच सगळी बागच तोडून टाकली.

सगळं गाव शेतीवर अवलंबून शोधूनही नोकरदार सापडणार नाही -

कामठा गावचे सरपंच बळीराम सूर्यवंशी सांगतात, की आमचं संपूर्ण गाव शेतीवरच अवलंबून आहे. 386 घरांपैकी जवळपास सर्वांच्याच शेतांमध्ये प्रामुख्याने द्राक्षे आणि कांद्याचे पीक घेतले जाते मात्र गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही पिकांना फटका बसत आहे आमच्या गावात शोधूनही नोकरदार सापडणार नाही. सगळं गाव शेती करते, मात्र आता आमची शेती आणि आम्ही संकटात सापडलो आहोत. शासनाची मिळणारी रक्कम ही काही हजार रुपयात असते आणि आमचं होणारं नुकसान लाखो आणि करोडो रुपयांमध्ये असल्याची खंत सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.

Last Updated : Nov 2, 2020, 4:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.