ETV Bharat / state

परराज्यातून आवक वाढल्याने टोमॅटोचे भाव कोसळले, रस्त्यावर लाल चिखल

author img

By

Published : Aug 28, 2021, 11:55 AM IST

Updated : Aug 28, 2021, 12:09 PM IST

पिंपळगावच्या बाजारात तब्बल अडीच लाख तर नाशिकमध्ये 50 हजार कॅरेट टोमॅटोची आवक झाल्याने टोमॅटोला कवडीमोल भावाने खरेदी केला जात आहे. त्यामुळे टोमॅटोसाठी केलेला उत्पादन खर्च तर सोडाच, साधा वाहतूक खर्च न निघत नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याला टोमॅटो अक्षरशः रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे.

टोमॅटोचे भाव कोसळले, रस्त्यावर टोमॅटोचा चिखल
टोमॅटोचे भाव कोसळले, रस्त्यावर टोमॅटोचा चिखल

नाशिक - पावसाने अचानक ओढ दिल्याने वाढलेल्या तापमानामुळे टोमॅटो वेळेपूर्वीच पक्व होऊ लागले आहेत. त्यामुळे बाजारात टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. तसेच परराज्यातही टोमॅटा उत्पादन वाढल्यामुळे आणि आपल्या राज्यात आवक होत असल्याने टोमॅटोचा भाव गडगडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश बाजारपेठामध्ये आता टोमॅटोचा लाल चिखल पाहायला मिळू लागला आहे. पिंपळगावच्या बाजारात तब्बल अडीच लाख तर नाशिकमध्ये 50 हजार कॅरेट टोमॅटोची आवक झाल्याने टोमॅटोला कवडीमोल भावाने खरेदी केला जात आहे. त्यामुळे टोमॅटोसाठी केलेला उत्पादन खर्च तर सोडाच, साधा वाहतूक खर्च न निघत नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याला टोमॅटो अक्षरशः रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे.

टोमॅटोचे भाव कोसळले, रस्त्यावर टोमॅटोचा चिखल
टोमॅटोचे भाव कोसळले, रस्त्यावर टोमॅटोचा चिखल

परराज्यात टोमॅटोचे मोठे उत्पादन-

सुरुवातीला टोमॅटोचे उत्पादनात महाराष्ट्र अग्रेसर होता. त्यात उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक आणि नगरमध्ये टोमॅटोची जास्त लागवड केली जात होती. मात्र सध्या महाराष्ट्रासह गुजरात कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये ही टोमॅटो उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे. त्यामुळे बाहेरील राज्यातून टोमॅटीची मागणी घटली आहे. तसेच राज्यातही पुणे, सोलापूर, नाशिक नगर, बुलढाणा,औरंगाबाद याठिकाणीही टोमॅटोचे उत्पादन मोठ्याप्रमाणात घेतले जात आहे. एकीकडे उत्पादन वाढले असताना गेल्या आठवडाभरापासून वातावरणात बदल झाल्याने टोमॅटो लवकर पक्व होऊन काढणीला आला आहे. त्यामुळे बाजारपेठेत टोमॅटोची आवक मोठ्याप्रमाणात वाढली आणि दर कोसळला.

आवक वाढल्याने टोमॅटोचे भाव कोसळले, रस्त्यावर लाल चिखल

किरकोळ बाजारात 10 रुपये किलो टोमॅटो-

अद्याप नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, इगतपुरी, सिन्नर, निफाड, चांदवड, नांदगाव या तालुक्यामधील शेतात 40 टक्के टोमॅटो शिल्लक आहे. मात्र दर कोसळल्याने शेतकऱ्यांना टोमॅटो तोडून फेकून देण्याची वेळ आली आहे. भाव मिऴेल या आशेने टोमॅटो बाजारपेठेत नेल्यास शेतकऱ्यांची निराशा होऊन तो माल बाजारपेठेतच टाकून द्यावा लागत आहे. तर दुसरीकडे किरकोळ बाजारात मात्र टोमॅटो दहा रुपये किलो दराने विक्री होत आहे. सध्या दर कमी असून,दरात वाढ झाल्यानंतर किरकोळ बाजारातही दर वाढतील असं टोमॅटो विक्रेत्यांनी सांगितले. मात्र या परिस्थितीत टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.

एकरी दीड लाख रुपये उत्पादन खर्च-

टोमॅटोची लागवड करण्यासाठी सध्या एकरी 1 लाख रुपये खर्च येतो. सुरुवातीला लागवडीसाठी फाउंडेशन कारावे लागते, यात बांबू आणि तारेचा वापर करावा लागतो. सध्या 25 ते 30 नग प्रमाणे बांबू मिळतात, तर तारेचा भाव 80 पासून 100 रुपये किलो आहे. या दोन्हीचा खर्च 40 हजार रुपये येतो, यानंतर ड्रीप, पॉलिथिन पेपर, खंत, मजुरी असा एकूण दीड लाख रुपयांपर्यंत येतो. मात्र सध्या या उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारा दर हा कवडीमोल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.

एक्स्पोर्टला मागणी कमी..

सरकारचे आयात निर्यातीचे धोरणं अस्थिर असल्यामुळे याचा फटका टोमॅटो एक्सपोर्टला बसल्याच निर्यातदारांचे म्हणणे आहे. सुरुवातीच्या काळात पाकिस्तान, बांगलादेश, दुबई, श्रीलंकाला मोठ्या प्रमाणात टोमॅटो निर्यात होत होता, मात्र भारतातील निर्यात धोरण अस्थिर असल्याने कधीही निर्यात बंदी होते. त्यामुळे इतर देशातील व्यापाऱ्यांना भारतातील व्यापाऱ्यांवर विश्वास राहिला नाही. परिणामी त्यांच्याकडून मागणी कमी झाल्याचे मत निर्यातदार व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.

Last Updated : Aug 28, 2021, 12:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.