Chhagan Bhujbal Threatening : मंत्री छगन भुजबळांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; कारण काय?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 14, 2023, 11:00 AM IST

Updated : Oct 14, 2023, 11:27 AM IST

Chhagan Bhujbal Threatening

Chhagan Bhujbal Threatening : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना एका अज्ञात व्यक्तीनं फोन करत जीवे मारण्याची धमकी दिलीय. यामुळं राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडालीय.

नाशिक Chhagan Bhujbal Threatening : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना त्यांच्या मोबाईलवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. अज्ञात व्यक्तीनं फोन करत ही धमकी दिलीय. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय.

परभणी भागातून धमकीचा फोन : छगन भुजबळ हे नाशिक येथील भुजबळ फॉर्म या त्यांच्या निवासस्थानी असताना अनोळखी क्रमांकावरून आलेल्या व्हाट्सअप कॉल द्वारे धमकवण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलंय. भुजबळ यांच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरुन फोन करत, 'तू जास्त दिवस राहणार नाहीस, तुझी वाट लावल्याशिवाय राहणार नाही, तू नीट रहा, नाहीतर तुला बघून घेईन' अशा भाषेत धमकी देण्यात आली. अंबड पोलिसांनी तक्रारीच्या आधारे मोबाईल नंबर ट्रेस केला असून धमकीचा फोन करणारा परभणी भागातील असल्याचं आढळून आलंय. त्यानुसार संशयिताला ताब्यात घेण्यासाठी पोलिस रवाना झाल्याचं सांगण्यात आलंय. 15 ऑक्टोबरला छगन भुजबळ यांचा वाढदिवस असून वाढदिवसापूर्वी भुजबळांना आलेल्या या धमकीनं राजकीय क्षेत्रात खळबळ उडालीय.

पाच वर्षात पाच वेळा धमकी : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांना गेल्या पाच वर्षात देण्यात आलेली ही पाचवी धमकी आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये धमकीचं तीन पानी पत्र त्यांना पाठवण्यात आले होते. त्यानंतर जुलै 2023 मध्ये ते पुण्यात असताना कोल्हापूरच्या तरुणानं त्यांना धमकी दिली होती. तर ऑगस्टमध्ये मखमलाबाद शाळेतील भाषणानंतर त्यांना धमकीचे दोन प्रकार घडले होते.

मराठा आरक्षणावरुन भुजबळांवर टीका : राज्यात मागील महिन्याभरापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलाय. मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी गेल्या काही दिवसांत मराठा आरक्षणावरून मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली होती. यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनीही समता परिषदेत जरांगे यांच्यावर टीका केली होती. जरांगेंच्या सभेवरून मंत्री छगन भुजबळ अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्याच रागातून भुजबळ यांना धमकी आल्याचं बोललं जातंय.

हेही वाचा :

  1. Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांचा भुजबळांना इशारा; म्हणाले, विरोध केला तर....
  2. Sharad Pawar VS Ajit Pawar : राष्ट्रवादीतील खलबतं चव्हाट्यावर; शरद पवारांचा राजीनामा स्टंटबाजी? जाणून घ्या, राजकीय विश्लेषकांचं मत
  3. Supriya Sule : छगन भुजबळांचे आरोप, भाजपाची ऑफर अन् पहाटेचा शपथविधी... वाचा सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट
Last Updated :Oct 14, 2023, 11:27 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.