अयोध्येतील राम मंदिराच्या पूजेमध्ये नाशिकच्या काळाराम मंदिरातील पूजाविधीचा समावेश; जाणून घ्या इतिहास

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 2, 2024, 9:49 PM IST

Updated : Jan 2, 2024, 10:14 PM IST

Kalaram Temple

Kalaram Temple : काळाराम मंदिराच्या पद्धतीनुसार अयोध्येच्या राम मंदिरातही पूजा होणार असल्याचं महंत सुधीरदास पुजारी यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितलं. पुजारी कुटुंबानं 27 पिढ्यांपासून दैनंदिन पूजेसाठी वापरलेले पूजाविधी अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टला उपलब्ध करून दिले आहे.

महंत सुधीरदास पुजारी माहिती देताना

नाशिक Kalaram Temple : 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. यासाठी नाशिकमधील 27 पिढ्यांपासून जतन केलेल्या काळाराम मंदिराचे पूजाविधी अयोध्येतील श्रीराम मंदिर न्यासाला उपलब्ध करून देण्यात आले आहे. काळाराम मंदिरातील 50 ते 60 टक्के पूजेचा अयोध्येतील राम मंदिरातील पूजेत समावेश केला जाणार आहे, असं महंत सुधीरदास पुजारी यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितलंय.

काळाराम मंदिरातील पूजाविधी समाविष्ट : अयोध्येतील राम मंदिराच्या भव्यतेसोबतच पूजा देखील भव्य असणार आहे. त्यामुळं पूजेच्या सर्व संकेतांचं काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे. यासाठी संहिता तयार करण्याचं काम वर्षभरापासून सुरू आहे. त्यानुसारच राम मंदिरात पूजा होणार आहे. यासाठी नाशिकच्या काळाराम मंदिरातील सुमारे 60 टक्के पूजाविधी नवीन पूजाविधीमध्ये स्वीकारण्यात आलाय, असं मंहत सुधीरदास पुजारी यांनी म्हटलंय.

नाशिकच्या धार्मिक परंपरेला महत्त्व : दिवंगत भैय्या शास्त्री पुजारी यांनी या पूजेची पोथी जतन केल्याचं महंत सुधीरदास महाराज यांनी सांगितलं. राम मंदिरातील पुजारी परंपरेचा उल्लेख महानुभाव पंथाच्या पूज्य चक्रधर स्वामी यांच्या लीळाचरित्रात आहे. समर्थ रामदास स्वामींनी या मंदिराला वारंवार भेट दिल्याचे ऐतिहासिक उल्लेख सापडतात. नाशिक हे यजुर्वेद, संस्कृत अध्ययनाचं देश स्तरावरील त्या वेळेचं महत्त्वाचं केंद्र होतं. देशभरात आजही नाशिकच्या धार्मिक परंपरेला महत्त्व दिलं जातं. अयोध्येतील राम जन्मभूमी गर्भगृहात 22 जानेवारी रोजी होणाऱ्य सोहळ्यासाठी महंत सुधीरदास यांना निमंत्रित करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय.

अशी होते काळारामाची पूजा : काळाराम मंदिराच्या त्रिकाल, अर्चन पूजाविधानात 'श्रीं'ची षोडशोपचार, राजोपचारांद्वारे पूजा होते. श्रीरामाची पहाटेची आरती, दुपारची मध्यान्ह पूजा आरती तसंच संध्याकाळी शेजआरती करण्यात येते. पुरुषसूक्तातील 16 ऋचा या 'श्रीं'च्या ठायी असणाऱ्या 16 कला आहेत, असं कल्पून 'श्रीं'च्या चैतन्यशक्तीस आवाहनं केलं जाते. यातून प्रकटणारी 'आल्हादिनी शक्ती' ही भक्तांना बल प्रदान करते, अशी श्रद्धा आहे.

रोज सकाळी होते काकड आरती : इ.स 1500 पासून काळाराम मंदिरात पूजा-आर्चा करण्यात येते. पुजारी घराण्याकडून मदिरात आरती करण्यात येते. मंदिरात दररोज त्रिकाल पूजा होते. सकाळी साडेपाच वाजता काकड आरती, दुपारी अकरा वाजता माध्यान्ह पूजा, रात्री साडेसात वाजता शेजारती होते तर, दर एकादशी अभिषेकयुक्त स्नान, षोडक्षोपचार पूजा, सकाळी साडेसहा वाजता श्री प्रभू रामाच्या पादुकांची चांदीच्या पालखीतून मिरवणूक काढून मंदिरास प्रदक्षिणा होते. मंदिर दररोज सकाळी पाच वाजता उघडते, रात्री दहा वाजता बंद होते.

हेही वाचा -

  1. "ठाण्याचा विकास मोदींमुळं रखडला", 'ईटीव्ही भारत'च्या निवडणूक चर्चासत्रात विरोधकांचा आरोप
  2. राजू शेट्टी-उद्धव ठाकरे भेट; स्वाभिमानी संघटना राज्यात 'इतक्या' जागांवर लढवणार लोकसभा निवडणूक
  3. जपानच्या दोन विमानांची जोरदार टक्कर; जपान एअरलाइन्सच्या विमानाला आग, पाच क्रू मेंबर्सचा मृत्यू
Last Updated :Jan 2, 2024, 10:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.