ETV Bharat / state

ईटीव्ही भारत ग्राउंड रिपोर्ट: नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर; झाडावरच कापसाला फुटले मोड

author img

By

Published : Oct 16, 2020, 10:56 AM IST

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी झाली. परिणामी मराठवाड्यासह, पश्चिम, मध्य महाराष्ट्रात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. अनेक पिके पाण्याखाली गेली आहेत. नांदेड जिल्ह्यातही सोयाबीन आणि कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी आता सोयाबीन आणि कपाशीला मोड येऊ लागले आहेत.

damage-cotton-crop-in-nanaded
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर

नांदेड- जिल्ह्यात अतिवृष्टीने कहर केला असून सोयाबीन आणि कापसाचे अतोनात नुकसान झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे जिल्ह्यात अनेक शिवारातील वेचणीस आलेल्या कापसाला झाडावरच मोड आल्याचे दृश्य पाहायला मिळाले आहे. या अस्मानी संकटामुळे पिकांचे नुकसान झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे तत्काळ नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

जिल्ह्यात चार महिन्याच्या कालावधीत अतिवृष्टी, पुरामुळे सोळा तालुक्यातील पाच लाख ६३ हजार ७२ शेतकऱ्यांना फटका बसला. त्यामध्ये तीन लाख ६१ हजार १२८ हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले. हंगामी पिकांसह बागायती व फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या 'एनडीआरएफ' च्या निकषानुसार २४६ कोटी ३७ लाख २९ हजार २५६ रुपयांची मागणीही प्रशासनाकडून करण्यात आली आहे. या नुकसानीत अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे.

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर
दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या अगोदर परत फिरणारा पावसाचा यावर्षी मुक्काम लांबल्याने शेतातील वेचणीस आलेला कापूस व काढणीस आलेल्या सोयाबीनच्या शेतात पाणी साचल्याने या पिकांना मोड फुटली आहेत. जिल्ह्यात गत दिवसांपासून परतीच्या पावसाने परिसरात जोर धरला असून अगोदरच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे पाय अजून खोलात गेले आहेत. शेतकऱ्यांनी कापूस वेचणीला नेमकीच सुरुवात केली होती. त्यातच सारखा पाऊस पडत असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस मातीमोल झाला आहे. उर्वरित असलेले बोंडे काळी पडून नासायला लागली असून झाडांवरच कापसाला मोड फुटली आहेत. सोयाबीनच्या बाबतीत तर यापेक्षा भयानक स्थिती असून शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून काढणी करणेही अवघड होऊन बसले आहे.सततच्या पावसाने कापसाचे अतोनात नुकसान झाले. वेचलेला कापूस उन्हामध्ये वाळवा लागतो.बोंडे सडली असून झाडावरच मोड फुटायला सुरुवात झाली आहे. कापूस भिजल्याने शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.