नागपूर: नवनिर्वाचित आमदार सुधाकर अडबाले हे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नेते असून मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातले आहेत. गणिताचे शिक्षक असलेले अडबाले सुरुवातीपासूनच काँग्रेस विचाराच्या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाशी जुळलेले आहेत. गेले अनेक वर्ष ते या निवडणुकीची तयारी म्हणून शिक्षकांसाठी काम करत होते. जुन्या पेन्शन योजनेसाठी त्यांनी अनेक आंदोलन केली. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळेला मोठा मोर्चा काढून त्याचे नेतृत्व केले होते. महाविकास आघाडी आणि काँग्रेसने त्यांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी खूप उशीर लावला असला, तरी अडबाले आधीपासूनच सर्व तयारी करून होते. परिस्थितीचा अंदाज घेऊनच काँग्रेसने आणि महाविकास आघाडीने त्यांना अखेरच्या क्षणी पाठिंबा जाहीर केला.
जुन्या पेन्शनचा मुद्दा ठरला गेमचेंजर: विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची गेल्या अनेक वर्षांची तयारी, जुनी पेन्शनचा भावनिक विषय आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा शिवाय गाणारांबद्दलची अँटी इन्कमबन्सी हे अडबाले यांच्या विजयात महत्त्वाचे ठरले आहे. जुनी पेन्शन योजनेला सत्ताधाऱ्यांनी स्पष्टपणे नकार दिल्यामुळे नाराज शिक्षकांनी मतांच्या स्वरूपात आपली नाराजी व्यक्त केली आहे.
पराभव मान्य- नागो गाणार : मतदारांनी दिलेला कौल मला मान्य आहे. मी माझा पराभव मान्य करतो, अशा शब्दात माजी आमदार नागो गाणार यांनी पराभवानंतर अगदी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली. जुनी पेंशन योजना मुद्दा पराभवासाठी कारणीभूत ठरला असून यापुढे याच विषयाला धरून काम करत राहणार अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
पदवीधरनंतर शिक्षण मतदारसंघ भाजपने गमवला: अनेक दशके भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघात पराभवाची नामुष्की पचवल्यानंतर शिक्षण मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष धडा घेईल आणि जुन्या चुका पुन्हा करणार नाही असं वाटतं असताना नियोजन शून्य कारभाराचा फटका नागपूर विभाग शिक्षण मतदारसंघाची जागा गमावून भाजपला बसला आहे.
कार्यकर्त्यांचा जल्लोष: नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक निकालाची प्रतीक्षा संपली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबालें यांचा विजय झाल्याने अडबाले समर्थकांनी जल्लोष करण्यात सुरुवात केली आहे. कार्यकर्त्यांनी ढोलताश्याच्या गुजरात गुलालाची उधळण सुरू केली आहे. सुधाकर अडबाले यांनी पहिल्या फेरीत पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण करताच कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे.
हेही वाचा : Ram Janmabhoomi Ayodhya: अयोध्येतील राम जन्मभूमीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलीस अलर्टवर