ETV Bharat / state

कुस्तीपटू खाशाबा जाधव यांची जयंती 'क्रीडा दिन' म्हणून साजरी करणार, राज्य सरकारची घोषणा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 30, 2023, 9:03 PM IST

Khashaba Jadhav : राज्य सरकारनं महान कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या कामगिरीची दखल घेत, त्यांची जयंती 'राज्य क्रीडा दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह सरकारनं प्रत्येक जिल्ह्याला देण्यात येणाऱ्या क्रीडा अनुदानातही वाढ केली.

Khashaba Jadhav
Khashaba Jadhav

मुंबई Khashaba Jadhav : भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू खाशाबा जाधव यांची जयंती 'राज्य क्रीडा दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. खाशाबा जाधव यांचं क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदान लक्षात घेत राज्य सरकारनं हा निर्णय घेतला. "आता यापुढे १५ जानेवारी हा दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाईल. यामुळे क्रीडापटूंच्या वर्तमान आणि भावी पिढ्यांना क्रीडा क्षेत्रात उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी प्रेरणा मिळेल", असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली.

क्रीडा अनुदानात वाढ : राष्ट्रीय क्रीडा दिन आणि क्रीडा सप्ताह साजरा करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आतापर्यंत १० हजार रुपयांचं अनुदान देण्यात येत होतं. आता यात वाढ करून प्रत्येक जिल्ह्याला ७५ हजार रुपयांचं अनुदान देण्यात येणार आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनासाठी ५० हजार तर क्रीडा सप्ताहासाठी १ लाख रुपये, असे एकूण २ लाख २५ हजार रुपये सुधारित अनुदान देण्याबाबतचा शासन निर्णयही घेण्यात आला.

खाशाबा जाधव यांचा परिचय : महान कुस्तीपटू खाशाबा जाधव (१५ जानेवारी १९२६ - १४ ऑगस्ट १९८४) यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील गोळेश्वर या छोट्याशा गावात झाला होता. इतिहासात ते स्वतंत्र भारतातील पहिले क्रीडापटू म्हणून ओळखले जातात. त्यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात देशासाठी पहिलं वैयक्तिक कांस्यपदक जिंकलं होतं. खाशाबा जाधव यांना महाराष्ट्र सरकारचा मरणोत्तर छत्रपती पुरस्कार (१९९२-९३) आणि केंद्र सरकारचा अर्जुन पुरस्कार (२०००) मिळाला आहे. याशिवाय २०१० मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्सच्या कुस्ती मार्गाला त्यांचं नाव देण्यात आलं होतं.

हे वाचलंत का :

  1. यावर्षी टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज कोणते, एक सिंहावलोकन
  2. सरत्या वर्षाच्या आयपीएल लिलावात 'हे' १० खेळाडू रातोरात बनले कोट्यधीश, पाहा संपूर्ण यादी
  3. 'आता पुरस्कारांची किळस येतेय', बजरंग पुनिया पाठोपाठ विनेश फोगटनंही केली पुरस्कार परतीची घोषणा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.