ETV Bharat / state

राफेल घोटाळ्याच्या चौकशीला मोदी सरकार का घाबरते? -नाना पटोले

author img

By

Published : Jul 3, 2021, 8:24 PM IST

राफेल खरेदी व्यवहाराची चौकशी व्हावी ही सातत्याने काँग्रेसची मागणी आहे. परंतु मोदी सरकारने हे प्रकरण चौकशीविनाच गुंडाळले आहे. हा संपूर्ण व्यवहारच संशयास्पद आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

मुंबई - राफेल फायटर जेटच्या व्यवहारात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप सातत्याने काँग्रेसकडून केला जातोय. राफेल खरेदी व्यवहाराची चौकशी व्हावी ही सातत्याने काँग्रेसची मागणी आहे. परंतु मोदी सरकारने हे प्रकरण चौकशीविनाच गुंडाळले आहे. हा संपूर्ण व्यवहारच संशयास्पद असल्याने, फ्रान्स सरकारने आता या राफेल घोटाळ्याच्या चौकशीला सुरुवात केली असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. या प्रकरणात करोडो रुपयांचा घोटाळा झाला असून, फ्रान्समध्ये चौकशी होऊ शकते, तशी भारतातही या घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

'ही विमाने महाग कसे झाले?'

मोदी सरकारने २०१६ मध्ये फ्रांसच्या डसॉल्ट एव्हिएशन कंपनीकडून ३६ राफेल विमानांची खरेदी केली. काँग्रेसच्या काळात जे'विमान ५२६ कोटी रूपयांना खरेदी करण्याचे ठरले होते. तेच विमान मोदी सरकारने १६७० कोटी रूपयांना खरेदी केले. काँग्रेस सरकारने १२३ राफेल खरेदीचा व्यवहार करत होते. पण मोदी सरकारने तर ३६ राफेलचाच व्यवहार केला आणि जनतेच्या तिजोरीतून ४१ हजार २०५ कोटी रूपये अतिरिक्त मोजले. ही विमाने महाग का झाली? असा सवाल काँग्रेसकडून केला जातोय. या राफेल खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. फ्रान्समध्ये राफेल घोटाळ्याची चौकशी सुरु झाली आहे, या चौकशीत फ्रान्सच्या आजी-माजी राष्ट्राध्यक्षांची चौकशी होणार आहे. मग, भारतातच चौकशीला मोदी सरकार का घाबरत आहे? असा प्रश्नही नाना पटोले यांनी विचारला आहे.

'खासदार राहुल गांधी यांनी सातत्याने आवाज उठवला'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदुस्थान एरॉनॉटिक्स या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीला मिळणारे ३० हजार कोटींचे कंत्राट, राफेल खरेदी कराराच्या १२ दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या रिलायन्स डिफेन्स या खाजगी कंपनीला दिले. त्यामध्ये १ लाख कोटी रुपयांचे लाईफ सायकल कंत्राट देऊन, अनिल अंबानीचा फायदा करुन दिल्याचा आरोपही पटोले यांनी केला आहे. राफेल विमान खरेदी प्रकरणी खासदार राहुल गांधी यांनी सातत्याने आवाज उठवून चौकशीची मागणी केली होती. काँग्रेस पक्षानेही या खरेदी व्यवहाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. चौकशी केल्यास या प्रकरणाचे सत्य समोर येऊन खरे चोर सापडतील, असे नाना पटोले म्हणाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.