ETV Bharat / state

तौक्ते चक्रीवादळ : मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्यामध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक

author img

By

Published : May 16, 2021, 1:05 PM IST

Updated : May 16, 2021, 3:23 PM IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सकाळी साडेअकरा वाजता मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सोबत चर्चा केली. यामध्ये शाह यांनी किनारपट्टी भागातील परिस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांना सुरक्षीत स्थळी हलवणे, बचाव पथके तैनात करण्यासह वादळाने होणाऱ्या संभाव्य नुकसानीबाबत त्यांनी जाणून घेतले.

मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक
मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक

मुंबई - अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळामुळे सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोरोना परिस्थितीत रुग्णालयांचा विद्युत पुरवठा खंडित होऊ नये, तसेच ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहील यादृष्टीने अगोदरच तयारी करून ठेवली असून प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत दिली. आज सकाळी दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्र्यांनी महाराष्ट्र, गुजरातचे मुख्यमंत्री तसेच दादर नगर हवेलीचे प्रशासक यांच्याकडून तयारीचा आढावा घेतला.

चक्रीवादळात नुकसान होऊ नये म्हणून राज्य शासनाने केलेल्या तयारीबाबत सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, रुग्णालयांचा वीज पुरवठा खंडित होणार नाही, तसेच बॅकअप यंत्रणा लगेच कार्यान्वित होईल व रुग्णांच्या उपचारांत अडथळा येणार नाही यासाठी सावध राहण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. जम्बो व इतर कोविड केंद्रे ही पावसापासून संरक्षण करणारी असली तरी मोठे वादळ झाल्यास समस्या उद्भवू शकते, हे लक्षात घेऊन सावधगिरी म्हणून मुंबई तसेच इतरत्रही या केंद्रांतील रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले आहे. सध्याच्या काळात ऑक्सिजनची गरज लक्षात घेता सागरी किनाऱ्यांवरील ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या प्रकल्पांमधील उत्पादन व वाहतूक सुरळीत सुरु राहील यासाठी नियोजन केले आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस यांना विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. किनाऱ्यांवरील कच्च्या घरांतील लोकांना दुसरीकडे हलविण्यात आल्याचेही ते म्हणाले. मंत्रालय नियंत्रण कक्ष सज्ज असून इतरही जिल्ह्यातील नियंत्रण कक्षांशी त्यांचा व्यवस्थित समन्वय आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी देखील विस्तृत माहिती दिली ते बोलताना म्हणाले की, सागरी किनाऱ्याजवळील डोलवी जेएसडब्ल्यू ( २३० मेट्रिक टन), डोलवी आयनॉक्स ( १२० मेट्रिक टन), लिंडे तळोजा ( २४५ मेट्रिक टन), आयनॉक्स रायगड (१२० मेट्रिक टन), लिंडे प्राक्स एअर मुरबाड ( १२० मेट्रिक टन) असे साधारणत: ९०० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन करणारे प्रकल्प सुरक्षित राहतील याबाबत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर जिल्हाधिकारी तसेच मुंबई महानगरपालिका आयुक्त यांना सूचना देण्यात आल्या आहेत. सागरी किनाऱ्याच्या अगदी जवळ डोलवीचा ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प आहे. येथील डबल फिडर विद्युत पुरवठा आणि मजबूत वायरिंग यामुळे चक्रीवादळाच्या तीव्रतेतही नुकसान होणार नाही. तरी देखील महावितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम तसेच प्रकल्पातील कर्मचाऱ्यांना दक्ष राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक
मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक

'ऑक्सिजन पुरवठ्यासाठी पर्यायी व्यवस्था'

अपवादात्मक परिस्थितीत डोलवी किंवा इतर कुठल्याही ऑक्सिजन प्रकल्पामध्ये काही समस्या उद्भवली तर पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. चक्रीवादळाचा परिणाम होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये किमान १२ ते १६ तासांचा ऑक्सिजन बॅक अप देण्याची व्यवस्था केली आहे. जामनगरहून १६० मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा टँकर्सद्वारे उद्यापर्यंत पोहोचत आहे. जामनगर येथेही १८ मे रोजी चक्रीवादळ धडकण्याची शक्यता असल्याने जामनगर प्रकल्पात जर काही प्रश्न उद्भवल्यास डोलवी, मुरबाड, तळोजा आणि भिलाईहून राखीव साठा मागवता येईल. पुणे येथे ३० ते ४० मेट्रिक टन जादा ऑक्सिजन साठा आहे, काही प्रश्न उद्भवल्यास अंगुलहून ६० मेट्रिक टन आणि भिलाईहून जादा साठा आणून भरपाई करण्यात येईल. जे प्रकल्प सुस्थितीत आहेत तिथूनही जादा साठ्याची व्यवस्था करता येईल.

मच्छिमारांना चक्रीवादळासंदर्भात इशारा

सागरी जिल्ह्यातील मच्छिमारांना यापूर्वीच चक्रीवादळासंदर्भात आगाऊ इशारा देण्यात आला असून, ते सर्व बोटींसह किनाऱ्यांवर परतले आहेत. पालघरमधील काही मच्छिमार परतत आहेत. किनाऱ्यांवरील कच्ची घरे रिकामी करण्यात आली आहेत. किनारी भागातील कुठलीही आरोग्य यंत्रणा कच्च्या घरात/ बांधकामात नाही हे पाहण्यात आले आहे. सागरी किनाऱ्यावरील जिल्ह्यांमध्ये कोविड तसेच नॉन कोविड रुग्णांसाठी पुरेशा प्रमाणात औषधी उपलब्ध आहेत, यात रेमडेसिवीर, फेवीपिरावीर, मिथाइल प्रेडनिसोलोन, डोक्सीसिलीन, पॅरासिटामोल, हेप्रीन, एम्फोटेरीसीन बी आणि चाचणी किट्स, पीपीई इत्यादी पुरेशा प्रमाणात असतील हे पाहण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी कुंटे यांनी दिली.

Last Updated : May 16, 2021, 3:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.