ETV Bharat / state

Uddhav Thackeray on ECI Decision : निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, 'आजचा निकाल हा गुलामशाहीतून..

author img

By

Published : Feb 17, 2023, 9:14 PM IST

Updated : Feb 17, 2023, 10:59 PM IST

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, नामर्दांनो तुम्हाला ही चोरी पचणार नाही. तसेच निवडणूक आयोगाने दिलेला हा निकाल गुलामशाहीतून दिलेला आहे. निवडणूक आयोगाच्या या निकाला विरूद्ध आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC

उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत बोलताना

मुंबई: निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव शिवसेना तसेच पक्षाचे चिन्ह धणुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे कायम ठेवले आहेत. यावर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या निकालावरून जोरदार टीका केली. निवडणूक आयोगाचा निकाल लोकशाहीसाठी घातक असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत बोलताना

प्रमाणपत्रांचा खटाटोप कशासाठी: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह मुख्यमंत्री शिंदे गटाला दिल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर सडकून टीका केली. निवडणूक आयोगाचा निर्णय अपेक्षित होता. हाच निर्णय द्यायचा होता, तर सुरुवातीला द्यायचा. प्रमाणपत्र मागवण्याचा खटाटोप कशासाठी केला, असा सवाल ठाकरे यांनी आयोगाला विचारला आहे. शिंदे गटावरही यावेळी जोरदार हल्लाबोल चढवला.


न्याययंत्रणा ताब्यात घेण्याचे प्रयत्न: निवडणूक आयोगाच्या निकालावरून हेच दिसून येते की, न्याययंत्रणा आपल्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न सरकार करत आहे. आजचा निकाल अत्यंत अनपेक्षित आहे. जशी न्यायधीश निवडीची प्रक्रिया तशीच निवडणुक आयुक्तांच्या बाबतीत असायला हवी. मी निवडणुका घेण्याचे आव्हान केले आहे. मुंबईवर ताबा मिळवण्याची भाजपची रणनिती असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच निवडणूक आयोगाने दिलेला हा निकाल गुलामशाहीतून दिलेला आहे, असेही ते म्हणाले.

शिवसेनाप्रमुखाचा धनुष्यबाण माझ्याकडेच: शिवसेनाप्रमुखांनी पुजलेला धनुष्यबाण आजही माझ्याकडेच आहे. १०० कौरव एकत्र आले तरी पांडव जिंकले. महाराष्ट्रातील जनता याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. सर्वोच्च न्यायालयात आम्ही जिंकू अशी आम्हाला अपेक्षा आहे. चोरी पचली तरी चोर चोरच असतो तसेच निवडणूक आयोगाच्या निकालावर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. तोवर त्यांना पेढे खाऊ द्या, शिवसैनिकांनो खचून जाऊ नका, असेही आवाहन त्यांनी केले आहे.


निवडणूक आयोगाने शेण खाल्ले: ठाकरे पुढे म्हणाले की, आम्ही न्यायालयाला विनंती केली होती की निवडणूक आयोग गडबड करणार आहे. आमचा सर्वोच्च न्यायालयावर आमचा नितांत विश्वास आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या प्रकरणावर जगाचे लक्ष आहे. हे सगळे लोकशाही विरोधी कृत्य आहे. यामुळे परकीय गुतंवणूकदार पण याकडे बघत आहेत. गेले काही दिवस निवडणुक आयोगाचे थोतांड आपण बघत आहोत. आम्ही शपथपत्र, अर्ज लाखोंच्या संख्येने. निवडणुक आयोगाने आज शेण खाल्ले, अशी खोचक प्रतिक्रिया देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून काय म्हणाले ठाकरे? : उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, हिंदुत्वाचा त्याग केला म्हणजे काय केले? भाजपने पाठीत वार केला म्हणून मी काँग्रेस सोबत गेलो. उद्या त्यांनी नमाज पढले तरी ते हिंदू का? बाळासाहेबांचे विचार गुलामी करण्याचे नाहीत. आम्ही पोटनिवडणुक जिंकलो, यावरून आमचे हिंदुत्व काय आहे दिसून आले. महाराष्ट्रात मोदी हे नाव चालत नाही. आता बाळासाहेब चोरले. तुम्ही पोटनिवडणुक का नाही लढले, असाही सवाल त्यांनी केला आहे.

लोकशाहीसाठी एकत्र या: शिवसेना त्यांना मिळाली पण त्यांना नेतेपद मिळवून देणारे माझ्यासोबत आहेत, असे ठाकरे यांनी सांगितले. देशातील जनतेने या दडपशाहीविरूद्ध आवाज उठवला पाहिजे. देशात लोकशाही अस्तित्वात रहावी यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.

सामान्य जनता माझ्यासोबत: येणाऱ्या भविष्यकाळात तुम्ही कसे सामोर जाणार आहात असे त्यांना विचारले असता ते म्हणाले की, नेते तर चालले गेल पण नेता बनवणारी शक्ती माझ्यासोबत आहे. शिवसैनिक व राज्यातील सामान्य जनता माझ्यासोबत आहेत. यासोबतच शिवसैनिकांनो खचून जाऊ नका, असेही त्यांनी सांगितले.

मुंबई पालिका जिंकण्याचे त्यांचे लक्ष्य: उद्धव ठाकरे म्हणाले की, आज आमच्या मिंधे गटाची व भाजपची दयनीय अवस्था झाली आहे. त्यांच्याच स्वतः लढण्याची हिंमत नाही, म्हणून निवडणूका घ्या असे अनेकदा मी सांगितले आहे. मात्र ज्या पद्धतीने शिवसेना आणि धनुष्यबाण मिंधे गटाला दिलेले आहे, त्यानुसार कदाचित येत्या काही दिवसात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका जाहीर होऊ शकतात. त्यांचे लक्ष्यच मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकायचे आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली.

हेही वाचा: Shivsena Party Name Symbol : उद्धव ठाकरेंच्या हातून गेली शिवसेना; पक्षाचे नाव-चिन्ह धणुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे

Last Updated : Feb 17, 2023, 10:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.