ETV Bharat / state

एसटी महामंडळाचा अजब कारभार, प्रशिक्षणार्थी कामगारांना वेतन नाही

author img

By

Published : May 18, 2021, 9:56 PM IST

एसटी महामंडळात सरळ सेवेत भरती झालेल्या कामगारांना 180 दिवसांपर्यंत प्रशिक्षणार्थी विद्या वेतनावर काम करावे लागते. मात्र, कोरोनाचे कारण देत या कामगारांची संचारबंदी कालावधीची अनुपस्थिती लावत एसटी महामंडळाने या कामगारांना वेतन दिलेले नाही. त्यामुळे काम करुनही या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई - एसटी महामंडळात सरळ सेवेत भरती झालेल्या कामगारांना 180 दिवसांपर्यंत प्रशिक्षणार्थी विद्या वेतनावर काम करावे लागते. मात्र, कोरोनाचे कारण देत या कामगारांची संचारबंदी कालावधीची अनुपस्थिती लावत एसटी महामंडळाने या कामगारांना वेतन दिलेले नाही. त्यामुळे काम करुनही या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. परिणामी, मागील कालावधीत देण्यात आलेल्या लॉकडाऊन उपस्थितीप्रमाणे या वेळीही सर्व कर्मचार्‍यांना वेतन अदा करण्याची मागणी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने केली आहे.

तिन्ही श्रेणीत कामगारांना वेतन नाही

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले की, सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावात मुंबईसारख्या कोरोना हॉटस्पॉटमध्ये एसटी कर्मचारी आपल्या जीवावर उदार होऊन रात्रंदिवस काम करत आहेत. आत्तापर्यंत 7 हजार 500 पेक्षा जास्त कर्मचारी कोरोनाने बाधित झाले असून जवळपास 225 कर्मचारी मृत झाले आहेत. पण, मृतांच्या सर्वच वारसांना 50 लाखांचे विमा कवच व अनुकंपा तत्त्वावर अद्याप नोकरी मिळालेली नाही. तसेच जे कोरोनाने बाधित आहेत त्यांना वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्तीही अद्याप मिळालेली नाही. तसेच तात्पुरत्या समय वेतन श्रेणीवरील (टीटीएस) व रोजंदार (डीडब्यूएस) कर्मचाऱ्यांना वेतनही मिळणार नाही. त्यांनी आपला उदर निर्वाह कसा करावा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. लॉकडाऊनपूर्वी हे सर्वच कर्मचारी नियमित कामासाठी वापरण्यात येत होते. कोणत्याही विभागात मंजुरी पेक्षा जास्त कर्मचारी नियुक्ती नाही. आता कोरोना महामारीमुळे वाहतूक बंद आहे. यात कामगारांचा काहीही दोष नाही, असे संदीप शिंदे यांनी सांगितले.

...कामगारांमध्ये भेदभाव करू नका

कोरोना विषाणू ही जागतिक महामारी आहे. बहुतांशी विभागात नोकरी करीत असलेले कर्मचारी हे जिल्ह्याबाहेरचे आहेत. नोकरीच्या ठिकाणी ते भाड्याने राहतात. त्यांच्या मुलांचे शिक्षणही कामाच्या ठिकाणी सुरू आहे. अशा परिस्थितीत तो कामगार रोजंदार व टीटीएस आहे म्हणून त्याला संचारबंदीमध्ये वेतनापासून वंचित ठेवल्यास त्याच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येणार आहे. याशिवाय मुलांचे शिक्षणही अर्धवट राहणार आहे. मागील लॉकडाऊनवेळी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी देशातील व राज्यातील कोणीही कामगार वेतनापासून वंचित राहणार नाही, असे जाहीर आवाहन केले होते. त्याप्रमाणे मागील लॉकडाऊन कालावधीत कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन अदा करण्यात आले आहे. शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये रोजंदार, कायम असा भेदभाव न करता लॉकडाऊनची उपस्थिती दिली जाते. त्याच धर्तीवर महामंडळातील सर्वच कर्मचार्‍यांना लॉकडाऊन उपस्थिती देणे आवश्यक आहे, अशी माहिती महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली आहे.

कामगारांचा दोष नाही

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार एसटीची वाहतूक बंद आहे. अन्यथा सर्वच कामगारांना कामगिरी मिळाली असती. वाहतूक बंदमध्ये कामगारांचा दोष नाही. कोरोना महामारी ही जागतिक नैसर्गिक आपत्ती आहे. संदर्भित परिपत्रकाप्रमाणे जर फक्त नियमित समय वेतनश्रेणीतील कर्मचाऱ्यांना लॉकडाऊनची उपस्थितीत देण्‍यात आली तर रोजंदार कर्मचाऱ्यांना त्यांचे जीवन जगणे असह्य होणार आहे. मागील लॉकडाऊनच्या कालावधीत देण्यात आलेल्या लॉकडाऊन उपस्थितप्रमाणे या वेळीही लॉकडाऊन संचारबंदी कालावधीची उपस्थिती सर्वच कर्मचार्‍यांना देऊन वेतन अदा करण्याबाबत सुधारित परिपत्रकीय सूचना प्रसारित केल्यास कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही व त्यांच्यावर उपासमारीची वेळही येणार नाही, असेही शिंदे यांनी म्हटले.

हेही वाचा - नौदल बचावकार्य आतापर्यंत 180 जणांना वाचण्यात यश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.