ETV Bharat / state

Memorial of Lata Mangeshkar : शिवाजी पार्क येथे लतादीदींचे स्मारक उभारण्याच्या चर्चेमुळे रंगले राजकारण

author img

By

Published : Feb 8, 2022, 10:32 AM IST

भारतरत्न लता मंगेशकर (Bharat Ratna Lata Mangeshkar) यांचे रविवारी निधन झाले. त्यानंतर त्यांच्यावर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. यावर आता त्यांचे स्मारक शिवाजी पार्क मैदानावर उभारले जावे या मागणीने जोर धरला आहे. या मागणीला काही लोकांनी विरोध केल्याने आता राजकारण रंगताना दिसत आहे.

Lata Mangeshkar
Lata Mangeshkar

मुंबई - दादर येथील शिवाजी पार्क मैदानात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळ उभारण्यात आले आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर लता दिदींचे स्मृतीस्थळ (Memorial of Lata Didi) येथे उभारावे, ही मागणी जोर धरू लागली आहे. तर दुसरीकडे स्थानिकांकडून स्मृती स्थळाला विरोध होत आहे. मात्र अद्याप याबाबत स्पष्टता नाही. परंतु राजकिय पक्षांनी स्मृती स्थळावरून आतापासूनच राजकारण ढवळून काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी काळात लता दिदींचे स्मारक बनेल का, याबाबत सांक्षकता निर्माण झाली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी पार्क यांचे अतूट नाते आहे. शिवाजी पार्कशी त्यांची जुळलेली नाळ त्यांनी शेवटपर्यंत कायम जपली. मराठी माणसाच्या हक्कासाठी बाळासाहेबांनी काम केले. बहुतांश सभा शिवाजी पार्क येथील मैदानात (Shivaji Park Grounds) गाजवल्या. त्यामुळे बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांच्यावर शिवाजी पार्कात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढे स्मृती स्थळ देखील शिवाजी पार्कमध्ये उभारले. बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित अनेक जण अभिवादन करण्यासाठी येथे येतात.

लता मंगेशकर यांचे रविवारी निधन (Lata Mangeshkar passes away) झाले. गाण्याच्या माध्यमातून लता दीदींनी अनेकांच्या मनामध्ये आपले स्थान निर्मान केले आहे. दिदींच्या जाण्यामुळे देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच बाळासाहेबांवर केलेल्या अंत्यसंस्कार ठिकाणापासून काही अंतरावर लता दीदींवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार केल्या गेलेल्या लता मंगेशकर या बाळासाहेबांनंतरच्या दुसऱ्या व्यक्ती आहेत. त्यामुळे लता दिदींचे स्मारक उभारावे (Memorial of Lata Didi at Shivaji Park) अशी मागणी जोर धरू लागली आहे. परंतु, शिवाजी पार्क ही फक्त मोकळी जागा नाही. अनेक घटनांची ही जागा मूक साक्षीदार आहे. इतिहासाशी आपल्याला जोडणारा दुवा म्हटलं तरी वावग ठरणार नाही. लतादीदींचं स्मारक कुठे आणि कसं व्हावे यावरून येत्या काळात वाद रंगणार आहे.

भाजप आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र -

भारतरत्न लता दीदींचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात शिवाजी मैदान दादर, मुंबई येथे करण्यात आले. म्हणूनच लतादीदींच्या कोट्यावधी चाहत्यांच्या, संगीतप्रेमींच्या आणि हितचिंतकांच्या वतीने माझी नम्र विनंती आहे की, दिवंगत भारतरत्न लतादीदींचे शिवाजी पार्कमध्ये त्यांचे स्मारक उभारले जावे. त्यामुळे जनतेच्या या मागणीचा मान राखून हे स्मारक तात्काळ उभारावे. जेणेकरून हे ठिकाण जगाचे प्रेरणास्थान होईल. अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. माझीच नव्हे तर करोडो चाहत्यांची इच्छा असल्याचे म्हणाले आहेत.

राजकारण करू नका - संजय राऊत

लता दीदींना कधीही विसरता येणार नाही. काहींनी पार्कात स्मारक बनवण्याची मागणी केली आहे. मात्र मागणीची गरज नाही, यावर राजकारण करू नका. लता दिदींच्या स्मारकाबाबत देशाने विचार करण्याची गरज आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.

शिवाजी पार्कात स्मारक व्हावे -

लतादीदी यांचे स्मारक हे शिवाजी पार्कलाच व्हावं आणि चांगल्या दर्जाचं व्हावं, आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्हावं. देशातून आणि जगातून येणाऱ्या लोकांना लतादीदींच्या स्मारकाला गेल्यानंतर लतादीदींचा गोड आवाज कालच्या, आजच्या आणि उद्याच्या पिढीला स्मरणात राहील. अशा दर्जाचे स्मारक शिवाजी पार्क मध्ये व्हावं ही काँग्रेसची भूमिका आहे, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले. लतादीदी या काँग्रेस परिवारातल्याच होत्या त्यांचे खुप मोठे योगदान आहे, असे नाना पटोले म्हणाले.

स्मारक शिवाजी पार्क येथे व्हायला हरकत नाही, मात्र ते एका बाजूला आणि खेळण्याची जागा सोडून बाजूला स्मारक असायला हरकत नाही. असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. काहींनी लतादीदींचं स्मारक पेडर रोडला किंवा त्यांच्या वास्तव्य ठिकाणी बनवून ते सर्वांसाठी खुलं करावे, अशी रहिवाशांचे म्हणणे आहे.

शिवाजी पार्क हे शिवाजी पार्कच राहावे - प्रकाश आंबेडकर

शिवाजी पार्कवर स्मारक करण्याबाबत भाजपने मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केला आहे. मात्र अनेकांकडून विरोध दर्शविला जातो आहे. प्रकाश आंबेडकर यांनी देखील, शिवाजी पार्क हे शिवाजी पार्कच राहावे, त्याची स्मशानभूमी करु नये, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे लतादीदींच्या स्मारकावरून सध्या राज्यात राजकारण रंगताना दिसत आहे.
स्मारक बनवणं सरकारला तसं अवघड नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृती स्थळ उभारले आहे. शासन आणि राजकीय पक्षांची इच्छाशक्ती असेल तर स्मारक होऊ शकतं. परंतु या विरोधात कोणी न्यायालयात गेल्यास कायदेशीर बाबी निर्माण होऊ शकतात. तसं झालं तर स्मारक उभारण्याचा तिढा निर्माण होऊ शकतो, असे ऍड. प्रशांत गायकवाड यांनी सांगितले.

राजकारणासाठी शिवाजी पार्क बळी देऊ नका - संदीप देशपांडे

  • छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे मैदान दादर वासीयांनी खेळण्यासाठी अनेक वेळा संघर्ष करून अतिक्रमणा पासून वाचवलं आहे. तुमच्या राजकारणासाठी त्याचा बळी देऊ नका ही विनंती.

    — Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) February 8, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे मैदान दादर वासीयांनी खेळण्यासाठी अनेक वेळा संघर्ष करून अतिक्रमणा पासून वाचवलं आहे. तुमच्या राजकारणासाठी त्याचा बळी देऊ नका ही विनंती, मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.