ETV Bharat / state

समुद्राचे खारे पाणी गोडे केले जाणार; इस्त्रायलच्या कंपनीला काम

author img

By

Published : Feb 9, 2021, 4:12 AM IST

मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी इस्रायली कंपनीने मुंबई महापालिकेकडे समुद्रातील खारे पाणी गोडे करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाला पालिकेच्या स्थायी समितीकडून काल मंजुरी देण्यात आली. मात्र, ही मुंबईकरांच्या पैशांची उधळपट्टी असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

Mumbai Municipal Corporation
मुंबई महापालिका

मुंबई - मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी इस्रायली कंपनीने मुंबई महापालिकेकडे समुद्रातील खारे पाणी गोडे करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाला पालिकेच्या स्थायी समितीकडून काल मंजुरी देण्यात आली. मात्र, ही मुंबईकरांच्या पैशांची उधळपट्टी असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. भाजपने याबाबत नंतर भूमिका जाहीर करण्याचे म्हटले, तर मुंबईकरांना मुबलक पाणी मिळेल, असे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी म्हटले.

माहिती देताना भाजप प्रवक्ते, मुंबई महापालिकेतील विरोधी पक्ष नेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष

हेही वाचा - मुंबई महापालिका अर्थसंकल्पाच्या सभा प्रत्यक्ष घ्या - भाजप गटनेते प्रभाकर शिंदे

सल्लागारांची नियुक्ती केली जाणार

मुंबईत सुमारे दिड कोटी नागरिक राहतात. त्यांना पालिकेकडून दर दिवशी 3 हजार 750 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. नागरिकांची संख्या वाढत असताना रोज ४ हजार ५०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. त्यामुळे, पालिकेने समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतर करण्याची तयारी चालविली आहे. समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतर करण्यासाठी सल्लागारांची नियुक्ती केली जाणार असून त्यासाठी ६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. प्रकल्पाला एकूण ३ हजार ५०० कोटींचा खर्च येणार आहे. या कामासाठी इस्रायलमधील कंपनीने स्वारस्य दाखविले असून प्रतिदिन २०० दशलक्ष लीटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव पालिकेचा आहे.

सहा हेक्टर भूखंड लागणार

इस्रायलच्या एका कंपनीने या प्रस्तावासाठी सहा हेक्टर भूखंड लागणार असल्याचे म्हटले आहे. सुरुवातीला २०० दशलक्ष लीटर पाण्याचा प्रकल्प भविष्यात ४०० दशलक्ष लीटर एवढा करण्यासाठी एकूण आठ एकर भूखंड लागणार आहे. त्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी आठ महिने आणि प्रत्यक्ष बांधकाम पूर्ण होण्यास ३० महिन्यांचा कालावधी लागेल. प्रकल्प अहवालात भूपृष्ठीय सर्व्हेक्षण, भूभौतिक शास्त्रीय-समुद्र शास्त्रीय सर्व्हेक्षण, किनारपट्टी नियमन, क्षेत्रीय अभ्यास आदींचा समावेश असेल. या संपूर्ण दैनंदिन २०० दशलक्ष लीटर पाणी प्रक्रियेच्या प्रकल्पासाठी भांडवली खर्च म्हणून १ हजार ६०० कोटी आणि २० वर्षांसाठी १ हजार ९२० कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. या संपूर्ण प्रकल्पात इस्त्रायलच्या संबंधित कंपनीस सल्लागार म्हणून नेमले जाणार आहे. त्यानंतर स्विस चॅलेंज पद्धतीने निविदा मागविल्या जाणार आहेत. त्यात इस्रायलच्या कंपनीस सहभागी होता येणार आहे.

भाजप नंतर भूमिका घेणार

समुद्राचे पाणी गोड करण्याच्या कामाला भाजपने विरोध केला होता. भाजपचे आशिष शेलार यांनी टीकाही केली होती. मात्र, आज स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा न करता प्रस्तावाला मूक संमती दिली. याबाबत बोलताना, समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रस्ताव सादर झाला आहे. अद्याप निविदा निघाल्या नाहीत. यासाठी राज्य सरकारने समिती नेमली आहे. पाण्याचे दर ठरले की तसा प्रस्ताव स्थायी समितीत येईल. त्यावेळी, भाजप आपली भूमिका स्पष्ट करेल. मुंबईकरांना पाणी मिळाले पाहिजे, पण ते जास्त किंमत खर्च करून नको, असे भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी म्हटले.

काँग्रेसचा विरोध

मुंबईत पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो. हे पाणी रेनवॉटर हार्वेस्टिंग करून साठवण्याची गरज आहे. एखादा तलाव, धरण बांधून पावसाचे पाणी साठवण्याची गरज आहे. मात्र, असे न करता समुद्रातले पाणी गोड करण्याचा हा प्रकल्प यशस्वी होणार नाही. हे करदात्या मुंबईकरांच्या पैशांची उधळपट्टी आहे. या उधळपट्टीला काँग्रेसचा विरोध आहे, असे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी म्हटले.

पाण्याची तूट भरून निघेल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनापासून हा प्रस्ताव आणला आहे. मुंबईकरांना जी पाण्याची तूट भासत होती, ती यामधून भरून निघेल. मुंबईकरांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळेल, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली. तसेच, विरोधक टीका करत राहतात. आशिष शेलार यांनी विधानसभेचे आणि राज्याचे काम बघावे. त्यांच्या पक्षाचे नगरसेवक पालिकेत आहेत. त्यांना काम करू द्यावे. त्यांच्यावर विश्वास नसल्याचे दाखवू नये, असा टोला यशवंत जाधव यांनी लगावला.

हेही वाचा - भाजपला सोडचिट्टी देणाऱ्यांची संख्या वाढली; अनिल कदम यांनी बांधले शिवबंधन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.