ETV Bharat / state

नैसर्गिक मृत्यू झाल्याचे प्रमाणपत्र नसल्याने मृतदेह 9 तास राहिला घरातच

author img

By

Published : Apr 19, 2020, 8:02 AM IST

नागरिकांमध्ये कोरोनाच्याबाबत समाज माध्यमांवरील अफवांमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. या भीतीमुळेच नैसर्गिक मृत्यू झालेल्या एका 45 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह ९ तास घरातच पडून राहिला.

dead body
मृतदेह

मुंबई - कोरोना विषाणूने सर्वत्र विळखा घातला आहे. नागरिकांमध्ये या विषाणूच्याबाबत समाज माध्यमांवरील अफवांमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. या भीतीमुळेच नैसर्गिक मृत्यू झालेल्या एका 45 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह ९ तास घरातच पडून राहिला. कुटुंबातील व्यक्तींकडे नैसर्गिक मृत्यूचे प्रमाणपत्र नसल्याने आणि कोरोनाच्या भीतीने मृतदेहाजवळ कोणीही आले नाही.

विक्रोळी पार्क साईट येथील श्री गणेश सोसायटीतील रहिवासी संतोष गोगावले (वय 45) यांना उच्च रक्तदाब आणि अस्थमा आजार असल्याने राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी गेले होते. तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासणीकरून काही औषध देऊन घरी पाठवले. शनिवारी दुपारी 2 वाजता त्यांचा घरी नैसर्गिक मृत्यू झाला. कोरोना भीतीने मृतदेहाजवळ जवळ कोणी येण्यास तयार नव्हते. मृतदेहाजवळ 9 तास पत्नी, दोन मुले व आई रडत होती.

ही माहिती विभागातील माजी नगरसेवक सुधीर मोरे यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पार्क साईट पोलीस आणि पालिका अधिकाऱयांना याबाबत माहिती दिली. राजावाडी रुग्णालयातून सदरील व्यक्ती सामान्य आजारी असून कोविड-19 ची लागण झालेली नसून त्यावर नैसर्गिक अंत्यसंस्कार करावे असे त्यांना सांगण्यात आले. मात्र, अंत्यसंस्कार करण्यासाठी मृत्यू प्रमाणपत्राचा पुरावा पाहिजे होता. यासाठी पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी खासगी डॉक्टरकडून प्रमाणपत्र घ्यावे असे सुचवले.

कोरोनाच्या भीतीने खासगी रुग्णालयही सध्या बंद असल्याने पुन्हा एकदा पेच निर्माण झाला. वरिष्ठ पातळीवर अधिकाऱ्यांना माहिती कळवल्यानंतर राजावाडी रुग्णालयातील डॉक्टरांचे एक पथक रात्री 10 वाजता आले. त्यानंतर त्यांनी व्यक्तीचा मृतदेह वर्षानगर स्मशानभूमीकडे अंत्यसंस्कारासाठी नेला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.