ETV Bharat / state

राममंदिर उद्घाटनासाठी 'रामायणा'त लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्याचा मंदिर समितीला विसर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 30, 2023, 2:39 PM IST

Updated : Dec 30, 2023, 5:01 PM IST

Ram Mandir Inauguration
अयोध्येत राम मंदिर उद्घाटन

Ram Mandir Inauguration: अयोध्येत राम मंदिर उद्घाटनाच्या भव्य सोहळ्यासाठी हजारो सेलेब्रिटींना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. 'रामायण' या गाजलेल्या मालिकेत राम आणि सीतेची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनाही आमंत्रित करण्यात आलंय. मात्र यात लक्ष्मणाची भूमिका साकारलेल्या सुनील लाहिरीला वगळण्यात आलंय. उद्घाटनाचे आमंत्रण असते तर नक्की गेलो असतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

मुंबई - Ram Mandir Inauguration: अयोध्येत राम मंदिराच्या भव्य उद्घाटनाची तयारी जोरात सुरू आहे. प्रभू रामाच्या प्रतिमेची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी क्रीडा, चित्रपटसृष्टी, राजकारण आदी प्रांतातल्या दिग्गजांना निमंत्रित करण्यात आलंय. या यादीत 'रामायण' या लोकप्रिय मालिकेमध्ये रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांचाही समावेश आहे. याशिवाय सीता मातेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांनाही निमंत्रित करण्यात आलंय. भारतीय टेलिव्हिजनच्या प्रांतात इतिहास रचणाऱ्या 'रामायण' मालिकेचं गारुड अनेकांवर आजही कायम आहे. 'रामायण' मालिका सुरु झाली की लोक टी व्ही ला हार घालत. या मालिकेच्या प्रसारणाच्या वेळेत रस्त्यावर अक्षरशः शुकशुकाट असे. अशा अनेक आठवणी नव्या पिढीच्या शिलेदारांना सांगताना आधीच्या पिढीतल्या लोकांच्या नजरेत चमक आलेली असते. या मालिकेची प्रचंड लोकप्रियता लक्षात घेऊनच यातल्या प्रमुख व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कलावंतांना श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त निमंत्रित करण्यात आलंय. मात्र'रामायण'मध्ये राम-सीतेसोबत 14 वर्षे वनवास भोगणाऱ्या आणि या काळात प्रत्येक प्रसंगात जीवाभावाची साथ देणाऱ्या छोट्या पडद्यावरच्या लक्ष्मणाचा मात्र विसर निमंत्रण समितीला पडल्याचं दिसतंय. 'रामायण' मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या सुनील लाहिरी यांना या भव्य कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलेलं नाही.

सुनील लाहिरी यांची प्रतिक्रिया

ईटीव्ही भारतशी बोलताना सुनील लाहिरी म्हणाले, "दरवेळी तुम्हाला निमंत्रण मिळालंच पाहिजे असं नाही. पण मला निमंत्रण मिळालं असते तर मी या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार होण्यासाठी नक्कीच गेलो असतो. तरीही काही हरकत नाही, काळजी करण्यासारखं काही नाही.” सुनिल लाहिरींना मनापासून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची इच्छा आहे. पण त्याबद्दल त्यांची कोणतीही तक्रार नाही, असंच त्यांच्या बोलण्यावरुन जाणवलं.

'रामायणा'च्या निर्मात्यांनाही निमंत्रण नाही

सुनील पुढे म्हणाले, “कदाचित त्यांना वाटत असेल की लक्ष्मणाचं पात्र तितकंसं महत्त्वाचं नाही किंवा मी त्यांना कदाचित व्यक्ती म्हणून आवडत नसेन. मी प्रेम सागर यांच्याबरोबर होतो, त्यांनाही निमंत्रण मिळालेलं नाही. मला हे विचित्र वाटतं की त्यांनी 'रामायणा'च्या कोणत्याही निर्मात्यांना निमंत्रित केलं नाही." आपलं म्हणणं मांडताना ते पुढे म्हणाले, "कोणाला निमंत्रण द्यायचं आणि कोणाला नाही हा समितीच्या अधिकारातला निर्णय आहे. मी असं ऐकलं आहे की, 7000 पाहुणे आणि 3000 व्हीआयपींना आमंत्रित केले आहे, त्यामुळे मला वाटतं की जे लोक 'रामायण' मालिकेशी संबंधित आहेत अशांनाही निमंत्रित करायला हवं होतं. ." इतक्या मोठ्या प्रमाणावर निमंत्रणं दिली जात असताना टेलिव्हिजनच्या इतिहासातल्या सर्वात लोकप्रिय ठरलेल्या 'रामायण' मालिकेतील कलाकारांचा आणि निर्मात्यांचा मंदिर समितीला विसर पडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

अरुण गोविल आयोध्येला जाणार

अयोध्येत उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिराचा अभिषेक सोहळा 22 जानेवारीला पार पडणार आहे. 'रामायण' मालिकेत राम आणि सीतेची भूमिका करणारे अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया उद्घाटन सोहळ्यात हजर राहणाऱ्या प्रमुख व्यक्तिमत्त्वांमध्ये आहेत. 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या सोहळ्याला अपण आवर्जून उपस्थित राहणार असल्याचं अरुण गोविल यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितलं.

हेही वाचा -

  1. नवविवाहित अरबाज खान आणि शशूरा खान नव्या वर्षाच्या स्वागतासाठी विमानाने रवाना
  2. 'डंकी' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा टप्पा केला पार
  3. 'सालार'नं आणलं बॉक्स ऑफिसवर वादळ, छप्परफाड कमाई सुरूच
Last Updated :Dec 30, 2023, 5:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.