ETV Bharat / state

शिरोमणी अकाली दलाच्या उपाध्यक्षांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट

author img

By

Published : Dec 6, 2020, 1:32 PM IST

शिरोमणी अकाली दलाचे उपाध्यक्ष व माजी खासदार प्रेमसिंग चंदू माजरा यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांची सुद्धा भेट घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रेमसिंग चंदू माजरा
प्रेमसिंग चंदू माजरा

मुंबई - केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात आम्ही देशभरातील विरोधी पक्ष आणि स्थानिक पक्षांच्या नेत्यांची भेट घेत आहोत. आम्ही सर्व विरोधी पक्षांना एकत्र करण्याची मोहीम सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असल्याचे शिरोमणी अकाली दलाचे उपाध्यक्ष व माजी खासदार प्रेमसिंग चंदू माजरा यांनी सांगितले. कृषी कायद्यांविरोधात सर्वांनी एकत्र यावं, यासाठी आम्ही आवाहन करत असल्याचे ते म्हणाले.

शिरोमणी अकाली दलाचे उपाध्यक्ष व माजी खासदार प्रेमसिंग चंदू माजरा

आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांची सुद्धा भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. याचबरोबर दिल्लीमध्ये आम्ही देशातील सर्व स्थानिक राजकीय पक्षांची बैठक घेणार आहोत. या बैठकीचे नेतृत्व शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख प्रकाशसिंग बादल करतील, असे प्रेमसिंग चंदू माजरा यांनी सांगितले. दिल्ली येथे होणाऱ्या बैठकीत शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि इतर पक्षांचे प्रमुख प्रतिनिधी आणि नेते उपस्थित असणार आहेत, अशी माहिती प्रेमसिंग चंदू माजरा यांनी दिली.

कायदा मोडीत काढेपर्यंत आंदोलन सुरूच -

देशातील काही श्रीमंत आणि मूठभर उद्योगपतींच्या हितासाठी केंद्र सरकारने देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना उध्वस्त करण्यासाठीचा कायदा आणला असल्याने आम्ही या कायद्याला विरोध केला आहे. म्हणूनच हा कायदा मोडीत काढेपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे. त्यामुळेच आम्ही देशातील सर्व स्थानिक पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेत आहोत. या सर्व पक्षांनी एकत्र यावे, असे त्यांना आम्ही आवाहन करत आहोत.

गुरुद्वारासंदर्भात असलेल्या कायद्यात बदल करावा -

राज्यात फडणवीस सरकारने नांदेड येथे असलेल्या गुरुद्वारासंदर्भात असलेल्या कायद्यात बदल केला आणि त्यामध्ये काहीचुकीच्या तरतुदी केल्या होत्या. त्या तरतुदी आताच्या विद्यमान महाविकास आघाडी सरकारने दुरुस्त कराव्यात, अशी एक मागणी सुद्धा आम्ही घेऊन आलो आहोत. याविषयीही आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असून त्यात सुधारणा करावी, अशी विनंती त्यांना केली, असे त्यांनी सांगितले.

कृषी कायद्यांविरोधात शिरोमणी अकाली दल आक्रमक -

केंद्र सरकारनं केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात आता देशभरात वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. केंद्राच्या कृषी कायद्याविरुद्ध भाजपचा मित्रपक्ष राहिलेल्या शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाश सिंह बादल चांगलेच आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकारचा प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘पद्म विभूषण’ पुरस्कार परत करणार असल्याची त्यांनी घोषणा केली. भाजपचा एनडीएमधील सर्वात जुना मित्र असलेला शिरोमणी अकाली दल युतीतून बाहेर पडला आहे.

पाचवी बैठकही निष्फळ -

केंद्र सरकारबरोबरची शेतकऱ्यांची पाचवी बैठकही निष्फळ ठरली आहे. त्यामुळे आता पुन्हा 9 डिसेंबरला केंद्रासोबत शेतकरी नेत्यांची बैठक होणार आहे. दरम्यान, शेतकरी नेत्यांनी मंगळवारी भारत बंदची हाक दिली आहे. आज शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा 10 वा दिवस आहे. केंद्रीय कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. एक वर्ष पूरेल एवढं राशन आमच्याकडे आहे. मागील काही दिवसांपासून आम्ही रस्त्यांवर आहोत. आम्ही रस्त्यावर राहावे, असे सरकारला वाटत असेल तर आम्हाला अडचण नाही, असे शेतकऱ्यांनी शनिवारी पार पडलेल्या बैठकीत म्हटलं.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.