ETV Bharat / state

खंडणी प्रकरणात सचिन वाझेला 13 नोव्हेंबरपर्यंत मुंबई गुन्हे शाखेची पोलीस कोठडी

author img

By

Published : Nov 6, 2021, 3:04 PM IST

गोरेगावमधील विमल अग्रवाल नावाच्या व्यापाऱ्याने सचिन वाझे, परमबीर सिंग, सुमित सिंह, अल्पेश पटेल, विनय सिंह आणि रियाज पटेल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. माझे पार्टनरशिपमध्ये गोरेगाव इथे BOHO रेस्टॉरंट आणि बार आहे. अंधेरीमध्ये BCB स्टोअर आणि बार आहे. हे दोन्ही चालू ठेवण्यासाठी सचिन वाझे आणि अन्य आरोपींनी 9 लाख रुपये घेतले होते. आरोपींनी जानेवारी-फेब्रुवारी 2020पासून ते मार्च 2021 या काळात 9 लाखांची वसूली केली आहे, असा आरोप अग्रवाल यांनी तक्रारीत केला होता.

Sachin Waze
सचिन वाझे

मुंबई - बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला न्यायालयाने खंडणीच्या प्रकरणात आता १३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या अगोदर याप्रकरणी गुन्हे शाखेकडून जेव्हा १० दिवसांची कोठडीची मागणी करण्यात आली होती तेव्हा न्यायालयाने सचिन वाझेला ६ नोव्हेंबरपर्यंत गुन्हे शाखेची कोठडी सुनावली होती. गोरेगावमधील एका वसुली प्रकरणात सचिन वाझेला मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले होते. वाझेचा ताबा मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केलं होतं. त्यावेळी त्याला 6 नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्याची कोठडी संपल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याच्या कोठडीत 13 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

आरोप काय?

गोरेगावमधील विमल अग्रवाल नावाच्या व्यापाऱ्याने सचिन वाझे, परमबीर सिंग, सुमित सिंह, अल्पेश पटेल, विनय सिंह आणि रियाज पटेल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. माझे पार्टनरशिपमध्ये गोरेगाव इथे BOHO रेस्टॉरंट आणि बार आहे. अंधेरीमध्ये BCB स्टोअर आणि बार आहे. हे दोन्ही चालू ठेवण्यासाठी सचिन वाझे आणि अन्य आरोपींनी 9 लाख रुपये घेतले होते. आरोपींनी जानेवारी-फेब्रुवारी 2020पासून ते मार्च 2021 या काळात 9 लाखांची वसूली केली आहे, असा आरोप अग्रवाल यांनी तक्रारीत केला होता.

अग्रवाल यांच्या आरोपानंतर मुंबई पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहिता नुसार 384 ,385 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी याप्रकरणी सुमित सिंह याला अटक केली आहे. बोरीवली कोर्टाने आरोपीला 23 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत पाठवलं होते.

हेही वाचा - वानखेडेंच्या चौकशीसाठी दोन एसआयटीची स्थापना; नवाब मलिक यांचे ट्विट

कोण आहेत सचिन वाझे?

सचिन वाझे हे एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जातात. जवळपास 16 वर्षांनंतर 2020 मध्ये पोलिस दलात परतले. वाझे हे 1990 च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी 60 हून अधिक एन्काऊंटर केले आहेत. प्रदीप शर्मा अंधेरी सीआययूचे प्रमुख असताना त्यांच्या नेतृत्वात वाझे यांनी काम केलं आहे. सचिन वाझे यांच्यासह कॉन्स्टेबल राजेंद्र तिवारी, सुनील देसाई आणि राजाराम निकम यांनाही पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले आहे.

घाटकोपर बस बॉम्बस्फोटाचा आरोपी ख्वाजा युनूसचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्या प्रकरणी काही पोलिसांवर हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप होता. वाझेही या आरोपींपैकी एक होते. त्या प्रकरणात त्यांना 2004मध्ये निलंबितही करण्यात आले होते. 2007मध्ये त्यांनी राजीनामा दिला. मात्र, तपास सुरू असल्याने तो मंजूर करण्यात आला नव्हता. त्यानंतर 2008 च्या दसरा मेळाव्यात ते शिवसेनेत दाखल झाले. सायबर क्राइम आणि बनावट नोटांशी संबंधित अनेक मोठी प्रकरणेही त्यांनी हाताळली आहेत. सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणूनही त्यांनी काम केलं. वाझेंनी एक अ‍ॅपही तयार केले होते. ते एका एनजीओ संबंधित कामही करायचे. गरजू लोकांना कायदेशीर मदत देणे हे या स्वयंसेवी संस्थेचे काम होते.

हिरेन प्रकरणाचाही आरोपी -

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर एका गाडीत जिलेटीनच्या कांड्या ठेवण्यात आल्या होत्या. ही गाडी वाझेंनी ठेवल्याचा आरोप आहे. या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांची हत्या झाली होती. या हत्येचा आरोपही वाझेंवर आहे. त्यामुळे त्याची चौकशी करण्यासाठी एनआयएकडून वाझेचा ताबा मिळवण्यासाठी पोलिसांनी विशेष एनआयए न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर वाझेचा ताबा पोलिसांना देण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.