ETV Bharat / state

अभिनेत्री रिया चक्रवर्तीला दिलासा, लुकआउट नोटीस तात्पुरती स्थगित

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 26, 2023, 8:13 PM IST

Updated : Dec 26, 2023, 8:23 PM IST

मुंबई उच्च न्यायालयानं अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरुद्ध लुकआउट नोटीसीला तात्पुरती स्थगित दिलीय. त्यामुळं अभिनेत्री रिया चक्रवर्तीला दिलासा मिळाला आहे. सीबीआयनं तिच्याविरुद्ध लुकआउट नोटीस जारी केली होती.

Riya Chakraborty
रिया चक्रवर्ती

मुंबई : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर त्याची कथित गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सीबीआयनं तिच्याविरुद्ध लुकआऊट सर्क्युलर जारी केलं होतं. त्याविरुद्ध रिया चक्रवर्तीनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं म्हटलंय की, "आम्ही लुकआउट नोटीसला स्थगिती देत आहोत. कारण रिया चक्रवर्ती, तसंच कियारा अडवाणी कंपनीच्या ब्रँड ॲम्बेसेडर आहेत."

रिया चक्रवर्तीला दिलासा : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर नार्कोटिक कंट्रोल ब्युरोनं रिया चक्रवर्तीविरुद्ध ड्रग्ज प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं तिच्याविरुद्ध जारी केलेल्या लुकआऊट नोटीसला स्थगिती मिळावी, यासाठी तिनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या संदर्भात न्यायमूर्ती अजय गडकरी, न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी खंडपीठानं लुकआऊट नोटीसला स्थगिती देत रिया चक्रवर्तीला दिलासा दिलाय. रिया चक्रवर्तीचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं तिला दुबईतील एका ब्रँड इव्हेंटला उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. हायकोर्टानं परवानगी दिल्यामुळं आता रिया चक्रवर्ती देशाबाहेर म्हणजेच दुबईला जाऊ शकते. मात्र, न्यायालयानं तिला परदेशात जाण्यासाठी 27 डिसेंबर 2023 ते 2 जानेवारी 2024 पर्यंत मुदत दिली आहे.

रियाला परदेशात जाण्याची परवानगी : आजच्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआयला चांगलंच फटकारलंय. नाताळची सुट्टी असतानाही या प्रकरणी उच्च न्यायालयात आज तातडीची सुनावणी झाली. तेव्हा हायकोर्टानं रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा दिला आहे. सीबीआयनं लुकआऊट नोटीस जारी केल्यामुळं रियाला विदेशात जाता येत नव्हतं. पाळीव प्राण्यांच्या खाद्य कंपनीची ब्रँड ॲम्बेसेडर असल्यानं, रियानं 27 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान परदेशात जाण्याची परवानगी मागण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुनावणीदरम्यान न्यायालयानं रियाला काही निर्बंधांसह परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे. यावेळी सीबीआयचे वकील श्रीराम शिरसाठ यांनी रिया त्या कंपनीची ब्रँड ॲम्बेसेडर नसल्याचा दावा केला. यासोबतच अभिनेत्री कियारा अडवाणीनं रिया चक्रवर्तीची जागा घेतल्याचे पुरावे सीबीआयनं न्यायालयात सादर केले. त्यावर रियाच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं की, कियारा तसंच रियाही त्या कंपनीच्या ब्रँड ॲम्बेसेडर आहेत.

न्यायालयानं सीबीआयची घेतली फिरकी : यावरही सीबीआयनं प्रश्न उपस्थित केले. रियाविरुद्ध पाटण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दिल्ली सीबीआय तपास करत आहे. त्यामुळं मुंबई उच्च न्यायालयाला परवानगी देता येणार नाही, असा युक्तीवाद सीबीआयनं न्यायालयात केला. यासोबतच हे प्रकरण अद्याप मुंबई पोलिसांकडं सोपवण्यात आलं नसल्याचा दावा सीबीआयनं केला आहे. त्यावर न्यायालयानं सीबीआयची फिरकी घेतली. गेल्या 6 महिन्यांत तुम्हाला रियाच्या चौकशीची एकदाही गरज भासली नाही. मग आता एवढा विरोध का?, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं यावेळी सीबीआयला केला. त्यामुळं सीबीआयची बोलती बंद झाली.

हेही वाचा -

  1. मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी 11 बॉम्ब ठेवल्याबद्दल आरबीआय गव्हर्नरला धमकीचा ईमेल
  2. जहाजावर ड्रोन हल्ला प्रकरण; भारतीय नौदलानं अरबी समुद्रात केल्या युद्धनौका तैनात
  3. नांदेड रेल्वे स्थानकावर पॅसेंजर ट्रेनला आग; एक डबा जळून खाक
Last Updated : Dec 26, 2023, 8:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.