ETV Bharat / state

DHFL Bank Scam : डीएचएफएल बँक घोटाळ्यातील आरोपी धीरज वाधवानचा जामीन अर्ज न्यायालयाने नाकारला

author img

By

Published : Jul 14, 2023, 3:24 PM IST

Updated : Jul 14, 2023, 3:36 PM IST

धीरज वाधवान ह्या आरोपीवर डीएचएफएल बँक घोटाळ्यामध्ये जनतेच्या जमापुंजीला बेकायदा रीतीने वापरणे आणि फसवणूक करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्या संदर्भातील खटल्यात आजच्या सुनावणीमध्ये पीएमएलए न्यायालयाने धीरज वाधवान याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

DHFL Bank Scam
कोर्ट

मुंबई : डीएचएफएल राणा कपूर मनी लॉंड्रिंग घोटाळ्यामध्ये धीरज वाधवान हा देखील एक आरोपी आहे. सुमारे 5000 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार त्याने केल्याचा आरोप आहे. वैद्यकीय कारणाच्या आधारावर जामीन मिळावा, असा अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयात केला होता. याबाबत आज सुनावणी झाली. न्यायमूर्ती एमजी देशपांडे यांनी मात्र गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असल्यामुळे हा अर्ज फेटाळून लावला. इतक्या गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपीला वैद्यकीय कारणाच्या आधारावर जामीन दिला जाऊ शकत नाही, असे देखील न्यायालयाने नमूद केले.



न्यायालयाचे मत : सीबीआय आणि ईडी अशा दोन्ही सरकारी एजन्सीने यासंदर्भात तपास सुरू केलेला होता. आज झालेल्या सुनावणीमध्ये सीबीआयच्या खटल्यामध्ये सीबीआयने या जामीन अर्जाला विरोध केला. जामिनाला विरोध करताना सीबीआयने स्पष्ट केले की, अत्यंत गंभीर गुन्हे आहेत. देशातील जनतेची बँकेतील जमापुंजींची अफरातफर करण्यामध्ये धीरज वाधवान एक प्रमुख आरोपी आहे. त्यामुळे त्याला वैद्यकीय कारणाच्या आधारावर जामीन देऊ नये. बाकी त्याला वैद्यकीय उपचार द्यायला पाहिजे याबद्दल काहीही म्हणणे नाही.


न्यायालयाने आपल्या निर्देशात काय म्हटले - धीरज वाधवान याच्या वकिलांनी, वाधवान यांना लीलावती या प्रख्यात रुग्णालयात उपचार मिळायला हवे, असे जामीन मिळण्याच्या अर्जामध्ये नमूद केले होते. दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने, उपचारासाठी दवाखान्यात दाखल होता येईल असे निरीक्षण नोंदविले. तसेच त्यासाठी सीबीआयच्या वतीने एक अधिकारी त्या ठिकाणी नियुक्त केला जाईल. त्यांच्या देखरेखीखाली तेथील सर्व व्यवहार नियमानुसार केले जातील, असे देखील आपल्या निर्देशात पीएमएलए न्यायालयाने नमूद केले. न्यायालयाने हे देखील नमूद केले की, यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव आणि इतर अनुषंगिक ज्या बाबी असतील त्यासाठीचे अतिरिक्त शुल्क धीरज यांना द्यावे लागेल. अशा काही अटी आणि शर्ती यावर लिलावती रुग्णालयात धीरज वाधवान याचा उपचार होऊ शकतो, असे न्यायालयाने आपल्या निर्देशात म्हटले. न्यायालयाने आपल्या निर्देशात म्हटले की, सीबीआयने एक अधिकारी धीरज वाधवान याच्यासाठी नियुक्त करावा.

Last Updated : Jul 14, 2023, 3:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.