ETV Bharat / state

वोक्हार्ट रुग्णालयात 20 रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग; क्लिनिकल ट्रायल रुग्णालयाने केले स्पष्ट

author img

By

Published : Apr 30, 2020, 2:29 PM IST

Plasma therapy
प्लाझ्मा थेरपी

मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयात 20 रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग सुरू केला आहे. मात्र, ही केवळ क्लिनिकल ट्रायल असून ती यशस्वी झाल्यानंतरच रुग्णांवर उपचार करण्यात येतील, असे रुग्णालयाने स्पष्ट केले आहे.

मुंबई - कोरोनाग्रस्त रुग्णांवर आता मुंबईत प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार देण्यास सुरुवात झाली आहे. लीलावती रुग्णालयात ही उपचार पद्धती यशस्वी ठरल्याचे राज्य सरकारकडून सांगितले जात आहे. आता मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयात 20 रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग सुरू केला आहे. मात्र, ही केवळ क्लिनिकल ट्रायल असून ती यशस्वी झाल्यानंतरच रुग्णांवर उपचार करण्यात येतील, असे रुग्णालयाने स्पष्ट केले आहे.

सुरुवातीला इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)ने या थेरपीला मान्यता दिल्याचे म्हणत या उपचार पद्धतीला सुरुवात झाली. नंतर मात्र, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या पद्धतीला मान्यता नाही, या पद्धतीमुळे रुग्ण बरा होईल याची खात्री नाही, असे म्हणत धक्का दिला. त्या नंतरही मुंबईत या थेरपीचे प्रयोग सुरू आहेत. लीलावती रुग्णालयात ही उपचार पद्धती यशस्वी झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीच दिली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातही या थेरपीचा वापर करण्यात येणार आहे.

जे वोक्हार्ट रुग्णालय कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून जाहीर करत बंद करण्यात आले होते त्याच रुग्णालयात 20 रुग्णांवर या थेरपीचा प्रयोग अर्थात क्लिनिकल ट्रायल घेण्यात आली आहे. ही ट्रायल यशस्वी झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने उपचार सुरू होतील, असेही रुग्णालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, हे रूग्णालय सील केल्यानंतर त्याचे निर्जंतुकीकरण करुन पुन्हा येथे कोविड रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.