ETV Bharat / state

ऑक्सिजन प्लांट घोटाळा प्रकरण; रोमिन छेडाला उच्च न्यायालयाचा दणका, याचिका फेटाळली

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 21, 2023, 11:58 AM IST

Oxygen Plant Scam : ऑक्सिजन प्लांट घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं रोमिन छेडाला अटक केली आहे. हा गुन्हा निराधार असून तो रद्द करावा, अशी मागणी असलेली याचिका रोमिन छेडानं उच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयाकडून ती अमान्य करण्यात आलीय.

oxygen plant scam mumbai high court did not give relief to romin chheda but issued a notice to economic offences branch
संपादित छायाचित्र

मुंबई Oxygen Plant Scam : रोमिन छेडा हा ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीय मानला जातो. त्याच्यावर कोविड काळात ऑक्सिजन जनरेशन प्लांटच्या उभारणीमध्ये 6 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नोव्हेंबर 2023 मध्ये रोमिन छेडा विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा निराधार असून तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी असलेली याचिका रोमिन छेडाचे वकील आबाद फोंडा यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र, न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठानं ही मागणी अमान्य केली आहे. तसंच मुंबई आर्थिक गुन्हे विभागानं यावर 60 दिवसांत उत्तर दाखल करावं, असे निर्देश उच्च न्यायालयानं दिले आहेत.



गुन्हा गंभीर असल्यामुळं रद्द करता येणार नाही : उच्च न्यायालयानं म्हटलंय की, कोविड महामारीच्या काळातील ऑक्सिजन पुरवठ्या प्रकरणी हा गुन्हा आहे. याबाबत आर्थिक गुन्हे शाखा आणि मुंबई पोलीस तपास करत आहेत. त्यामुळं यंत्रणेला तपास करू द्यावा. तसंच गुन्हा गंभीर असल्यामुळं तो लगेच रद्द करता येणार नाही, असंही न्यायालयानं म्हटलंय.



रोमिन छेडाला अटक : कोविड काळात ऑक्सिजन जनरेशन प्लांटच्या उभारणीमध्ये 6 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी, आर्थिक गुन्हे शाखेचे (EOW) अधिकारी प्रिनाम परब यांनी दिलेल्या तक्रारीवरुन 22 नोव्हेंबरला नागपाडा पोलीस ठाण्यात रोमिन छेडा याच्या विरोधात भारतीय दंड संविधान कलम 418, 465, 467, 468, 471, 218, 120 ब आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं समन्स पाठवून 23 नोव्हेंबरला आरोपी रोमिन छेडा याला चौकशीला बोलावलं होतं. तब्बल आठ तास रोमिन छेडा याचा जबाब नोंदवल्यानंतर पुन्हा 24 नोव्हेंबरला त्याला चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. नंतर 24 नोव्हेंबरला चौकशीअंती आर्थिक गुन्हे शाखेनं सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास आरोपी रोमिन छेडाला अटक केली.


काय आहे प्रकरण : नागपाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये मुंबईतील जम्बो कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारणीसाठी दोन कंत्राट दिली होती. त्यापैकी मुंबई महानगरपालिकेच्या नऊ रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारणीच्या कंत्राटाचं काम हे संबंधित साईट कंत्राटदाराच्या ताब्यात दिल्यापासून 30 दिवसात पूर्ण करावयाची अट संबंधित निविदेत नमूद होती. मात्र, या अटीप्रमाणं कंत्राटदार हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीकडून 30 दिवसात काम पूर्ण न झाल्यानं त्यांना निविदेतील अटी-शर्तीनुसार मुंबई महानगरपालिकेनं एकूण 3 कोटी 16 लाख 32 हजार 426 रुपयांचा दंड आकारला असल्याचं नमूद करण्यात आलं. व्ही एन देसाई रुग्णालय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, जीटीबी रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय, नायर रुग्णालय, कुपर रुग्णालय, भाभा रुग्णालय, के ई एम रुग्णालय आणि सायन रुग्णालय अशी नऊ रुग्णालये कंत्राटदाराच्या ताब्यात देऊन ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारणीसाठी देण्यात आली होती. प्लांट अपूर्ण असतानाही काम पूर्ण झाल्याचं दाखवून मुंबई महानगरपालिकेकडून पैसे उकळण्यात आल्याचा आरोप रोमिन छेडा याच्यावर आहे.

हेही वाचा -

  1. ऑक्सिजन प्लांट घोटाळा प्रकरण; हायवे इन्फ्रा कंस्ट्रक्शनच्या संचालकाला उत्तर प्रदेशात EOW ने पाठवले समन्स
  2. ऑक्सिजन प्लांट घोटाळा प्रकरण; EOW ने रोमिन छेडाला केली अटक
  3. ऑक्सिजन प्लांट घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल, EOW कार्यालयात रोमिन छेडा जबाब नोंदवण्यासाठी हजर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.