ETV Bharat / state

गणेश विसर्जन शांततेत: अनंत चतुर्दशीला मुंबईतील आवाजाची पातळी 94.4 डेसिबल

author img

By

Published : Sep 2, 2020, 5:20 PM IST

Updated : Sep 2, 2020, 5:45 PM IST

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील यावर्षीचा गणेश विसर्जन सोहळा शांततेत पार पडला.अनंत चतुर्दशीला मुंबईतील आवाजाची पातळी केवळ 94 डेसिबल इतकी नोंदवली गेली. मुंबईकरांनी बाप्पाला शांततेत निरोप दिला.

ganesh immersion
गणेश विसर्जन

मुंबई- महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या मुंबईतील गणेशोत्सव सोहळा तसेच विसर्जन मिरवणूक याची चर्चा सातासमुद्रापार होत असते. ढोल-ताशे, लेझीम, बँड-बाजा, फटाके, गुलाल, घोषणाबाजी, बाप्पाचा जयजयकार असे वातावरण या विसर्जनादिवशी मुंबईत असते. त्यामुळे साहजिकच या दिवशी मुंबईत आवाजाची पातळी खूप जास्त असते. यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विसर्जनात ना ढोल-ताशा होता ना फटाके, ना बाप्पांचा होणारा गजर यामुळे अगदी शांततेत यंदा मुंबईकरांनी बाप्पाला निरोप दिला.

यंदाच्या गणेशोत्सवाची इतिहासातील शांततेत पार पडलेला विसर्जन सोहळा, अशी नोंद झाली आहे. यंदा विसर्जनाच्या दिवशी मुंबईत केवळ 94.4 डेसिबल इतकी आवाजाची पातळी नोंदवली गेल्याची माहिती आवाज फाऊंडेशनच्या सुमेरा अब्दूलाली यांनी दिली.

हेही वाचा-राज्यातील गणेश विसर्जनाच्या घडामोडी एका क्लिकवर

दरवर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळपासून विसर्जनाची धामधूम असते. मोठ्या गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणूका तर 24-24 तास चालतात. संपूर्ण मुंबईत बाप्पाचा गजर सुरू असतो. चौपाट्यांवर अक्षरशः पाय ठेवायला जागा नसते. यंदा मात्र चौपाट्या अगदी सुन्या होत्या. मुळात यंदा 4 फुटापर्यंतच्याच मुर्तींची प्रतिष्ठापणा करण्यास परवानगी होती. त्यामुळे अनेक मंडळांनी मंडपातच कृत्रिम तलावात बाप्पाचे विसर्जन केले. चौपाट्यांवरही खूप कमी प्रमाणात विसर्जन झाले. त्यामुळे मुंबईत दरवर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी 107 ते 123 डेसिबल आवाजाची पातळी यावर्षी सरासरी 94.4 डेसिबल इतकी नोंदवली गेल्याचे समुेरा यांनी सांगितले.

मुंबईत अनंत चतुर्दशीला दरवर्षी 100 डेसिबलच्या पुढेच आवाजाची नोंद होते. 2015 मध्ये विसर्जनादरम्यान सर्वाधिक 123 डेसिबल इतकी आवाजाची पातळी नोंदवली गेली होती. गिरगाव चौपाटीवर सर्वाधिक आवाजाची पातळी नोंदवली जाते. गेल्या वर्षी येथे 121.3 डेसिबल इतकी आवाजाची पातळी होती. यंदा मात्र गिरगाव परिसर आणि गिरगाव चौपाटीदरम्यान 54 ते 74 डेसिबल इतकीच आवाजाची पातळी नोंदवली गेल्याची माहिती सुमेरा यांनी दिली आहे.

खार-दांडा येथे 76.5, खार जिमखाना येथे 76.8, लिंकिंग रोड 65.6, जुहू कोळीवाडा 65.3, जुहू चौपाटी 74.7 डेसिबल इतकी आवाजाची पातळी नोंदवण्यात आली आहे. प्रभादेवीत 94.4, वरळी नाका येथे 67.2 डेसिबल इतका आवाज होता. त्यातही हा आवाज मुखत्वे वाहतूकीचाच होता. कुठेही जोरदार आणि खूप सारे फटाके नाही की मिरवणूकीचा आवाज नाही. त्यामुळे यंदा अगदी शांततापूर्ण वातावरणात विसर्जन पार पडले. सुमेरा यांनी मुंबईकर, गणेशभक्त आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

Last Updated : Sep 2, 2020, 5:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.