ETV Bharat / state

राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणाची पुढील सुनावणी 20 जानेवारीला; याच महिन्यात निकाल येण्याची शक्यता

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 16, 2024, 10:37 PM IST

NCP MLA Disqualification Case : राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणी मंगळवारची (16 जानेवारी) सुनावणी झाली. यावेळी विधानसभा अध्यक्षांनी कागदपत्रांची आदलाबदल केली. आता पुढील सुनावणी २० जानेवारीला होणार आहे. २० जानेवारीला दोन्ही गटातील सदस्यांची फेरसाक्ष होणार आहे.

NCP MLA Disqualification Case
राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरण

मुंबई NCP MLA Disqualification Case : राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणी सुनावणी आता सुरु झालीये. येत्या २० जानेवारीनंतर आमदारांची नियमित फेरसाक्ष होणार आहे. २५ जानेवारीपर्यंत ही सुनावणी चालणार आहे. २५ जानेवारीनंतर दोन्ही गटाच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर अध्यक्ष आपला निर्णय राखून ठेवणार आहेत. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष ३१ जानेवारीपर्यंत निर्णय देण्याची शक्यता आहे, राष्ट्रवादीच्या सुनावणीसाठी उपस्थित असलेल्या वकिलांकडून ही माहिती देण्यात आली.

शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी आणि शिवसेना कुणाची निकाल लागल्यानंतर आता राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणी आणि राष्ट्रवादी कुणाची याबाबत नियमित सुनावणी सुरू झालीय. मंगळवारी चार वाजल्यापासून सुनावणीला सुरुवात झाली होती. ३१ जानेवारीपर्यंत निकाल देणार असल्याचं देखील राहुल नार्वेकर यांनी सांगितलं आहे.

पुढील आठवड्यात फेरसाक्ष होणार : दरम्यान, शिवसेनेच्या निकालानंतर आता राष्ट्रवादी कुणाची याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, निकालाची सर्वांना उत्सुकता आहे. सुनावणीवेळी दोन्ही गटातील नेत्यांना उपस्थित राहावे लागणार आहे. तसेच या सुनावणीच्यावेळी शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्ही गटातील नेत्यांची फेरसाक्ष नोंदवण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात फेरसाक्ष होणार असल्याची माहितीसुद्धा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे.

कुणा-कुणाची होणार फेरसाक्ष? : या सुनावणीदरम्यान दोन्ही गटातील नेत्यांची फेरसाक्ष घेण्यात येणार आहे. यावेळी अजित पवार गटाकडून अनिल पाटील आणि छगन भुजबळ यांची फेरसाक्ष घेण्यात येणार आहे. तर शरद पवार गटाकडून जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांची फेरसाक्ष नोंदवली जाणार आहे. दरम्यान, 20 ते 25 जानेवारी या कालावधीत फेरसाक्ष नोंदवण्यात येणार आहे. तसेच ३१ डिसेंबरपर्यंत म्हणजे या महिन्याच्या शेवटी निकाल येणार आहे, असं राहुल नार्वेकर म्हणालेत.

निवडणूक आयोगाचा निकाल कधी? : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह कुणाचे यावर केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरु होती. ही सुनावणी ८ डिसेंबरला पूर्ण झाली आहे. परंतू यावर निकाल येणे बाकी आहे. दोन्ही गटातील दावा-प्रतिदाव्यानंतर निवडणूक आयोगानं निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळं यावर देखील याच महिन्यात किंवा कुठल्याही क्षणी निकाल येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळेल, असं दोन्ही गटाकडून सांगण्यात येत आहे.

कोणत्या गटाचे पारडं जड? : सध्या विधिमंडळातील बहुमत विचार केल्यास, सध्या अजित पवार गटाकडे बहुमत अधिक आहे. संख्याबळाचा विचार केल्यास अजित पवार गटाकडे आमदार जास्त आहेत. त्यामुळं ज्या पद्धतीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बहुमताच्या आधारावर भरत गोगावले यांचा व्हीप वैध ठरवत, एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असा निकाल दिला. तसाच निकष राष्ट्रवादीच्या निकालावेळी लावला तर, अजित पवार गटाचे पारडे जड वाटत आहे. त्यामुळं राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, त्यामुळं शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

आमचा लोकशाहीवर विश्वास आहे - शरद पवार गट : दरम्यान, राष्ट्रवादी आमदार अपात्र यावर सुनावणी सुरु झाली आहे. निकाल या महिन्याच्या अखेरपर्यंत लागणार आहे. त्यामुळं सूची १० नुसार निकाल आमच्या बाजूनं लागण्याची शक्यता आहे. आमचा लोकशाहीवर विश्वास असून, निकाल आमच्याच बाजूनी लागेल. असं शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटलं आहे. तर घटनेनुसार विधानसभा अध्यक्ष निकाल देतील, सर्वोच्य न्यायालयाच्या निकषानुसार आणि ज्या नियमावली आहेत, त्यानुसार विधानसभा अध्यक्ष निकाल देतील. असं अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं आहे.

हेही वाचा -

  1. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाचं वेळापत्रक ठरलं, दोन्ही गट मांडणार बाजू
  2. MLA Disqualification Case : विधानसभा अध्यक्षांच्या नोटीसला शरद पवार गटाच्या आमदारांचं लेखी उत्तर
  3. विरोधकांचे चुकीचे, बिनबुडाचे आणि बालिश आरोप, मी दिलेला निर्णय शाश्वतचं; नार्वेकरांची प्रतिक्रिया
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.