ETV Bharat / state

Praful Patel on Sharad Pawar : 'शरद पवारांचे आशीर्वाद हीच आमची शक्ती, खरी राष्ट्रवादी कोणाची यावर...'

author img

By

Published : Aug 15, 2023, 1:55 PM IST

Updated : Aug 15, 2023, 7:00 PM IST

Praful Patel
प्रफुल पटेल

देशभरात 'स्वातंत्र्य दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते मुंबईतील कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन ठिकाणी आज ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रवादी पक्ष कोणाचा यावर निवडणूक आयोग येत्या 10 ते 15 दिवसात निर्णय देऊ शकेल. तसेच शरद पवारांचे आशीर्वाद हीच आमची शक्ती असल्याचे पटेल यावेळी म्हणाले.

प्रतिक्रिया देताना प्रफुल्ल पटेल

मुंबई : आज देशभर 'स्वातंत्र्य दिन' साजरा होत असताना, यंदा प्रथमच राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन ठिकाणी 'स्वातंत्र्य दिन' साजरा करण्यात आला. अजित पवार गटाकडून आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते त्यांच्या मुंबईतील कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेसुद्धा उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांचे आशीर्वाद हीच आमची शक्ती असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट असले तरी खरा गट कुठला याबाबत निवडणूक आयोग दहा ते पंधरा दिवसात निर्णय घेईल, असा विश्वास पटेल यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

जनतेच्या आमच्याकडून अपेक्षा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यालयात राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर दुसरीकडे अजित पवार गटाच्या कार्यालयात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, समाजातील सर्व घटकांना न्याय मिळो, त्यांची उन्नती होवो. आपण सर्वांनी मिळून राज्याची आणि देशाची सेवा करु, असा संकल्प आज आपण करूया.

खरा गट कुठला? : शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली १९९९ ला आपण पक्ष स्थापन केला. आता अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व काम करत आहोत. सत्तेत सामील झाल्याने आता आपल्याला राज्याची सेवा करण्याची संधी मिळाली. या मिळालेल्या संधीचा लोकांच्या सेवेसाठी कसा वापर करता येईल, याचा विचार करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाले. त्यातील खरा गट कुठला? याबाबत निवडणूक आयोग येत्या पंधरा ते वीस दिवसात निर्णय घेईल, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.

शरद पवारांचे आशीर्वाद आमच्यासोबत : प्रफुल्ल पटेल पुढे म्हणाले की, अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्य मार्गदर्शनाखाली पक्ष बळकट करण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात पक्ष पोहचला आहे. त्यामाध्यमातून राज्य आणि देशाची सेवा करण्याची संधी आपण सोडता कामा नये. देशाला आणि महाराष्ट्राला आणखी विकासाची गरज आहे. राज्यात व देशात अनेक प्रश्न आहेत. त्यातून पुढे जायचे आहे. विकासाची गंगा वाहायची आहे, ही फार मोठी जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. शरद पवार व अजित पवार यांच्या भेटीबद्दल बोलताना पटेल म्हणाले की, आम्ही त्यावर चर्चा करू इच्छित नाही. शरद पवार हे आमचे दैवत आहेत. भेटीबाबत वेगळे कारण काढण्याची गरज नाही. कॅामन मित्राच्या घरी जेवलो. त्यात वेगळे कारण नाही. माझ्या पक्षावर आणि नेत्यांवर आम्ही बोलू शकतो. इतरांवर आम्ही काय बोलणार? २ जुलैला सगळ्यांनी आमची भूमिका बघितली आहे. शरद पवार यांचे आशीर्वाद आमच्या डोक्यावर आहेत. ते कोणी काढून घेऊ शकत नाही.

नवाब मलिक आमचे जुने सहकारी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी टीम भाजपासोबत सत्तेत जाईल असे सांगितले होते. त्यावर बोलताना पटेल म्हणाले की, ते राज ठाकरे यांचे विचार आहेत. त्यावर काही बोलणे उचित होणार नाही. राज ठाकरे यांच्याबाबत जेव्हा एनडीएच्या बैठकीत विषय येईल तेव्हा त्यावर बोलणार आहोत. आता यावर काही बोलू शकत नाही. पटेल पुढे म्हणाले, नवाब मलिक आमचे जवळचे सहकारी आहेत. पक्ष स्थापनेपासून ते आमच्यासोबत आहेत. आज त्यांना मेडीकलच्या निमित्ताने जामीन मिळाला आहे. आम्ही त्यांना भेटायला जाऊन चर्चा करणार आहोत. काही वैद्यकीय मदत हवी आहे का? यावर बोलणार आहोत. पण या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा होणार नाही.

नेत्यांचा पाहुणचार होतो : मोदींविरोधात एकजुटलेल्या सर्व विरोधी पक्षांची 'इंडिया'ची बैठक ३० ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी मुंबईत होत आहे. या मुद्द्यावर पटेल यांना विचारले असता ते म्हणाले की, 'इंडिया'ची बैठक मुंबईत होते ही चांगली गोष्ट आहे. यापूर्वी पटना व बंगळुरु येथे या बैठका झाल्या होत्या. या निमित्ताने नेत्यांना मोठ्या हॉटेलमध्ये राहता येते. त्यांचा चांगला पाहुणचार होतो, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे या 'इंडिया' बैठकीवर टोला लगावला आहे.

हेही वाचा -

  1. Independence Day 2023 : लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींनी आजवर कोणत्या मोठ्या घोषणा केल्या होत्या? वाचा सविस्तर
  2. Independence Day 2023: राज्यातील 186 कैद्यांची आज कारागृहातून होणार सुटका..जबाबदार नागरिक होण्याचे पोलीस महासंचालकांचे आवाहन
  3. Independence Day 2023: 'बीबी का मकबरा' रंगला तिरंगी रंगात, पाहा व्हिडिओ
Last Updated :Aug 15, 2023, 7:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.