ETV Bharat / state

NCP Hearing : अजित पवार गटाकडून खोटी कागदपत्रं सादर, शरद पवार गटाच्या वकिलाचा मोठा दावा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 6, 2023, 7:58 PM IST

Updated : Oct 6, 2023, 10:05 PM IST

NCP Hearing : राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील फुटीवर आज निवडणूक आयोगात सुनावणी झाली. यानंतर बोलताना शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी मोठा दावा केला. 'अजित पवार गटाकडून खोटी कागदपत्रं सादर करण्यात आली', असं ते म्हणाले.

NCP Hearing
NCP Hearing

पहा काय म्हणाले अभिषेक मनु सिंघवी

मुंबई/नवी दिल्ली NCP Hearing : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर पक्षात उभी फूट पडली. आता हे प्रकरण निवडणूक आयोगाकडं असून यावर आज (शुक्रवार ६ ऑक्टोबर) सुनावणी झाली. या सुनावणीसाठी शरद पवारांनी निवडणूक आयोगात हजेरी लावली होती. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर दोन्ही गटांकडून तब्बल दोन तास युक्तिवाद झाला. आता पुढील सुनावणी सोमवारी चार वाजता होणार आहे.

अजित पवार गटाकडून खोटी कागदपत्रं सादर : सुनावणी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. अजित पवार गटाकडून खोटी कागदपत्रं सादर करण्यात आल्याचा दावा अभिषेक मनु सिंघवी यांनी केला आहे. 'सुमारे दोन तास सुनावणी सुरू होती. आमचं म्हणणं ऐकून न घेता पक्षात वाद आहे हे सिद्ध करू नका, असं आम्ही म्हटलं. दुसऱ्या गटाचा युक्तीवाद संपल्यानंतर आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी मिळेल. अजित पवार गटाकडून अनेक खोटी कागदपत्रं सादर करण्यात आली. मृत व्यक्तीचं प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं. आम्ही पुरावे दिले आहेत. पुढे सुनावणीच्या वेळी आणखी पुरावे देऊ. शरद पवारच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत', असं अभिषेक मनु सिंघवी म्हणाले.

शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षचिन्हाबाबत शरद पवार गट आक्रमक झाला आहे. एका बाजूला पक्ष आणि चिन्ह कोणाचं या संदर्भातली सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरू आहे. तर दुसरीकडे, शरद पवार गटानं अजित पवार गटाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय. अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांवर विधानसभा अध्यक्षांनी कारवाई करण्याबाबत निर्देश द्यावे, अशी विनंती शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेत केली. या याचिकेवर ९ ऑक्टोबर रोजी सुनावणी होईल. त्यामुळे आता केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय या दोन्ही ठिकाणी शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

जयंत पाटलांची नियुक्ती बेकायदेशीर : शरद पवार गटाकडून प्रदेश अध्यक्षपदी जयंत पाटलांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा युक्तीवाद अजित पवार गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केला आहे. तसंच आमदारांची संख्या आमच्याकडे असल्याचा दावाही अजित पवार गटाच्या वकिलांनी निवडणूक आयोगासमोर केला. पक्षात यापूर्वीच्या नियुक्त्या बेकायदेशीर असल्याचा दावा त्यांनी केला. ३० जूनला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी अजित पवार यांची बहुमतानं निवड करण्यात आली. विधिमंडळ आणि संसदीय बहुमत आमच्याकडे आहे. राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार असल्याचं पत्र अजित पवारांनी दिलं होतं. त्यामुळे अजित पवार पक्षावर दावा करू शकत नाहीत. तसंच पक्षाची राष्ट्रीय कार्यकारणी आमच्या सोबत असल्याचा युक्तिवाद शरद पवार गटाकडून करण्यात आला.

अजित पवार गटाकडून प्रतिज्ञापत्र सादर : मुख्य प्रतोद अनिल पाटील आमच्यासोबत असल्यामुळं ९ आमदारांवरील कारवाई बाबतचं पत्र बेकायदेशीर असल्याचा दावा अजित पवार गटानं केला. त्यासाठी शिवसेनेच्या निर्णयाचा दाखला देण्यात आला. १ लाख ६२ हजार प्रतिज्ञापत्र अजित पवार गटाकडून सादर करण्यात आले. विधानसभेच्या ४३ आमदारांचं तर विधान परिषदेच्या ६ आमदारांचं प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलं. नागालँडमधील ७ आमदारांचं प्रतिज्ञापत्रही सादर करण्यात आलं. तसेच राज्यसभा आणि लोकसभेच्या एक-एक खासदाराचं प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलंय.

हेही वाचा :

  1. Sharad Pawar Meeting : शरद पवारांनी घेतली खरगे, राहुल गांधींची भेट, INDIA आघाडीच्या रणनीतीवर चर्चा
  2. MP Praful Patel : शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात जाण्यावर प्रफुल पटेल म्हणाले...
  3. Sunil Tatkare On Jayant Patil : जयंत पाटीलच 'पवारांचा' करेक्ट कार्यक्रम करतील - सुनील तटकरेंचा मोठा दावा
Last Updated : Oct 6, 2023, 10:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.