ETV Bharat / state

Bharat Jodo Yatra 2 : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा लवकरच... राज्यातील सहा भागातून होणार पदयात्रा

author img

By

Published : Aug 8, 2023, 7:19 PM IST

Updated : Aug 9, 2023, 7:04 AM IST

Mumbai News
काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची देशात 16 ऑगस्टनंतर पदयात्रा सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय परिस्थितीची सत्यता जनतेसमोर मांडण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेस रस्त्यावर उतरणार आहे. त्यासाठी बसयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

मुबंई : आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यातील सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. काँग्रेस पक्षाने देखील कंबर कसली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये काँग्रेसच्यावतीने ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत दोन यात्रांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत दिली.



कोअर कमिटीची बैठक होणार : शिंदे-फडणवीस-पवार सरकारला टारगेट करण्याच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभा राज्यात पुन्हा एकदा सुरू होत आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेस पक्षाच्या राज्यातील लोकसभानिहाय जागांचा आढावा घेतला जाणार आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या लोकसभा निवडणुकीसाठी ४७ प्रभारींची नेमणूक करण्यात आली होती. राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघातील सध्याची स्थिती याबाबतची सर्व माहिती घेऊन, 16 ऑगस्टला महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक होईल. यावर विचार मंथन करून पुढची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे.



राज्यात पदयात्रा बसयात्रा आयोजन : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची देशात 16 ऑगस्टनंतर पदयात्रा सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये सहा भागात पदयात्रेचे आयोजन केले आहे. या पदयात्रेत सर्वच माजी मंत्री, नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पूर्व विदर्भातून मी स्वतः राहणार असून, पश्चिम विदर्भात राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार असणार आहेत. मराठवाड्यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण, उत्तर महाराष्ट्रामधून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, मुंबईमधून मुंबई शहराध्यक्ष वर्षा गायकवाड तसेच पश्चिम महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे नेतृत्व करतील. त्यानंतर सर्वच नेते हे कोकण, सामूहिक जिल्हे जबादारी वाटून पदयात्रेत सामील होणार असल्याचा निर्णय घेतल्याचे पटोले म्हणाले. 31 ऑगस्टपर्यंत या सर्व पदयात्रा संपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत बस यात्रेचे आयोजन केले आहे. राज्यातील राजकीय परिस्थितीची सत्यता जनतेसमोर मांडण्याच्या दृष्टिकोनातून या बसयात्रेचे आयोजन केले आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा पोलखोल कार्यक्रम जनतेसमोर बस यात्रेच्या माध्यमातून आणणार आहोत, असे नाना पटोले म्हणाले.



हुकूमशाही प्रवृत्तीच्या विरोधात राहुल गांधी जिंकले : महाराष्ट्र हा काँग्रेस विचाराचा राहिला आहे. आमच्या चुकांमुळे आम्ही मागे पडलो होतो. आमचा पक्ष मोठा कसा होईल याचा विचार आम्ही करतो. तसेच सर्वच पक्ष करतात. पक्षात फूट पडली म्हणून आम्ही अशी भूमिका घेतली असा कोणी अर्थ घेऊ नये. इंडियाच्या बैठकीसाठी मुंबईत 31 ऑगस्टला काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी येणार आहेत. त्यानिमित्ताने त्यांचे भव्य स्वागत करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासंदर्भात काल विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, नसीम खान आणि अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. राहुल गांधी यांच्या स्वागताचा प्रस्ताव दिला. पक्षश्रेष्ठींकडून होकार दिला आहे. इंग्रजांच्या विरोधात महात्मा गांधी जिंकले होते. हुकूमशाही प्रवृत्तीच्या विरोधात राहुल गांधी जिंकले असल्याने त्यांचे भव्य स्वागत मुंबईत केले जाणार आहे. वेळ मिळाला तर टिळक भवन येथे सदर कार्यक्रम होईल असे पटोले यांनी म्हटले आहे.

भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा कधी सुरू होणार? या पत्रकार परिषदेनंतर काही माध्यमांनी 16 ऑगस्टपासून भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होणार असल्याचे म्हटले आहे. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खुलासा केला आहे. भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची कोणतीही तारीख काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केलेली नाही. यासंदर्भातला निर्णय अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि स्वतः राहुल गांधी घेणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -

  1. Nana Patole News : कुठला आमदार कुठल्या गटात हे विधानसभा अध्यक्षही छातीठोकपणे सांगू शकणार नाहीत, राष्ट्रवादीवरुन नाना पटोलेंचा टोला
  2. Nana Patole on Opposition Leader : पुढच्या आठवड्यात ठरणार काँग्रेसचा विरोधी पक्षनेता - नाना पटोले
  3. Nana Patole Reaction : देशातील भाजपाला आली आहे सत्तेची मस्ती, नाना पटोले यांचा घणाघात
Last Updated :Aug 9, 2023, 7:04 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.