ETV Bharat / state

Mumbai Traffic News : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीने चाकरमानी झाले त्रस्त, वाहतूक कोंडीचे खरे कारण काय?

author img

By

Published : Aug 14, 2023, 1:34 PM IST

मुंबईच्या गजबजलेल्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर आज सकाळी वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. कार्यालयाकडे निघालेल्या नोकरदार आणि अधिकारी वर्गाचे हाल झाले. पश्चिम द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी वाहतुकीच्या कोंडीचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केले आहेत.

Mumbai Traffic News
पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक

मुंबई : मृणालताई गोरे उड्डाणपुलादरम्यान विमानतळापर्यंत सुरू असलेल्या कामामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याची माहिती एका वापरकर्त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. सकाळी आठ ते दहा वाजण्याच्या सुमारास चाकरमानी कार्यालय गाठण्यासाठी पश्चिम द्रुतगती मार्गाचा वापर करतात. याचवेळी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले.

वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त प्रवीण कुमार पडवळ यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, पश्चिम द्रुतगती मार्गावरील लोखंडी कमान काढण्याचे काम सुरू आहे. मुंबईच्या गजबजलेल्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर सोमवारी सकाळी मोठी वाहतूक कोंडी झाली. मध्यरात्री सुरू झालेल्या अंधेरी उड्डाणपुलावरील गॅन्ट्री गर्डर्स पाडण्याच्या कामामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती.

लोखंडी कमान हटवण्याचे काम न झाल्याने दिरंगाई - मुंबई वाहतूक पोलिसांनी काही दिवसांपूर्वी याबाबत एक सूचना जारी केली होती. मात्र, अंधेरी उड्डाण पुलावरील काम सुरूच राहिले. या कामाला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बांधकाम सुरू असल्याचे दिसत आहे. महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीमधून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून आले. ठरलेल्या वेळेत लोखंडी कमान हटवण्याचे काम न झाल्याने आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळीच कार्यालयाकडे जाताना वाहतुकीच्या कोंडीमुळे अनेकांची तारांबळ उडाली आहे.


अंधेरी पूल राहणार बंद - मुंबई वाहतूक पोलिसांनी नागरिकांना दिलेल्या शेवटच्या अपडेटमध्ये सांगितले की, अंधेरी पूल सोमवारी रात्री 1.05 ते पहाटे 5.00 पर्यंत बंद राहणार आहे. त्याप्रमाणे अंधेरी ब्रिज 12.05 ते पहाटे 5.00 पर्यंत बंद करण्यात आला. लोखंडी कमान काढण्याच्या कामामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गद्वारे अंधेरी ब्रिज चढणे आणि उतरणे यासाठी वाहतूक स्लीप रोडवरून वळवण्यात आली आहे. आजपासूनच पश्चिम द्रुतगती महामार्गावरील केलेल्या या वाहतुकीच्या बदलामुळे चाकरमान्यांना वाहतुकीचा नाहक त्रास झालेला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी व्हिडिओ शेअर करत वीस ते पंचवीस मिनिटे अथवा अर्धा तास या वाहतुकीच्या कोंडीमुळे उशिर झाल्याचे नमूद केलेले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.