ETV Bharat / state

Maharashtra Rain : राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, येत्या 24 तासात मुंबई, कोकणात अतिवृष्टीचा इशारा

author img

By

Published : Jul 21, 2021, 10:26 AM IST

Updated : Jul 21, 2021, 8:01 PM IST

mumbai rain
mumbai rain

19:59 July 21

येत्या तीन दिवसात मुंबई, ठाणे, पालघर व रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई - मागील आठवड्यात गुरुवारपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस अजूनही अधून मधून मुंबईत सुरूच आहे. पुढील तीन ते चार दिवस देखील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड रत्नागिरी या ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. पुढील 3 दिवस मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी येथे पुढील 2 दिवस रेड अर्लटचा इशारा देण्यात आला आहे. त्याबरोबर मुंबईला देखील उद्या सकाळपर्यंत रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. दुपारनंतर पावसाचा जोर वाढू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे.

19:58 July 21

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार.. समुद्रकिनारी अजस्त्र लाटांचे तांडव, दीड महिन्यांत पावसाची विक्रमी नोंद

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यात बुधवार सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. जगबुडी आणि कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. तर समुद्र देखील खवळला आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात एकूण ८०८.५०, तर सरासरी ८९.८३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. २३ जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

15:44 July 21

मुंबईत पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई - मुंबईतील काही ठिकाणी येत्या 24 तासांत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. मुंबई महापालिकेने ही माहिती दिली आहे.  दरम्यान सकाळपासून कोसळत असलेल्या पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

15:19 July 21

कोल्हापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा, 21 ते 24 जुलै दरम्यान अतिवृष्टीचा हवामान खात्याचा अंदाज

कोल्हापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा, 21 ते 24 जुलै दरम्यान अतिवृष्टीचा हवामान खात्याचा अंदाज, 70 ते 120 मिमी पावसाची शक्यता, पाऊस वाढल्याने नद्यांची पातळीही वाढणार, डोंगराळ भागात भू:स्खलन होण्याची भिती

13:20 July 21

सातारा जिल्ह्यात 24 तासात सरासरी 19.8 मिलीमीटर पाऊस...

सातारा -  जिल्ह्यात बुधवारी सकाळी 10 वाजेपर्यंत एकूण सरासरी 19.8  मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर आतापर्यंत सरासरी 119.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी सकाळी 10 वाजेपर्यंत (24 तासात) झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी, कंसात एकूण पाऊस मिलीमीटरमध्ये : सातारा - 23.3 (91.7), जावळी - 47 (154.8), पाटण - 35 (157.5), कराड -14 (75.0), कोरेगाव - 9.7 (84.7), खटाव - 7.8 (46), माण - 3.6 (118.3), फलटण - 0.7 (65.4), खंडाळा - 2.7 (45), वाई - 18.3 (120.4), महाबळेश्वर - 85.6 (636.3)

12:19 July 21

यवतमाळमध्येही जोरदार पाऊस

यवतमाळ जिल्ह्यातही संततधार पाऊस सुरू आहे.

12:18 July 21

ठाणे नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी

ठाणे - सततच्या मुसळधार पावसामुळे ठाणे नाशिक महामार्ग मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. खड्यामुळे आणि रस्त्याच्या बाजूला झालेल्या चिखलामुळे वाहनांना वाट काढणे कठीण होत आहे. पावसामुळे वाहने देखील अडकून पडली आहे.

12:07 July 21

ठाण्यात वृक्ष कोसळून रिक्षाचे नुकसान

ठाणे - गेल्या दोन दिवसापासून ठाणे तसेच आसपासच्या परसरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कळवा या ठिकाणी जुन्या रिक्षावर झाड पडले आहे. यात रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल रस्त्यावरील झाड हटवत आहे. 

12:03 July 21

नाशिकमध्येही पावसाची हजेरी

नाशिक -  शहरात मध्यरात्री पासून संततधार पाऊस सुरू असून, सकाळनंतर रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. त्याचबरोबर इगतपुरी तालुक्यात पावसाच्या संततधार पावसाला सुरूवात झाला आहे. सर्व राज्यात समाधानकारक पाऊस पडत असला तरीही, शुक्रवारी शहरात पाणी कपात करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 28 टक्के पाऊस पडला आहे. नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात 33 टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. नाशिक जिल्ह्यात 24 धरणात एकूण 29 टक्के पाणीसाठा आहे. तर 7 धरणांत 10 टक्के पेक्षा कमी पाणी उपलब्ध असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 

12:02 July 21

ठाण्यात जिल्हा प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

 ठाणे - जिल्ह्यातील कल्याण, डोबिवली, भिवंडी, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर भागात बुधवार सकाळपासून जोरदार पावसाची बॅटिंग सुरूच आहे. तानसा धरण काठोकाठ भरल्याने शहापूर, भिवंडी, वाडा तालुक्यातील नदीच्या काठावर असलेल्या 36 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

10:07 July 21

मुंबईत पावसाची हजेरी, रस्ते आणि वाहतुकीवर परिणाम

मुंबईत पावसाची हजेरी

मुंबई - शहर आणि उपनगरात जोरदार पावसाची तर काही ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.  45 ते 55 किलोमीटर वेगाने थंड वारे वाहणार आहेत. तर काही ठिकाणी 60 किलोमीटर वेगाने थंड वारे वाहू शकतात, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आल्याची मुंबई महापालिकेने माहिती दिली. मंगळवारी सकाळी 8 ते बुधवारी सकाळी 8 वाजे पर्यंत 24 तासात शहर विभागात 11.69 मिमी,  पश्चिम उपनगरात 13.24 मिमी, पूर्व उपनगरात 17.95 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सकाळी 9.52 वाजता  समुद्रात 4.12 मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात, असेही हवामान विभागाने शक्यता वर्तविली आहे. 

Last Updated : Jul 21, 2021, 8:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.