ETV Bharat / state

Dipak Kesarkar : मराठी भाषेला प्राधान्य द्या - शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

author img

By

Published : Nov 15, 2022, 9:23 PM IST

महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते बालभारती या मराठी चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण ( Marathi film Balbharati trailor launch ) करण्यात आले. २ डिसेंबर २०२२ ला बालभारती संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Etv Bharat
Etv Bharat

मुंबई : "मुलांना जे आवडते त्या भाषेत मुलांना शिक्षण दिले गेले पाहिजे तसेच महाराष्ट्रातील प्रत्येकाने मराठी भाषेला प्राधान्य द्यायला सुरुवात केली पाहिजे", असे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले. यावेळी त्यांच्या हस्ते बालभारती चित्रपटाच्या ट्रेलरचे (Marathi film Balbharati trailor launch ) अनावरण करण्यात आले.



इंग्रजी भाषा ही सर्वस्व नाही - शालेय शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर म्हणाले की, "जरी तुम्हाला इंग्रजी येणे गरजेचे असेल तरी इंग्रजी हे सर्वस्व नाही. मुलांना जे आवडते त्या भाषेत मुलांना शिक्षण दिले गेले पाहिजे. आज जे देश तंत्रज्ञानात विकसित आहेत, त्यांनी त्यांच्या मातृभाषेत शिक्षण दिल्याचे दिसून येते. फ्रान्स विमान तंत्रज्ञानात पुढे आहे, पण ते फ्रेंच भाषेत बोलतात. मी पॅरिसमध्ये असताना रस्त्यावर मला कुणीही इंग्रजीत उत्तर दिले नाही. कदाचित त्यांना इंग्रजी येत असेल पण त्यांना त्यांच्याच भाषेचा आग्रह धरवासा वाटत असेल. आपल्याला इंग्रजी आली पाहिजे, पण इंग्रजी हे काही सर्वस्व नसल्याचे ते म्हणाले.

भारत शिक्षणाच्या बाबतीत पुढे - ते पुढे म्हणाले की, "भारत शिक्षणाच्या बाबतीत कित्येक पावले पुढे होता. अठराव्या शतकात जेव्हा पहिली शाळा इंग्लंडमध्ये सुरू झाली तेव्हा आपल्याकडे अनेक गुरुकुल अस्तित्वात होती. इंग्रजांनी आपल्यावर राज्य करण्यासाठी आपली ही व्यवस्था संपुष्टात आणली. आपण आपल्या शाळेत सर्वोत्तम असे तंत्रज्ञान मुलांना उपलब्ध करून दिले पाहिजे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, कॉम्पुटर सायन्स हे भविष्य आहे. आम्ही आमच्या मुलांना सर्वोत्तम असे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यास कटिबध्द आहोत."

बालभारती चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण - 'बालभारती’मध्ये सिद्धार्थ जाधव, नंदिता पाटकर, संजय मोने, उषा नाईक, आर्यन मेंघजी, रवींद्र मंकणी आणि अभिजित खांडकेकर यांच्या भूमिका असून त्याची निर्मिती स्फीयर ओरिजीन्सने केली आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन नंदन यांनी केले आहे. अलीकडेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर आणि टीझर दाखल करण्यात आले. येत्या २ डिसेंबर २०२२ ला बालभारती संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.