ETV Bharat / state

महाराष्ट्राची लालपरी झाली ७३ वर्षांची; जाणून घ्या, इतिहास

author img

By

Published : Jun 1, 2021, 9:01 AM IST

महाराष्ट्राच्या रस्त्यावर 1 जून 1948ला पहिल्यांदा एसटी बस धावली. आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ असे नाव असले तरी तेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली नव्हती. त्यामुळे हे नाव असण्याचा प्रश्न नव्हता. तेव्हा गुजरात, मुंबई आणि महाराष्ट्र मिळून ‘बॉम्बे स्टेट’ होते. त्यामुळे बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन, असे एसटी महामंडळाचे नाव होते.

maharashtra st bus
लालपरी

मुंबई - आपल्याला गाव खेड्यापर्यंत पोहोचवणारी, मामाच्या गावाची नेहमी आठवण करुण देणारी, तिच्या खिडकीत बसले की झाडे पळत आहेत असा भास होणारी, कॉलेजात जात असताना खिडकीतूनच रुमाल टाकून सीट बूक होणारी, हिरव्या रंगाच्या सीट, रंग उडालेले लोखंडी रॉड, धावत असताना खडखड वाजणाऱ्या खिडक्या, पावसाळ्यात टपकणारे छत असणारी लाल परी म्हणजे राज्य परिवहन महामंडळाची बस ७३ वर्षांची झाली आहे.

अशी धावली पहिली लालपरी -

महाराष्ट्राच्या रस्त्यावर 1 जून 1948ला पहिल्यांदा एसटी बस धावली. आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ असे नाव असले तरी तेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली नव्हती. त्यामुळे हे नाव असण्याचा प्रश्न नव्हता. तेव्हा गुजरात, मुंबई आणि महाराष्ट्र मिळून ‘बॉम्बे स्टेट’ होते. त्यामुळे बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन, असे एसटी महामंडळाचे नाव होते. ही पहिली बेडफोर्ड कंपनीची एसटी बस नगर आणि पुणे धावली होती. विशेष म्हणजे या बसचे पहिले चालक किसन राऊत आणि पहिले वाहक लक्ष्मण केवटे दोघे होते. या पहिल्या एसटी बॉडी ही लाकडी होती. बसचे वरचे छप्पर चक्क कापडी होते. या बसची आसनक्षमता 30 होती. नंतर हळूहळू शेवरले, फोर्ट, बेडफोर्ड, सेडान, स्टडेबेकर, मॉरिस कमर्शिअल, अल्बिओन, लेलँड, कोमर आणि फियाट या कंपन्यांच्या बसगाड्या येऊ लागलेला होत्या.

bombay state bus
बॉम्बे स्टेट काळातील बस

असा राहिला लालपरीचा प्रवास -

महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आल्यानंतर त्या भागातील वाहतूक सेवा करीत असलेल्या संस्थाही बीएसआरटीसीमध्ये विलीन करून नव्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) या नावाने महामंडळाचा कारभार सुरू करण्यात आले. "गाव तेथे एसटी", "रस्ता तेथे एसटी" या ब्रीदवाक्यनुसार हळूहळू खेड्यापासून शहरापर्यंत एसटीचा विस्तार होत गेला. महाराष्ट्रात एकूण ३१ विभागातून एसटीचे विभागीय कामकाज होते. त्याचप्रमाणे एसटी महामंडळाकडून आंतरराज्यीय सेवा पुरविली जाते. या सेवेचा गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाणा व गोवा इत्यादी राज्यांत विस्तार झाला आहे. तसेच ३६ बसेसचा ताफा असलेल्या एसटी महामंडळाकडे आज ७३ वर्षानंतर १८ हजार बसेस आहेत. तसेच एक लाखपेक्षा जास्त कर्मचारी आहेत. सध्या महामंडळाकडे एसटीची साधी बस, एशियाड ,हिरकणी, अश्वमेध, शिवनेरी तसेच आधुनिक विठाई आणि शिवशाहीसारख्या बसेसही आहे.

old bus
सुरुवातीच्या काळातील बस

हेही वाचा - हॅपी बर्थडे! 'पंजाब मेल' एक्स्प्रेसला आज १०९ वर्षे पूर्ण; वाचा, इतिहास..

एसटीची आधुनिक वाटचाल -

एसटीने कालानुरूप सेवेत बदल केला आहे. साध्या गाड्या निमआराम बसगाड्यांसोबतच नव्या काळात आधुनिक सेवाही एसटीने सुरू केली आहे. डिसेंबर २००२मध्ये दादर-पुणे मार्गावर अश्वमेध या नावाने वातानुकूलित बससेवा सुरू करून एसटीने आणखी एक पाऊल पुढे टाकले. शिवनेरी, अश्वमेध, शीतल आणि आता आधुनिक शिवशाही प्रकारच्या वातानुकूलित आरामसेवा एसटी चालवित आहे. तसेच एसटीच्या बसेस तिकीटसुद्धा आज आधुनिक झाले आहे. स्मार्टकार्ड, स्वतःच्या संकेतस्थळावरून आगाऊ तिकीट विक्रीची सुविधा देऊन एसटीने एक पाऊल पुढे टाकले. मोबाईल ॲपही उपलब्ध करून देऊन त्याद्वारे आगाऊ आरक्षणाची सुविधा देण्यात आली आहे.

shivshahi
शिवशाही बस

एसटीची टिक टिक बंद -

पूर्वी एसटीचे वाहकाकडे बसमध्ये लोखंडी ट्रे असायचा, या ट्रेमधून तिकीट काढून त्यावर पंच करून आणि टिक टिक वाजवून तिकीट विचारणारे वाहक बहुतांश प्रवाशांना परिचयाचा आहे. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत एसटी महामंडळानेही ती जुनी पद्धत बंद करून पाच वर्षांपूर्वी तिकीट काढण्यासाठी डिजीटल तिकीट सेवा आणली आहे. आता लोखंडी ट्रेऐवजी आता अत्याधुनिक हे छोटेखानी यंत्र वाहकांच्या हाती दिसून येत. या यंत्राने वाहकांचे कामकाज बरेच सोपे केले. सातत्याने या मशीनचा वापर करण्यामुळे जुन्या पद्धतीने ट्रेमधील तिकीट देण्याची वाहकांची सवय तुटली. कधी काळी या मशिनी बंद पडल्या तर पुन्हा एकदा एसटी महामंडळात जुन्या पद्धतीने तिकीट देण्यात येते.

ticket machine
तिकिट मशीन (आधीचे आणि आताचे)
एसटीच्या लोगोत जय महाराष्ट्र -

एसटीला ग्रामीण भागातील जीवनवाहिनी म्हटले जाते. या एसटीने ग्रामीण भागाला शहराशी जोडण्यात महत्वपूर्ण योगदान आहे. तसेस एसटी महामंडळ अनेक सामाजिक बंधने पाळून प्रवाशांना सोई पुरवते. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटल सीमा वाद आहे. मात्र, नेहमीच वाद कर्नाटकात एसटीवर निघत होता. इतकेच नव्हे तर तत्कालीन कर्नाटकचे नगरविकास मंत्र्यांनी कर्नाटकात राहणाऱ्या मराठी लोकप्रतिनिधींना 'जय महाराष्ट्र' म्हणायला बंदीच घातली होती. मात्र, त्यानंतर महाराष्ट्रातील वातावरण तापले होते. कर्नाटक सरकारच्या या दडपशाहीला महाराष्ट्राचे तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी कडाडून विरोध केला. इतकेच नव्हे तर एसटी महामंडळाचा लोगोत बदल करण्यात आला. चिन्हाखाली 'जय महाराष्ट्र' असे लिहिण्यात आले आहे. तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या कार्याबद्दल संपूर्ण राज्यभरातून कौतुक करण्यात आले होते.

logo
लोगो
कोरोना काळातील ऐतिहासिक महाराणी -

एसटी म्हणजे केवळ प्रवाशांची वाहतूक करणारी यंत्रणा एवढेच मर्यादित नसून एसटीने सातत्याने सामाजिक बांधिलकी जपली आहे. राज्यावर आलेल्या दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीत एसटीने नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. मात्र, गेल्या वर्षभरापासून स्वतःच्या जीवाची आणि कुटुंबाची काळजी न करता कोरोनासारख्या महासंकटातही एसटीचे कर्मचारी अत्यावश्यक सेवा बजावत आहे. सेवा बजावत असताना शंभरापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोट्यवधी रुपयांचा चुराडा झालेला आहे. सध्याच्या परिस्थितीत एसटी महामंडळाचा संचित तोटा चार हजार कोटीने वाढलेला आहे. तुमच्या-आमच्या सुख-दुःखाला धावून येणाऱ्या या एसटीला संजीवनी मिळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी पक्ष भेद विसरून यासाठी प्रयत्न करायला हवे आहेत. ग्रामीण भागातील जनतेच्या सुख दुःखाला धावून जाणाऱ्या या एसटीला दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा.

हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष: जाणून घ्या राज्यात खरीप पिकांचे नियोजन कसे?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.