ETV Bharat / state

Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा कसा सुटणार?

author img

By

Published : May 15, 2023, 8:37 PM IST

Updated : May 15, 2023, 9:06 PM IST

कर्नाटक निवडणुकीनंतर राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत भाजपविरुद्ध आगामी निवडणुका एकत्र लढवण्यावर सर्व पक्षांचे एकमत झाले आहे. तसेच आता लवकरच जागा वाटपाच्या फॉर्मुल्यावर चर्चा सुरू करायला पाहिजे, असे या बैठकीत ठरले आहे.

Maharashtra Politics
Maharashtra Politics

पहा काय म्हणाले अजित पवार आणि सचिन अहिर

मुंबई : कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयानंतर राज्यातील महाविकास आघाडीलाही पुन्हा बळ प्राप्त झाले आहे. कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयामुळे आता देशातील परिस्थिती बदलू शकते, असा विश्वास महाविकास आघाडीला वाटू लागला आहे. आधी शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंवर केलेली टीका, त्यानंतर संजय राऊत यांनी केलेल्या विधानांमुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वाटत असतानाच पुन्हा एकदा शरद पवारांनी परिस्थितीचे नियंत्रण घेत महाविकास आघाडीची बैठक बोलावली.

बैठकीत काय ठरले? : महाविकास आघाडीच्या या बैठकीत आघाडीची वज्रमूठ ढिली होणार नाही याकडे सर्वांनी एकजुटीने लक्ष दिले पाहिजे. तसेच आगामी काळात एक मताने काम करून भाजपचा पराभव केला पाहिजे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. पवारांच्या या मताला सर्वांनीच दुजोरा दिला आहे. सध्याची परिस्थिती ही महाविकास आघाडीसाठी उत्तम असून, त्यामुळे लवकरच जागा वाटपाच्या बाबतीत चर्चा सुरू करायला पाहिजे, असे या बैठकीत ठरले आहे.

महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर आता लवकरच जागा वाटपाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. कोणतीही अडचण न येता आघाडीतील घटक पक्षांदरम्यान योग्य जागावाटप केले जाईल. त्यासाठी आम्ही लवकरच बैठक घेणार आहोत. आगामी लोकसभा निवडणुका ह्या मार्च महिन्यात असतील, या निवडणुकांसोबतच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका लागण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे जागा वाटपावर लगेचच चर्चा करून त्यानुसार कामाला सुरुवात करावी लागेल - अजित पवार, विरोधी पक्ष नेते

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जरी कुठे आघाडी म्हणून आम्ही लढलो नसलो तरी यापुढे येणाऱ्या विधान परिषद, विधानसभा आणि लोकसभा या सर्वच निवडणुका आघाडी म्हणून संयुक्तरित्या लढणार आहोत. वास्तविक जागा वाटपाचा मुद्दा आता आमच्यासाठी गौण आहे कारण अजून निवडणुकीला बराच वेळ आहे. तोपर्यंत काही उमेदवार इकडून तिकडे जाऊ शकतात किंवा अन्य पक्षातून काही प्रबळ उमेदवार आमच्याकडे येऊ शकतात. त्यामुळे सध्या तरी त्या विषयावर आम्ही चर्चा न करता आघाडीची वज्रमूठ अधिक कशी घट्ट होईल, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. - सचिन अहिर, आमदार

काय असू शकतो जागा वाटपाचा फॉर्मुला? : महाविकास आघाडीमध्ये तीन महत्त्वाचे पक्ष आहेत. यापैकी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडे सध्या 16 आमदार आहेत. राष्ट्रवादीकडे 54 तर काँग्रेसकडे 44 आमदार आहेत. त्यासोबतच काही अपक्ष आमदारही आहेत. या सर्वांची मिळून बेरीज 114 होते आहे. 2019 च्या निवडणुका लढताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ज्या पद्धतीने जागावाटप केले होते, त्याच सूत्राच्या आधारे आता पुन्हा जागावाटप होऊ शकते. यामध्ये सध्या ज्या पक्षाने ज्या जागा जिंकल्या आहेत त्या जागा त्यांना दिल्या जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार 288 पैकी 114 जागांचे वाटप स्पष्टपणे होईल. त्यानंतर ज्या जागांवर शिवसेनेचे 40 आमदार निवडून आले होते, त्या जागा शिवसेनेला दिल्या जातील. यानुसार 154 जागांचे वाटप केल्यानंतर उर्वरित जागांवर ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता त्या पक्षाकडे ती जागा सोपवल्यास जागा वाटपाचा तिढा सुटू शकतो. मात्र त्याबाबत अद्याप प्राथमिक चर्चा सुरू असून यासाठी लवकरच समिती नेमण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. सहा नेत्यांची समिती जागा वाटपाबाबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागा वाटपाचा इतिहास : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 2004 मध्ये निवडणूक पूर्व आघाडी केली होती. त्यावेळी जागा वाटपामध्ये काँग्रेसच्या वाट्याला 157 तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला 124 जागा आल्या होत्या. तत्पूर्वी सत्तेत असलेल्या काँग्रेसकडे 75 आणि राष्ट्रवादीकडे 58 जागा होत्या. त्या जागांच्या आधारे हे जागा वाटप करण्यात आले होते. मात्र निवडणुकीत काँग्रेसने 69 तर राष्ट्रवादीने 71 जागा जिंकल्या.

2009 मध्ये राष्ट्रवादीचे पारडे जड : 2004 मधील यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने निम्म्या निम्म्या जागा लढवण्याची मागणी केली. अखेरीस जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरत राष्ट्रवादी काँग्रेसने 114 आणि काँग्रेसने 174 जागा लढवल्या. मात्र त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ होऊन काँग्रेसने 82 तर राष्ट्रवादीने 62 जागांवर विजय मिळवला. 2014 मध्ये लोकसभेत वाताहत झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र यावेळी काँग्रेसच्या वाट्याला 42 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 41 जागा जिंकता आल्या.

Maharashtra Politics
कोणाकडे किती आमदार

कसा असेल लोकसभेसाठीचा फॉर्मुला? : महाविकास आघाडीत लोकसभेसाठी प्राथमिक स्तरावर चर्चा झाल्याची माहिती समोर येते आहे. यामध्ये एकूण 48 जागांपैकी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना 21 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस 19 जागा आणि काँग्रेसने 8 जागा लढवाव्या अशी प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये मुंबईतील लोकसभेच्या 6 जागांपैकी 4 जागा या ठाकरे गटाला तर उरलेली प्रत्येकी एक जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने लढवावी, अशी चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे महाविकास आघाडी टिकावी आणि जागावाटप योग्य रीतीने व्हावे यासाठी सर्व घटक पक्ष प्रयत्न करीत असल्याचे चित्र सध्या दिसते आहे.

हेही वाचा :

  1. Ajit Pawar on MLAs Disqualified : सोळा आमदार अपात्र झाले तरीही सरकारला कोणताच धोका नाही; विधानानंतर अजित पवार पुन्हा चर्चेत
  2. Sanjay Raut FIR : ...म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल केला; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
  3. Mangal Prabhat Lodha : बदनामीकारक वक्तव्य केल्यामुळे मंत्री मंगल प्रभात लोढा यांना नोटीस
Last Updated : May 15, 2023, 9:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.