ETV Bharat / state

Dhananjay Munde : विमा संरक्षण क्षेत्राची व्याप्ती वाढविण्यासाठी विभागाकडून प्रयत्न सुरु - कृषीमंत्री धनंजय मुंडे

author img

By

Published : Jul 24, 2023, 8:05 PM IST

सध्या महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टी झाली आहे. तर काही भागात अजूनही चांगल्या पद्धतीचा पाऊस झालेला नाही. या दोन्ही गोष्टींमुळे सध्या राज्यातील शेतकरी चिंतेत आहे. शेतकऱ्यांना मदतीसाठी विरोधी पक्षनेते यांनी विधान परिषदेत प्रश्न मांडला होता. यावर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले आहे.

Etv Bharat
Etv Bharat

मुंबई - मराठवाड्यात पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने २० लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे. तर अनेक ठिकाणी अतिवृष्टीने पीक पाण्याखाली गेली आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी हवालदील झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची सूचना विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषद नियम ९३ अन्वये मांडली होती.

भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त माहितीनुसार, जुलै महिन्याच्या उर्वरीत कालावधीमध्ये पर्जन्यमान होणार असल्याचा अंदाज प्राप्त आहे. त्यामुळे मराठवाड्यात पुढील काळात पेरण्यांना वेग येईल तसेच शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होऊ नये म्हणून एक रुपयात पिक विमा योजना राबविण्यात येत आहेत - कृषीमंत्री धनंजय मुंडे

१ कोटी ४ लाख ६८ हजार ३४९ शेतकऱ्यांचा पिक विमा - या प्रसंगी बोलताना मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, २४ जुलै रोजी प्राप्त माहितीनुसार १ कोटी ४ लाख ६८ हजार ३४९ शेतकरी पिक विमा योजनेत सहभागी झाले आहेत. विमा संरक्षण क्षेत्राची व्याप्ती वाढविण्याबाबत कृषी विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रात पाऊस जून ते ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान पडत असल्याने या काळात खरीप व रब्बी पिकांच्या पैरण्या केल्या जातात. भारतीय हवामान विभागाच्या अहवालानुसार राज्यात मान्सूनचे आगमन साधारणतः ७ जूनच्या दरम्यान होते. यावर्षी सन २०२३ मध्ये ११ जून रोजी कोकण विभागामध्ये मान्सूनचे आगमन झालेले आहे. २५ जून २०२३ पासून संपूर्ण महाराष्ट्र मान्सून पर्जन्यमानाने व्यापला आहे.

मराठवाड्यात ४२.६५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी - राज्यात जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान २०७.६ मिमी असून प्रत्यक्षात १११.३ मिमी पाऊस पडला आहे (सरासरीच्या ५४ टक्के), राज्यात १ जून ते २३ जुलैपर्यंत सरासरी पाऊस ४५३.१ मिमी असून प्रत्यक्ष पडलेला पाऊस ४४१.५ मिमी आहे (सरासरी २७.४ टक्के). मराठवाड्यात जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान १३४.० मिमी असून प्रत्यक्षात ५५.५ मिमी पाऊस पडला आहे (सरासरीच्या ४१.४ टक्के). मराठवाड्यात १ जून ते २३ जुलैपर्यंत सरासरी पाऊस २७२.१ मिमी असून प्रत्यक्ष पडलेला पाऊस २५१.१ मिमी आहे (सरासरी ९२.३ टक्के). राज्याचे सरासरी पेरणी क्षेत्र १४२.०२ लाख हेक्टर आहे.

मराठवाड्यातील पेरणीची स्थिती - राज्यात 23 जुलैपर्यंत ११४.२५ लाख हे. क्षेत्रावर पेरणी झाली असून, ती सरासरीच्या ८०% आहे. गतवर्षी याच कालावधीत १२७.१२ लाख हे. क्षेत्रावर पेरणी झाली होती. मराठवाडा विभागाची सरासरी पेरणी क्षेत्र ४८.५७ लाख हेक्टर आहे. 23 जुलैच्या अखेर मराठवाड्यात ४२.६५ लाख हे. क्षेत्रावर पेरणी झाली असून, ती सरासरीच्या ८८% आहे. गतवर्षी याच कालावधीत ४५.३३ लाख हे. क्षेत्रावर पेरणी झाली होती.

पिकांची आकडेवारी - मंत्री मुंडे म्हणाले की, राज्यात २३ जुलैअखेर सोयाबीन पिकाची ४३.८७ लाख हे. (१०६%), कापूस पिकाची ३९.७९ लाख हे. (९५%), तूर पिकाची ९.६७ लाख हे. (७५%), मका पिकाची ६.६४ लाख हे. (७५%), उडीद पिकाची १.६२ लाख हे. (४४%), मूग पिकाची १.३९ लाख हे. (३५%) तसेच इतर पिकांची पेरणी झाली आहे. मराठवाड्यात २३ जुलैअखेर सोयाबीन पिकाची २२.३३ लाख हे. (११४%), कापूस पिकाची १२.८० लाख हे. (८३%), तूर पिकाची ३.१५ लाख हे. (६४%), मका पिकाची २.१४ लाख हे. (७९%), उडीद पिकाची ०.७२ लाख हे. (४९%), मूग पिकाची ०.६४ लाख हे. (३९%) तसेच इतर पिकांची पेरणी झाली आहे.

आपत्कालीन पिक आराखडा तयार करण्याबाबत सूचना - तसेच महाराष्ट्रात जून ते ऑक्टोबर दरम्यान पाऊस पडत असल्याने या काळात खरीप व रब्बी पिकांच्या पेरण्या केल्या जातात. जिरायती शेती करणाऱया शेतकऱयांना पावसाच्या अनियमितपणास बऱ्याच वेळा तोंड द्यावे लागते. अवर्षण प्रवण क्षेत्रात पावसास बऱयाच वेळा उशीरा सुरुवात होते. खरीप हंगामात उशीरा पेरणीसाठी पिकांचे नियोजन करणे आवश्यक असते. खरीप हंगामामध्ये कडधान्य, गळीतधान्य तसेच तृणधान्य इ. पिकांचे उत्पादन स्थिर करण्यासाठी महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये आपत्कालीन परिस्थितीत पर्यायी पिकांच्या नियोजनाबाबत शिफारशी केलेल्या आहेत. नियमित मौसमी उशीरा सुरू झाल्यास परिस्थितीत पिकांचे नियोजनामध्ये पिकांचे वाण, खत व्यवस्थापन तसेच रोपांच्या प्रती हेक्टर संख्येमध्ये बदल करावा लागतो, अन्यथा प्रती हेक्टरी उत्पादन कमी येते. यासाठी जिल्हा स्तरावर कृषि विद्यापीठ, कृषि संशोधन केंद्रे व कृषि विज्ञान केंद्रे यांच्या सल्ल्याने जिल्हयाचा पिक आपत्कालीन पिक आराखडा तयार करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असल्याचेही मुंडे म्हणाले आहेत.

हेही वाचा -

  1. Dhananjay Munde : कृषीमंत्री धनंजय मुंडे बांधावर; नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश
  2. Farmer About Dhananjay Munde : कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या काय आहेत अपेक्षा?
  3. Dhananjay Munde : कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आमदार धनंजय मुंडे यांचा परळीत सत्कार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.