ETV Bharat / state

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्प पुस्तकाचे आज प्रकाशन

author img

By

Published : Jan 26, 2021, 9:58 PM IST

Updated : Jan 27, 2021, 6:23 AM IST

मुंबई
मुंबई

‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्प’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडणार आहे.

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या अनुषंगाने राज्य शासनातर्फे ‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्प’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि. 27 जानेवारी, 2021 रोजी दुपारी 12.30 वा. आयोजित करण्यात आला आहे. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे कोविड-19 निर्बंधांचे पालन करत मर्यादित निमंत्रितांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा होणार आहे.

या समारंभास उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह सीमाप्रश्नाचे समन्वयक मंत्री असलेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहेत.

कर्नाटक व्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणण्यासाठी कटिबद्ध

हुतात्मा दिनानिमित्त १७ जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले होते. कर्नाटक व्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही मुख्यमंत्र्यांनी आपल्या अभिवादनात केला. कर्नाटक सीमा भागातलं शेवटचं मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत सर्वशक्तीनिशी व निर्धारानं लढत रहाणं हीच हुतात्म्यांना श्रद्धांजली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले.

शेवटच्या क्षणा पर्यंत लढा देणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अभिवादन संदेशात म्हणाले होते, की महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी प्राणपणाला लावणाऱ्या सीमा लढ्यातील हुतात्म्यांना आजच्या हुतात्मा दिनी विनम्र अभिवादन. सीमा प्रश्नात सर्वस्वाची होळी करणारे हुतात्मे आणि त्यांच्या त्याग, समर्पणात होरपळूनही आजही या लढ्यात धीराने आणि नेटाने सहभागी कुटुंबियांना मानाचा मुजरा..! बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह कर्नाटक सीमाभागातील सर्व मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात सामील करून संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करणे, कर्नाटकव्याप्त शेवटचे मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत सर्वशक्तीनिशी, निर्धाराने लढत राहणे, हीच सीमालढ्यातील हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सीमालढ्यातील हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले. वर्ष 1956 मध्ये बेळगाव, कारवार, बिदरसारखी मराठी गावे तत्कालिन म्हैसूर राज्याला अन्यायकारक पद्धतीने जोडण्यात आली. सीमाभागातील मराठी बांधवांवर व महाराष्ट्र राज्यावर त्यावेळी झालेला अन्याय दूर करण्यासाठी मराठी बांधवांचा लढा अखंड सुरू आहे. हा लढा यशस्वी होईपर्यंत समस्त मराठी बांधव सर्वशक्तीनिशी, एकजुटीनं लढतील. संयुक्त महाराष्ट्रासाठी लढणाऱ्या आंदोलकांवर, दि. 18 जानेवारी 1956 रोजी मुंबईत गोळ्या चालवण्यात आल्या होत्या. त्यात महाराष्ट्राचे १० सुपुत्र शहीद, तर अडीचशेहून अधिक जण जखमी झाले होते.

सीमाभागातील मराठी बांधवांवर अन्याय

संयुक्त महाराष्ट्रासाठी शहीद झालेल्या त्या महाराष्ट्रवीरांनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले. आंदोलनात जखमी झालेल्या सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांबद्दलही उपमुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. कर्नाटक सीमाभागातील मराठी गावे महाराष्ट्रात आणून संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला होता.

कर्नाटकची दडपशाही.. राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना पोलिसांनी घेतले होते ताब्यात

सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना दरवर्षी १७ जानेवारी रोजी येथील हुतात्मा चौकात अभिवादन केले जाते. या अभिवादन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर बेळगावात गेले होते. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील नेते येऊ नयेत यासाठी कर्नाटक पोलीस महामार्गावर वाहनांची तपासणी करीत होते. पण, त्यातूनही राजेंद्र पाटील यड्रावकर बेळगावात पोचले व ते हुतात्मा चौकात गेले. तेथे अभिवादान सुरू असतानाच त्यांना पोलिसांनी अडविले.पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केली व अटक केली. यावेळी तेथे महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या समोरच हा प्रकार घडला, त्यामुळे तेथे तणाव निर्माण झाला होता. या घटनेनंतर शहरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. यासह या अगोदरही घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आज (बुधवार) होणाऱ्या ‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्प’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्या दरम्यान काय होणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.

काय आहे सीमा वाद?

मराठी भाषीक महाराष्ट्राची निर्मिती झाली. मात्र बेळगावसह कारवार, निपाणीसह अनेक मराठी भाषीक गावांचा समावेश मात्र कर्नाटकमध्ये झाला. त्याला महाराष्ट्राने कडाडून विरोध करत या गावांवर दावा केला. कर्नाटकनेही ही भाग आपलाच असल्याचे सांगितले. हा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. बेळगावसह कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी भावना इथल्या जनतेमध्ये आहे. यावरून महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात नेहमीच खटके उडत असतात.

Last Updated :Jan 27, 2021, 6:23 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.