ETV Bharat / state

स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारात महाराष्ट्राची हॅट्रिक, ४ राष्ट्रीय पुरस्कारांसह मिळवले १३ अन्य पुरस्कार

author img

By

Published : Aug 20, 2020, 8:11 PM IST

नागरी स्वच्छता अभियानातील १२ राष्ट्रीय पुरस्कारांपैकी सर्वाधिक ४ पुरस्कारांसह अन्य १३ असे एकूण १७ पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले आहेत. मोठ्या राज्यांच्या मानांकनात महाराष्ट्राला दुसरा क्रमांक मिळाला आहे. सलग तिसऱ्या वर्षी देशातील सर्वाधिक पुरस्कार मिळवत महाराष्ट्राने यंदा हॅट्रिक साधली आहे.

स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार
स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार

मुंबई- नागरी स्वछता अभियानातील कामगिरीत सातत्य राखत महाराष्ट्राने यावर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये देशातील सर्वाधिक पुरस्कार मिळवून आपली घोडदौड कायम राखली आहे, असे प्रतिपादन नगरविकास मंत्री एकनाश शिंदे यांनी आज केले.

माहिती देताना नगरविकासमंत्री एकनाश शिंदे

नवी दिल्ली येथे केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या उपस्थितीत झालेल्या ऑनलाईन सोहोळ्यास महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री शिंदे उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. शिंदे म्हणाले की, नागरी स्वच्छता अभियानातील १२ राष्ट्रीय पुरस्कारांपैकी सर्वाधिक ४ पुरस्कारांसह अन्य १३ असे एकूण १७ पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले आहेत. मोठ्या राज्यांच्या मानांकनात महाराष्ट्राला दुसरा क्रमांक मिळाला आहे. सलग तिसऱ्या वर्षी देशातील सर्वाधिक पुरस्कार मिळवत महाराष्ट्राने यंदा हॅट्रिक साधली आहे. सलग तीनही वर्षी देशात सर्वाधिक पुरस्कार मिळवत महाराष्ट्र देशात अग्रेसर राहिला आहे. याबद्दल सर्व महापौर, नगराध्यक्ष, आयुक्त, मुख्याधिकारी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या टीमचे विशेष कौतुक नगरविकासमंत्र्यांनी केले.

दरम्यान, आज झालेल्या राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहोळ्यात देशातील सर्वाधिक स्वच्छ शहर श्रेणीमध्ये तृतीय क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्रातील नवी मुंबई शहराला मिळाला आहे. विशेष म्हणजे, एक लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या स्वच्छ शहर श्रेणीमध्ये तीनही राष्ट्रीय पुरस्कार महाराष्ट्रातील शहरांनी मिळविले आहे. त्यामध्ये प्रथम पुरस्कार कराड, द्वितीय सासवड तर तृतीय क्रमांक लोणावळा शहराने मिळविला आहे. पश्चिम विभाग श्रेणीमधील २५ हजार पेक्षा कमी लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये पन्हाळा शहराला स्वच्छ शहर म्हणून पुरस्कार मिळाला आहे. शाश्वत स्वच्छता शहर म्हणून जेजुरी तर स्वच्छतेकामी नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या अकोले शहराला पुरस्कार मिळाला आहे.

२५ ते ५० हजार या दरम्यान लोकसंख्येच्या श्रेणीतील शिर्डीला स्वच्छ शहर म्हणून, तर स्वच्छतेकामी नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या विटा शहराला पुरस्कार मिळाला आहे. शाश्वत स्वच्छता ठेवणाऱ्या श्रेणीमध्ये इंदापूरला पुरस्कार मिळाला आहे. गेल्या वर्षीपेक्षा उत्कृष्ट काम करणाऱ्या वरोरा शहराला देखील पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ५० हजार ते एक लाखाच्या दरम्यान लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये शाश्वत स्वच्छ शहर म्हणून बल्लारपूरचा गौरव करण्यात आला असून नागरिकांनी दिलेला उत्कृष्ट प्रतिसाद, या श्रेणीत हिंगोली तर गेल्या वर्षीपेक्षा उत्कृष्ट काम करणाऱ्या शेगाव शहराला आणि स्वच्छ शहर म्हणून रत्नागिरीला सन्मानित करण्यात आले आहे.

देहू रोड कॅन्टोन्मेंट परिसराला गेल्या वर्षीपेक्षा उत्कृष्ट काम करणारे शहर या श्रेणीत पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्र अमृत शहरांच्या स्वच्छ श्रेणीमध्ये राष्ट्रीय स्तरावरील १०० अव्वल अमृत शहरांपैकी महाराष्ट्रातील ४३ पैकी ३१ शहरांचा समावेश आहे. राज्यातील ७५ टक्के अमृत शहरे पहिल्या १०० शहरांमध्ये आली आहेत. २५ नॉन अमृत शहरांपैकी २० महाराष्ट्रातील आहेत. कचरामुक्त राष्ट्रीय तारांकित १४१ शहरांमध्ये महाराष्ट्रातील ७७ शहरांचा समावेश आहे. संपूर्ण राज्य हागणदारी मुक्त असून राज्यातील २१६ शहरे ओडीएफ प्लस, तर ११६ शहरे ओडीएफ प्लस प्लस झाली आहेत.

स्वच्छ महाराष्ट्र अभियानात (नागरी) महाराष्ट्राने गेल्या ३ वर्षापासून दर्जेदार काम करत देशातील अव्वल कामगिरीचे सातत्य राखले आहे. या अभियानात राज्यातील शहरांनी केलेल्या कामगिरीची दखल राष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक पुरस्कार देऊन घेण्यात आली आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये देखील राज्याने सर्वोत्तम कामगिरीचा तृतीय क्रमांक मिळविला होता. त्याचबरोबर, देशात सर्वाधिक ४६ पुरस्कार राज्याने मिळविले होते. पहिल्या १०० अमृत शहरांमध्ये यावर्षी राज्यातील २९ अमृत शहरांचा सहभाग होता.

कचरामुक्त शहरांच्या तारांकित मानांकनामध्ये देशपातळीवर ५३ शहरांना ३ स्टार मानांकन प्राप्त झाले होते. त्यातील निम्म्याहून अधिक म्हणजे, २७ शहरे महाराष्ट्रातील होती. याचवर्षी देशातील ५०० शहरांनी ओडीएफ प्लस आणि ओडीएफ प्लस प्लस दर्जा प्राप्त केला. यात महाराष्ट्रातील १५४ शहरांचा समावेश होता. २०१८ मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राने दुसरा क्रमांक मिळविला होता. त्याचबरोबर, राष्ट्रीय पातळीवरील ४६ पुरस्कारांपैकी सर्वाधिक १० पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले होते. पहिल्या १०० अमृत शहरांमध्ये राज्यातील २७ अमृत शहरांचा सहभाग होता.

यावेळी, राज्यमंत्री प्रसाद तनपुरे, लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, सासवडचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, नगरविकास विभागाच्या तत्कालिन प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, प्रधान सचिव महेश पाठक आदी यावेळी होते.

हेही वाचा- ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित जसराज अनंतात विलीन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.