ETV Bharat / state

BreakTheChain : राज्यात सरसकट शिथिलता नाही; परिस्थितीनुसार स्थानिक प्रशासन घेणार निर्णय

author img

By

Published : Jun 5, 2021, 8:25 PM IST

Updated : Jun 5, 2021, 9:33 PM IST

ब्रेक-द-चेन अंतर्गत आज नवे आदेश काढण्यात आले आहेत. राज्यात सरसकट शिथिलता नसून स्थानिक प्रशासन आपापल्या भागासाठी निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घेईल, असे या आदेशात सांगण्यात आले आहे.

BreakTheChain
BreakTheChain : राज्यात सरसकट शिथिलता नाही, स्थानिक प्रशासन निकषानुसार निर्बंधांबाबत ठरवेल

मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात अक्षरश: थैमान घातले होते. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू केले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. याचमुळे राज्यातील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दरम्यान, ब्रेक-द-चेन (BreakTheChain) अंतर्गत आज नवे आदेश काढण्यात आले आहेत. राज्यात सरसकट शिथिलता नसून स्थानिक प्रशासन आपापल्या भागासाठी निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घेईल, असे या आदेशात सांगण्यात आले आहे.

या निकषांच्या आधारे निर्बंधांत शिथिलता -

कोरोनाचा संसर्ग राज्यभर सारखा नाही. त्याची तीव्रता कमी-जास्त आहे, हे लक्षात घेऊन एकीकडे या विषाणूची साखळी तोडणे आणि दुसरीकडे आपले आर्थिक, सामाजिक दैनंदिन व्यवहार शिस्तबद्धरित्या सुरु कसे होतील, हे पाहणे एवढ्याच करीता निर्बंधांच्या ५ पातळ्या ठरविण्यात आल्या आहेत. या पातळ्या निश्चित करण्यासाठी ऑक्सिजन बेडसची दैंदिन उपलब्धता आणि साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर हे निकष गृहीत धरण्यात येतील. त्या त्या ठिकाणाचे स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या निकषांच्या आधारे निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घेईल.

स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्बंधांबाबत निर्णय घेईल -

कोविडचा संसर्ग हे अजूनही आव्हानच आहे. त्याला रोखण्यासाठी आपण कशा सुयोग्य पद्धतीने निर्बंधांसाठी निकष आखले आहेत व पातळ्या ठरविल्या आहेत त्याची माहिती आपणास असावी, असा या आदेशाचा हेतू आहे. आपापल्या भागातील स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या निकषांप्रमाणे निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घेईल, नागरिकांनी कोविडच्या या काळात आरोग्याचे नियम पाळून तसेच कोविड सुसंगत वर्तवणूक ठेऊन आपापल्या जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयास सहकार्य करावे, असेही राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.

निर्बंधांचे स्तर -

राज्यभरासाठी विविध वर्गात सहभागी होणाऱ्या क्षेत्रांकरिता पाच स्तर तर बनविण्यात आले आहे. या स्तरांची अंमलबजावणी त्या ठिकाणच्या साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर आणि रुग्णांनी भरलेले ऑक्सिजन बेडच्या दैनंदिन टक्केवारीवर अवलंबून असेल. प्रत्येक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन हे आपल्या कार्यक्षेत्रात या स्तरांच्या आधारे निर्बंध उठवतील. याकरिता विभिन्न मापदंड आणि सामान्य मार्गदर्शक तत्त्व खालील प्रमाणे जाहीर करण्यात येत आहेत.

  • स्तर १ – ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असेल तसेच ऑक्सिजन बेड २५ टक्क्यापेक्षा कमी भरलेले असतील.
  • स्तर २ – ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असेल आणि भरलेले ऑक्सिजन बेडची टक्केवारी 25 ते 40 च्या दरम्यान असेल.
  • स्तर ३ - पॉझिटिव्हिटी दर पाच ते दहा टक्के दरम्यान असेल आणि व्यापलेले ऑक्सिजन बेड 40 टक्क्यांपेक्षा जास्त असेल.
  • स्तर ४ - ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर 10 ते 20 टक्के दरम्यान असेल आणि 60 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड रुग्णांनी भरलेले असेल.
  • स्तर ५ - जेथे 20 टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी जर असेल आणि 75 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड रुग्णांनी व्यापले असेल.

हेही वाचा - मान्सून महाराष्ट्रात दाखल, येत्या दोन दिवसांत 'या' जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता

Last Updated : Jun 5, 2021, 9:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.