ETV Bharat / state

परदेशातून पोस्टाने मागवले लाखोंचे ड्रग्ज, दोघांना कस्टमने केली अटक

author img

By

Published : Jun 14, 2023, 7:39 PM IST

परदेशातून क्रिप्टो करन्सीचा वापर करुन ड्रग्ज मागवल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. मुबंईत पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Etv Bharat लाखोंचे ड्रग्ज
Etv Bharat लाखोंचे ड्रग्ज

मुंबई : इंटरनेटवरील डार्क नेटवरून परदेशी पोस्ट सेवेच्या माध्यमातून अमली पदार्थ (ड्रग्ज) मागविणाऱ्या मुंबईतील दोन तरुणांना कस्टम विभागाने अटक केली आहे. महत्वाचे म्हणजे या अमली पदार्थांचे पैसे त्यांनी क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून समोरच्या पार्टीला दिले होते. अमली पदार्थासाठी होणाऱ्या क्रिप्टो करन्सीच्या वापरामुळे कस्टम अधिकारी यांना देखील धक्का बसला आहे. या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.

आरोपींवर पाळत - सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी येथील दोन तरुणांनी इंटरनेटवरील डार्क नेटच्या माध्यमातून नेदरलँड्स येथून ६८ लाख रुपये मूल्याचे अमली पदार्थ दोन टप्प्यांत मागवले होते. यापैकी ३७ लाख रुपयांच्या अमली पदार्थांचे पार्सल बॅलाई इस्टेट येथील परदेशी पोस्ट सेवेच्या कार्यालयात पोहोचले होते. यामध्ये काहीतरी संशयास्पद माल असल्याचे कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आरोपींवर पाळत ठेवली होती.

संबंधित पोस्ट सेवेचा कर्मचारी जेव्हा हे पार्सल देण्यासाठी जोगेश्वरी येथे गेला. तेव्हा संबंधित तरुणाने ते पार्सल स्वीकारले. त्यावेळी तातडीने कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची झडती घेतली. त्यामध्ये अमली पदार्थ असल्याचे आढळून आले. अटक केलेल्या तरुणाचे नाव दानिश शेख असे आहे. त्याच्यासोबत त्याचा मित्र समद उमातिया यालाही अटक केली. ज्या पार्सलमधून हे अमली पदार्थ आले होते, त्याची किंमत ३७ लाख रुपये इतकी होती. तर ३१ लाख रुपये मूल्याचे आणखी एक पार्सल अशाच पद्धतीने पोस्टाने येणार असल्याची कबुली आरोपीने कस्टम अधिकाऱ्यांना दिली आहे.


कस्टम अधिकाऱ्यांनी जेव्हा समद याचे क्रिप्टो अकाऊंट तपासले तेव्हा त्यांना ते पैसे परदेशातील नेमक्या कोणत्या विक्रेत्याकडे गेले, याची माहिती मिळाली. मात्र, तो विक्रेता परदेशात असल्याने अद्याप त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. अमली पदार्थांचा व्यवहार हा क्रिप्टो करन्सीमध्ये झाल्याची माहिती समद याने कस्टम अधिकाऱ्यांना दिली. मालाड येथील एका व्यावसायिकाकडून त्यांनी ही क्रिप्टो करन्सी विकत घेतली होती, अशी माहिती तपासात उघड झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.