ETV Bharat / state

कंगनाचा बोलविता धनी कोण? जितेंद्र आव्हाड यांचा सवाल

author img

By

Published : Sep 10, 2020, 3:00 PM IST

मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख, सोनिया सेना म्हणून काँग्रेसचा उल्लेख करणे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांबाबत बेतालपणे बोलणे हे भयंकर आहे. यामागे तिचा बोलविता धनी कोण आहे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला.

Jitendra Awhad
जितेंद्र आव्हाड

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही मुख्यमंत्र्याचा एकरी उल्लेख करते. सोनिया गांधी यांच्या पक्षाचा सोनिया सेना, असा उल्लेख करून ट्विट करते. महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांचा अवमान करते. मात्र, यामागे तिचा बोलविता धनी कोण आहे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला.

कंगनाचा बोलविता धनी कोण?

भीमा कोरेगाव संदर्भात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक सुरू असताना आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. कंगना रणौतवर त्यांनी जोरदार टीका केली. बोलणाऱ्याचे तोंड दाबता येत नाही, असे मराठीत म्हटले जाते. परंतू, कंगनाचे बोलणे जरा जास्तच झाले आहे, असे आव्हाड म्हणाले.

कंगनाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाही एकेरी उल्लेख करत अपमानास्पद शब्दांचा वापर केल्याचा आव्हाड यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. पवार साहेबांनी महाराष्ट्र उभा केला आहे मात्र, कंगनाला वाटत त्यांनी काय फक्त बिल्डिंग उभी केली. यातूनच तिच्या मानसिकतेचे दर्शन होते. मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख, सोनिया सेना म्हणून काँग्रेसचा उल्लेख करणे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांबाबत बेतालपणे बोलणे हे भयंकर आहे, असे आव्हाड म्हणाले.

दरम्यान, बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्या प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिच्यावर विक्रोळी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वकील नितीन माने यांच्याकडून विक्रोळी कोर्टामध्ये कंगनावर अब्रू नुकसानीचा दावासुद्धा केला जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.