ETV Bharat / state

Corona In Mumbai: मुंबईत २०० दिवसांत कोरोना रुग्णांमध्ये शून्य मृत्यूची नोंद

author img

By

Published : Dec 27, 2022, 4:08 PM IST

मुंबईत गेले अडीच वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार सुरू आहे. हा प्रसार रोखण्यासाठी पालिकेने राबवलेल्या मुंबई मॉडेलची चर्चा जगभरात झाली आहे. मुंबई पालिकेने दोन्ही लसीकरणाचे डोस १०० टक्के पूर्ण केले आहेत. (Corona In Mumbai) त्यानंतर आता पालिकेने केलेल्या उपाययोजनामुळे तब्बल २०० दिवसांहून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे. देशभरात पुन्हा एकदा कोरोना वाढत असताना शून्य मृत्यूंची नोंद होत असल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो

मुंबई - मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाला. हा प्रसार सुरू होताच रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली. रुग्णांचा मृत्यू होऊ लागल्याने लॉकडाऊन लावण्यात आला. मुंबईतील कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी ट्रेसिंग ट्रॅकिंग ट्रिटिंग, धारावी मॉडेल, मुंबई मॉडेल आदी उपाययोजना करण्यात आल्या. (zero death was reported among corona patients in Mumbai) या उपाययोजनांची दखल जगभरात घेण्यात आली. मुंबईत गेल्या अडीच वर्षात ११ लाख ५५ हजार ९३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ११ लाख ३५ हजार २९७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

२०० वेळा शून्य मृत्यूची नोंद - मुंबईत एकीकडे कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी प्रयत्न केले जात असताना सहव्याधी असलेले रुग्ण, उशिरा दाखल करण्यात आलेले रुग्ण आदी कारणामुळे मृत्यू होत होते. रात्री बेडवरून उठून शौचालयात जातानाही मृत्यू झाले आहेत. गेल्या अडीच वर्षात १९ हजार ७४६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्णांचे होणारे मृत्यू रोखण्यासाठी मिशन झिरो डेथ राबवण्यात आले. मृत्यूची जबाबदारी वार्डमधील कर्मचारी, नर्स, डॉक्टर यांच्यावर निश्चित करण्यात आली. यामुळे मुंबईत २०० वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

अशी झाली शून्य मृत्यूची नोंद - मुंबईत १७ ऑक्टोबर २०२१ ला पहिल्या शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर डिसेंबर महिन्यात ७ वेळा, जानेवारी २०२२ मध्ये १ वेळा, फेब्रुवारी मध्ये ८ वेळा, मार्चमध्ये २७ वेळा, एप्रिलमध्ये २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा, जून महिन्यात ७ वेळा, जुलै मध्ये ६ वेळा, ऑगस्ट मध्ये ७, सप्टेंबरमध्ये ११, ऑक्टोबर मध्ये २४, नोव्हेंबर मध्ये २४, डिसेंबर मध्ये २५ वेळा अशी एकूण २०२ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. २४ डिसेंबर हा शून्य मृत्यू होण्याचा २०० वा दिवस होता. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रयत्नांना यश आल्याने मुंबईत शून्य मृत्यू नोंद होण्याचे प्रमाण वाढत आहे.

मुंबईत ११ लाख ५५ हजार रुग्ण - मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये पहिला रुग्ण आढळून आला. गेल्या अडीच वर्षात ११ लाख ५५ हजार ९८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ११ लाख ३५ हजार ३०३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर १९ हजार ७४६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या ४९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईमधील रुग्ण दुपटीचा कालावधी १ लाख २१ हजार २९४ इतका नोंदवण्यात आलेला आहे. १९ ते २५ डिसेंबर या आठवड्यातील पॉजिटिव्हिटी रेट ०.०००६ टक्के इतका आहे. मुंबईमध्ये सध्या ४४४१ बेड्स असून त्यापैकी १० म्हणजेच ०.२३ बेडवर रुग्ण दाखल आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.