ETV Bharat / state

राज्यातील थोडक्यात महत्त्वाच्या घडामोडी..

author img

By

Published : Aug 4, 2020, 5:03 PM IST

Updated : Aug 4, 2020, 9:54 PM IST

एका क्‍लिकवर वाचा राज्यातील थोडक्यात महत्त्वाच्या घडामोडी..

थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या
थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या

नंदुरबार - जिल्ह्यात महिन्याभरापासून कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना आता मृतांची संख्याही वाढत आहे. सोमवारी दोन रुग्णांचा मृत्यू झाला. यात नंदुरबारमधील एका 75 वर्षीय महिलेचा तर शहादा येथील 53 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 36 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

सोमवारी चार जण पॉझिटीव्ह आढळले असून हे रुग्ण नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ, दहिंदुले व तलवाडे या गावांमध्ये आढळले आहेत. यामुळे आता कोरोनाने ग्रामीण भागातही शिरकाव करण्यास सुरुवात केली आहे. तर तिघे कोरोनातून बरे झाले आहेत.

आत्तापर्यंत नंदुरबार जिल्ह्यात एकूण 651 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. दोन महिन्यात जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण नंदुरबार व शहादा शहरात आढळले आहेत.

दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी बरे होणाऱ्यांची संख्या त्याहून अधिक आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसात जिल्ह्यातील मृत्यूदरात वाढ झाली आहे.

अ‍ॅन्टीजेनच्या तपासणीत 5 निगेटिव्ह तर ट्रायनाटच्या तपासणीत 2 पॉझिटिव्ह

नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत कोरोनासंदर्भात नमुने तपासणीसाठी येत आहेत. अ‍ॅन्टीजेन टेस्टच्या पाच नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात पाचही नमुने निगेटीव्ह आले. तसेच ट्रायनाटच्या 11 नमुन्यांची तपासणी केली असता त्यात दोन जण पॉझिटिव्ह तर नऊ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

नंदुरबार तालुक्यातील आसाणे येथील 55 वर्षीय पुरुष तर तळोदा तालुक्यातील मोड येथील 70 वर्षीय वृध्द महिला, या दोन जणांचे अहवाल ट्रायनाट पॉझिटीव्ह आले आहेत.

नंदुरबार - तळोदा तालुक्यातील धवळीविहीर रस्त्यावर हलालपूर गावाच्या जवळ पुलावर पडलेल्या भगदाडात तोल जाऊन पडल्याने दुचाकीस्वारासह लहान बालक जखमी झाले.धवळीविहीर रस्त्यावर पुलावरील भगदाडात दुचाकीस्वार कोसळला

दरम्यान, मागील महिन्यात नदीला पूर आल्याने पाण्यात रस्त्याचा भराव वाहून गेल्याने मोठे भगदाड पडले होते. परंतु, अद्यापपर्यंत संबंधित विभागाने भगदाड बुजविले नसून अपघाताच्या घटना घडत आहेत.

सविस्तर माहिती अशी, धडगाव तालुक्यातील धवळीविहीर ते हलालपूर रस्त्यादरम्यान असलेल्या नदीला मागील महिन्यात पूर आल्याने भगदाड पडले होते. तळोदाहून किराणा वस्तू घेऊन धवळीविहीर गावी जाताना तुटलेल्या पुलावर तोल गेल्याने दुचाकीस्वार पडला. यात लहान बालकासह दुचाकीस्वार जखमी झाला. परिसरातील नागरिकांनी धाव घेत भगदाडमध्ये पडलेल्या दुचाकीस्वार व लहान मुलाला बाहेर काढले.

कराडच्या नगराध्यक्षांची कोरोनावर मात

कराड (सातारा) - लोकनियुक्त नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी कोरोनावर मात केली असून नुकताच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनामुक्त झाल्यामुळे मी लवकरच नागरिकांच्या सेवेत रूजू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नगराध्यक्षा या नात्याने त्या कोरानासारख्या महामारीच्या संकटात कराडमध्ये सर्वत्र कामानिमित्त फिरत होत्या. शहरातील कोरोनाग्रस्त रुग्ण सापडलेल्या भागात जाऊन नागरिकांना धीर देत होत्या. तसेच सोशल डिस्टन्सिंगसह मास्कचा वापर करण्याचे आवाहन करत होत्या. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना भेटत होत्या. त्यातूनच त्यांना कोरोनाची लागण झाली.

प्राथमिक टप्प्यातील लक्षणे दिसू लागल्यानंतर त्या स्वत:च होम क्वॉरंटाईन झाल्या. तसेच कृष्णा हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी स्बॅव दिला. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाल्या. 14 दिवसांच्या उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मात केली. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर यांच्यासह मान्यवरांनी त्यांचा पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.

सर्व डॉक्टर्स, परिचारिका आणि महामारीत स्वत:चा जीव धोक्यात घालून अहोरात्र सेवा करणार्‍या कर्मचाऱ्यांमुळे मी कोरोनामुक्त झाले. मी सर्वांचे आभार मानते. कृष्णा हॉस्पिटलमध्ये प्रत्येक रुग्णाची आपुलकीने चौकशी केली जाते. काळजी घेतली जाते. योग्य आहार, औषधोपचार केला जातो. त्यामुळे माझ्यासह इतर पूर्ण लवकर बरे झाले. घरी जात असल्याचा आनंद असून लवकरच मी कराडकरांच्या सेवेत रुजू होणार असल्याचे नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी सांगितले.


येवला (नाशिक) - येवला तालुक्यातील रेंडाळे शिवारामध्ये एक काळवीट मृतावस्थेत आढळून आले. रेंडाळे परिसरात मोठ्या प्रमाणात हरीण व काळविटांचा वावर असतो.येवल्यात मृतावस्थेत आढळले काळवीट

सध्या सर्वत्र पावसामुळे हिरवळ व पाणी साचलेले असल्याने हरणांचा व अन्य वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून आज काळवीट एका शेतकऱ्याला मृतावस्थेत पडलेले आढळून आले. त्यांनी त्वरित रेंडाळे येथील वन्यजीव संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रवीण अहिरे यांना फोन करून सदर घटनेची माहिती दिली. अहिरे यांनी वनविभागाला याबाबत कळवले.

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात या काळविटाचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वन विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

Last Updated : Aug 4, 2020, 9:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.